
आहार या शब्दाला जर आपण थोडा व्यापक अर्थ दिला तर आहार या संकल्पनेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो. आपण आपल्या चेतासंस्थेद्वारे किंवा आपल्या ज्ञानेन्द्रियांद्वारे ज्या ज्या गोष्टी बाह्य जगतापासून किंवा पंचमहाभूतांपासून ग्रहण करतो त्या सर्व गोष्टींचा समावेश हा आहारामध्ये होऊ शकतो व आहाराची व्याख्या बहुसमावेशक ठरते.
याच संदर्भामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जिचा आपण आहार या संकल्पनेत समावेश करू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय या शब्दाचेही अनेक पैलू आहेत, परंतु सामान्य अर्थ आहे आपल्या धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा अभ्यास, वाचन, पठण, मनन आणि चिंतन. तसेच ज्या व्यवसायामध्ये आपण कार्यरत आहोत त्या व्यवसायाशी संबंधित अद्ययावत ज्ञान किंवा माहिती यांचाही समावेश स्वाध्याय या संकल्पनेत होऊ शकतो.
दोन पिढय़ांपूर्वीपर्यंत आपल्या देशातील घरांमध्ये धार्मिक पुस्तकांचे वाचन, मनन हे नित्य होत असे. रोज संध्याकाळी दिवे लागणी झाल्यानंतर किंवा रात्री जेवण झाल्यानंतर घरातील प्रौढ व्यक्ती रामायण, महाभारतासारखे ग्रंथ किंवा नवनाथ कथासार, भक्तिविजय आदी रसाळ ग्रंथांचे पारायण किंवा पठण करीत असत. ही प्रथा आता लुप्त होत चालली आहे आणि ही जागाही टीव्ही आणि सोशल मीडिया यांनी घेतली आहे. याचे दुष्परिणाम भयानक आहेत. एक तर या गोष्टीमुळे आपली भावीपिढी ही संस्कृतीपासून दूर जात आहे. आपली संस्कृती, परंपरा, आपल्या पौराणिक कथा, आपला इतिहास हा आजच्या पिढीला ज्ञात नाही किंवा त्याबद्दल त्यांना फार कमी माहिती आहे आणि म्हणूनच या ग्रंथांचे वाचन, पठण होणे आवश्यक आहे. असे कोणते ग्रंथ आहेत की ज्यांचे वाचन, पठण आपण केले पाहिजे? भागवत, गीता, वेदांशी संबंधित पुस्तके, रामायण, महाभारत, भक्तिविजय, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, रामदासांचा दासबोध, मनाचे श्लोक, मोरोपंतांच्या आर्या आणि केकावली अशा अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा संदर्भ येथे आपल्याला देता येईल.
यांचा समावेश जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला, या ग्रंथांसाठी जर आपण रोज सहपरिवार सहकुटुंब अर्धा तास जरी दिला तरी हिंदुस्थानची येणारी पिढी आपल्या संस्कृतीशी, परंपरांशी पुन्हा संलग्न होईल. आपल्या सांस्कृतिक मूल्यांची जाणीव तिला होईल आणि आपल्या इतिहासाचा सार्थ अभिमान तिला निर्माण होईल, परंतु यासाठी या ग्रंथांचे वाचन, पठण आवश्यक आहे. असे ग्रंथ हे देशातील प्रत्येक भाषेमध्ये आहेत.
नियम काय
आहार या संकल्पनेमध्ये स्वाध्याय म्हणजे धर्मशास्त्रांचे वाचन याचा समावेश मुद्दाम करत आहे. स्वाध्याय हेसुद्धा योगाभ्यासाच्या नियम या अंगाचे एक उपांग आहे आणि त्याचा समावेशही आहारामध्ये केला पाहिजे. रोज अर्धा ते एक तास यासाठी देणे अपेक्षित आहे आणि युक्तही आहे. आपले तत्त्वज्ञान फारसे पंटाळवाणे होऊ न देता रसाळ भाषेमध्ये आपल्या मुलांना सांगता आले तर ही पालकांसाठी एक फार मोठी उपलब्धी ठरू शकते.
>>सीए अभिजित कुळकर्णी योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in




























































