अनुलोम-विलोम !

>> सीए अभिजित कुळकर्णी 

अनुलोम-विलोम या प्राणायामाला योगाभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला ‘नाडीशुद्धी प्राणायाम’ असेही म्हणतात. अनुलोम-विलोम प्राणायाम हा एक नित्यनेम आहे. तसे पाहायला उज्जायीमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टींचे अनुसरण अनुलोम-विलोम प्राणायामात केले जाते. फरक फक्त एकच, उज्जायी करताना आपल्या दोन्ही नाकपुडय़ा उघडय़ा असतात. अनुलोम-विलोम करताना मात्र आपण क्रमाने एकेक नाकपुडी बंद करून श्वास आणि उच्छ्वास करतो. 

प्रणव मुद्रा

  • अनुलोम-विलोम करताना नेहमी उजवा हात वापरावा. अंगठा उघडा ठेवावा. अंगठय़ाला लागून असलेली दोन बोटे अर्थात तर्जनी आणि मध्यमा बंद करून दुमडून ठेवाव्यात. अनामिका आणि कनिष्ठका मात्र उघडय़ा असाव्यात. अंगठय़ाने आपली उजवी नाकपुडी बंद करून ठेवावी आणि डाव्या नाकपुडीने अत्यंत सावकाशपणे दीर्घकाळपर्यंत श्वास आत खेचावा. श्वास पूर्णपणे भरल्यावर शेवटच्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करावी आणि उजव्या नाकपुडीने अत्यंत सावकाशपणे उच्छ्वास करावा. लगेच उजव्या नाकपुडीने श्वास भरून डाव्या नाकपुडीने उच्छ्वास करावा.
  • श्वास आणि उच्छ्वास करतेवेळी गळा आतून खेचून ठेवावा. अत्यंत सावकाशपणे श्वास आणि उच्छ्वास करावा. श्वास घ्यायला जितका वेळ लागतो, त्याच्या दुप्पट वेळ उच्छ्वासासाठी द्यावा आणि अनुलोम-विलोम करताना आपले ध्यान श्वासोच्छ्वासावर ठेवावे. हवेचा शांत, सुखद स्पर्श आपल्या नाकपुडय़ांत आणि श्वासनलिकेत अनुभवावा.

अनुलोम-विलोम आणि परंपरागत शिक्षा पद्धती

  • आजही हिंदू समाजात वयाच्या आठव्या वर्षी व्रतबंध/उपनयन संस्कार केला जातो. त्या वेळी बालकाला अनुलोम-विलोम प्राणायाम शिकविला जातो. ‘श्वेताश्वतर उपनिषदा’तही या प्राणायामाचा उल्लेख येतो. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या ‘राजयोग’ या ग्रंथात या प्राणायामाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
  • अनेकांना हे माहीतही नसते की, आपला श्वासोच्छ्वास सामान्यतः एका वेळी एकाच नाकपुडीने होतो. अर्धा प्रहर श्वासोच्छ्वास उजव्या नाकपुडीने होतो. नंतरचा अर्धा प्रहर म्हणजे दीड तास डाव्या नाकपुडीने होतो आणि हे चक्र दिवस-रात्र सतत चालू राहते.

योगशिक्षक, भारतीय योग मंदिर, http://www.bymyoga.in/