
>> बुद्धभूषण चंद्रकांत कांबळे
मराठी भाषा शाबूत ठेवायची असेल तर आपल्या मुलांना मराठी माध्यमातील शिक्षण घेऊ द्यावे आणि त्यांना त्यांचे भविष्य घडवू द्यावे. कारण इंग्रजी शाळेपेक्षा मराठी माध्यमातील शिक्षण कधीही दर्जेदार व सक्षम असते हे पालकांनी लक्षात घ्यावे. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा एवढेच मला सांगायचे आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत शिक्षण घेणे हे त्यांना सोपे व रास्त राहील. कारण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर मातृभाषेतूनच संस्कार रुजवलेले असतात आणि त्यांच्या आजूबाजूला मातृभाषेतूनच बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या मनावर मराठी भाषेचा पगडा असतो. त्यामुळे त्यांना मराठी भाषा शिकायला व समजायला सोपी जाते.
हल्ली प्रत्येक पालकाला वाटत आहे की, माझा मुलगा कोणत्याही क्षेत्रात गेला तर त्याला इंग्रजी ठळकपणे बोलता आली पाहिजे. त्याला इंग्रजी भाषा चांगली समजली पाहिजे. त्याला इंग्रजी उत्तम प्रकारे वाचता व लिहिता आली पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही तो गेला तर त्याला इंग्रजीतून संभाषण करता आले पाहिजे. तो कुठे अडून पडता कामा नये. म्हणून बहुतांश पालकांचा ओढा व कल आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत घालण्यासाठी असतो. मुलांना डॉक्टर व इंजिनीयर बनवण्यासाठी इंग्रजी शाळा हेच माध्यम निवडण्याची स्पर्धा सध्या प्रत्येक पालकांमध्ये वेगाने सुरू झाली आहे.
आपला मुलगा इंग्रजी शाळेमध्ये शिकणे म्हणजे प्रतिष्ठsचे व मोठेपणाचे लक्षण झाले आहे. ज्या पालकांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात ते पालक कुठेही चर्चेत गेल्यावर किंवा चार माणसात बसल्यावर मोठय़ा अभिमानाने म्हणतात की, माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकत आहे, इंग्रजी बोलत आहे व त्याला डॉक्टर किंवा इंजिनीयर बनवण्याचे आमचे स्वप्न आहे.असे आपल्या मुलाचे मोठेपण मोठय़ा आवडीने व ऐटीने सांगतात. म्हणून इंग्रजी शाळांना बहुतांश पालकांची व विद्यार्थ्यांची पसंती अधिक असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याच कारणामुळे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मराठी शाळांना आजकाल वाईट दिवस आले आहेत, असेच म्हणावे लागेल.
मान्य आहे की, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर इंग्रजीतून आपल्याला बोलता आलं पाहिजे. समोरचा काय बोलतोय हे समजता व ओळखता आले पाहिजे. म्हणून इंग्रजी भाषा येणे हे प्रत्येकाला अनिवार्य आहे. मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्रापुरतीच सीमित आहे आणि मराठी भाषा बोलणारे लोक हे महाराष्ट्रातच अधिक आहेत. तरीसुद्धा मराठी भाषा शिकण्यासाठी आजकालच्या महाराष्ट्रीयन पालकांचा व विद्यार्थ्यांचा ओढा व कल इंग्रजी शाळांकडे असल्याचे दिसत आहे. परंतु महाराष्ट्रातील पालकांना व विद्यार्थ्यांना मी सांगू शकतो की, आपली मातृभाषा मराठी आहे. आपल्या मुलांना लहानापासून मोठे होईपर्यंत आपण मराठी भाषेतच संस्कार व बोलणे शिकवलेले असते. म्हणजे ते लहानाचे मोठे मराठी भाषेच्या संस्कार छायेखाली होतात. लहानपणापासूनच आपल्या मुला-मुलींना मराठी भाषेची आवड व गोडी अधिक लागलेली असते. त्यांना मराठी भाषा समजायला व शिकायला सोपी जाते. म्हणून विद्यार्थ्यांची मराठी भाषेवर जबरदस्त पकड असते. मराठी शाळेत शिकवलेला अभ्यास आपल्या मुलांच्या पटकन लक्षात येतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे मराठी भाषा त्यांना लवकर अवगत व माहीत होते आणि विद्यार्थीसुद्धा मराठी भाषेतून शिक्षण घेऊन लवकर भविष्यात यशस्वी होतात.
तसे तर मराठी शाळेतसुद्धा इंग्रजी विषय हा पहिलीपासून ते दहावीपर्यंत शासनाने अनिवार्य केला आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी लिहिता, बोलता आणि वाचता यावी आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यावर मराठी भाषा बोलता व ओळखता आली पाहिजे, एवढे शिक्षण मराठी शाळांमध्ये शिकवले जाते. परंतु आजकाल पालकांना हे कळत नाही की, आपल्या मुला-मुलींना मराठी शाळेचे शिक्षण मातृभाषेत देणे आणि आपल्या मराठी संस्कृतीला व मातृभाषेला जिवंत ठेवणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाचे कर्तव्य आहे. आपली मुले मराठी माध्यमामध्ये शिकवणे म्हणजे आपली प्रतिष्ठा कमी करून घेणे आणि इंग्रजी शाळेमध्ये शिकणे म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढणे, या दुहेरी खेळात आपण आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात घालत आहोत हे अगोदर लक्षात घेणे काळाची गरज आहे.
श्रीमंत, नोकरदार, धनदांडगे आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा व संपत्ती आहे असे पालक भरमसाट पैसा ओतून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकवत आहेत. त्यांना हा खर्च परवडणारा आहे; परंतु त्यांची बरोबरी गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व कामगार पालकसुद्धा आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून स्वतःची आर्थिक परिस्थिती कमकुवत करत आहेत त्यासाठी सावकाराचे कर्ज काढत आहेत, वीटभट्टीची उचल घेऊन किंवा उसाची उचल घेऊन आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत घालत आहेत आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत. म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडल्यासारखे आहे.
माझे असे म्हणणे नाही की, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे ज्ञान नसू नये, विद्यार्थी इंग्रजी शाळेत शिकून नयेत, त्यांनी केवळ मराठी शाळेतूनच शिक्षण घ्यावे असा माझा उद्देश कदापि नाही. परंतु केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत शिक्षण घेणे हे त्यांना सोपे व रास्त राहील. कारण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर मातृभाषेतूनच संस्कार रुजवलेले असतात आणि त्यांच्या आजूबाजूला मातृभाषेतूनच बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या मनावर मातृभाषेचा म्हणजेच मराठी भाषेचा जबरदस्त पगडा असतो. त्यामुळे त्यांना मराठी भाषा शिकायला व समजायला सोपी जाते आणि विद्यार्थी आवडीने ती भाषा शिकतात आणि भविष्यात यशस्वी होतात. हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. आजकाल जर आपण विचार केला तर मराठी आणि इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळेतून घडलेले व मोठय़ा पदावर गेलेले विद्यार्थी अधिक असल्याचे चित्र आपण बघत आहोत. उच्चपदस्थ अधिकारी, कलेक्टर, वकील, अभियंता, डॉक्टर आणि प्राध्यापक यांनी मराठी शाळेत शिकूनच आपले भविष्य घडवले आहे हे कोणालाही मान्य करावेच लागेल. म्हणून माझी महाराष्ट्रीयन पालकांना विनंती आहे की, आपल्या मुलांना मराठी शाळेतूनच शिक्षण शिकू द्या. सुरुवातीपासून ते मराठी बोलत आल्यामुळे व मराठी भाषेत त्यांच्यावर कळत-नकळतपणे संस्कार झाल्यामुळे ते मराठी शाळेतून लवकर यशस्वी होतील असे मला वाटते.
पालकांनी आपली मातृभाषा अबाधित ठेवण्यासाठी आणि मराठी शाळा जिवंत ठेवण्यासाठी इतर श्रीमंत पालकांची बरोबरी न करता आणि प्रतिष्ठsचा विचार करू नये. केवळ भविष्याचा विचार करून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेऐवजी मराठी शाळेमध्ये शिक्षण घेऊ द्यावे. मराठी शाळेतून यशस्वी होणाऱ्या आणि शासकीय पदे काबीज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का भारतात लक्षणीय आहे. मराठी भाषा शाबूत ठेवायची असेल तर आपल्या मुलांना मराठी माध्यमातील शिक्षण घेऊ द्यावे आणि त्यांना त्यांचे भविष्य घडवू द्यावे. कारण इंग्रजी शाळेपेक्षा मराठी माध्यमातील शिक्षण कधीही दर्जेदार व सक्षम असते हे पालकांनी लक्षात घ्यावे. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करावा एवढेच मला सांगायचे आहे.