सोशल मीडियाचा अतिरेक थांबवा!

>> सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर

सोशल मीडिया उदाहरणार्थ व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादींवरून आपण अनेक व्हिडीओ आणि फोटो सतत बघत असतो. जेव्हा आपण या गोष्टी बघतो किंवा ऐकतो तेव्हा त्या आपण कळत वा नकळत ग्रहणही करत असतो. अर्थात यांचा आहार हा आपण घेत असतो आणि त्यामुळे तसेच संस्कार सुप्त अथवा थेट स्वरूपामध्ये आपल्या मनावरती होतात. म्हणूनच या आहारावरही आपले नियंत्रण आणलेच पाहिजे आणि ही आताच्या काळाची गरज आहे आणि म्हणून या लेखामध्ये याच विषयाचा ऊहापोह करणार आहोत.

सोशल मीडियाचा चांगला वापर होऊ शकत असला तरी त्याचे व्यसनात रूपांतर झाल्याने त्याचे दुष्परिणाम मात्र सध्या जास्त प्रमाणात दिसून येतात. वेळेचा अपव्यय होतोच आणि डोळय़ांवरतीही ताण येतो. आपले काैटुंबिक जीवन आणि समाजजीवन यांवरतीही विपरीत परिणाम होतो. इतकेच नव्हे तर यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडू शकते. आपल्या शरीरावर, मनावर, डोळय़ांवर आणि हृदयावर येणारा ताण हा वाढू शकतो.

सोशल मीडिया हे आधुनिक काळाचे प्रतीक आहे. त्याचा वापर मात्र मर्यादित हवा

प्रत्याहार

यावरती उपाय काय बरे? प्रत्याहार म्हणजे बहिर्मुखतेपासून अंतर्मुख होण्याची क्रिया. व्हॉट्सअॅप किंवा इतर मीडियामुळे आपण बाह्य जगाशी सतत संपका&त असतो आणि बाह्य जगातील प्रवाहांचा परिणाम आपल्यावरती होत असतो. हे टाळण्यासाठी या सोशल मीडियावरती आपण किती वेळ देणार आणि केव्हा देणार याची मर्यादा घालून घ्यावी. डेटा नेटवर्क सतत चालू ठेवण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आवश्यकता नसेल किंवा सोशल मीडिया मेसेज बघून झाले की लगेच डेटा नेटवर्क बंद करून टाकावे. यामुळे मोबाईलच्या बॅटरीची बचत होतेच, पण त्याचप्रमाणे आपलाही वेळ आणि ऊर्जा वाचते. डोळय़ांवरती तणाव कमी होतो. झोप चांगली लागते. आपण कुटुंबीयांना, मित्रांना अधिक वेळ देऊ शकतो.

छंदाची जोपासना (विहार)

अर्थात जर आपण प्रयत्न करूनही सोशल मीडिया ऑडिक्शनपासून दूर होऊ शकत नसलो तर प्रयत्नपूर्वक आपले लक्ष दुसरीकडे वळवावे अर्थात दुसऱया एखाद्या गोष्टींमध्ये आपले लक्ष गुंतवावे. पुस्तक वाचनाची आवड लावून घ्या. पुस्तकांसारखा मित्र नाही आणि पुस्तक वाचनासारखा छंद नाही. एखादे वाद्य किंवा एखादी नवीन कला शिकून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये वेळ घालवा. आपल्या धर्मशास्त्र पुराणांचे वाचन घरामध्ये करा. काही वर्षांपूर्वी घरामध्ये रात्री झोपण्यापूर्वी पुराणे वाचायचा परिपाठ होता. असा परिपाठ पुन्हा सुरू केल्यास आपली भावीपिढी ही आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊ शकेल आणि सर्वांचाही वेळ चांगला जाऊ शकेल. पुस्तक वाचनामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होते. कला आपण शिकतो आणि या सर्वांमधून आपण जे काही ग्रहण करतो त्यालाही आपण एकप्रकारे आहार म्हणू शकतो आणि सोशल मीडियाच्या आहारी जाण्यापेक्षा ज्ञान आणि कला यांचा आहार हा नेहमीच उत्तम पर्याय ठरतो आणि या गोष्टींमुळे आपल्याला वैयक्तिक विकासाला, आपल्या कुटुंबाच्या विकासालाही नक्कीच सहाय्य मिळते.

तरी यापुढे सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर टाळा. सोशल मीडियाच्या आहारी जाणे टाळा आणि पुस्तके, कला, छंद यांमध्ये वेळ घालवा. कुटुंबीयांना वेळ द्या, आपल्या मित्र परिवाराला वेळ द्या.

www.bymyoga.in