>> चंद्रसेन टिळेकर
मानवाची प्रगती प्रश्न विचारण्यातूनच झालेली आहे असा ठाम विश्वास विवेकिजनांचा असतो आणि तो मुळीच चूक नाही. जेव्हा पाठय़पुस्तकातून आपण धर्म तत्त्वाची पेरणी करायचा निर्धार करतो तेव्हा एका परीने प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीचाच आपण गळा घोटीत आहोत, हे नीट लक्षात घेतले पाहिजे.
नास्तिक किंवा निरक्षर लोक सोडले तर देव आणि ईश्वर सर्वसामान्यांचा जिव्हाळय़ाच्या, श्रद्धेचा विषय! अर्थात हा जिव्हाळा, ही श्रद्धा जोपर्यंत त्या व्यक्तीच्या किंवा महत्त्वाचं म्हणजे समाजपुरुषाच्या विकासाच्या आड येत नाही तोपर्यंत कुणीही अस्वस्थ होण्याचे काही कारणच नाही. परंतु अनेकदा अशा श्रद्धावान व्यक्ती एकत्र आल्याने जेव्हा त्यांचे रूपांतर झुंडीत होते तेव्हा मात्र तटस्थ राहणे समाजस्वास्थाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते. कारण या झुंडीतूनच पुढे धार्मिक जल्लोष आणि त्या जल्लोषातून धार्मिक उन्माद निर्माण होण्याचा मोठा धोका असतो. कुठल्याही रस्त्यावरच्या मिरवणुकीत डीजे लावणे यावर कायद्याने बंदी असली तरी धार्मिक मिरवणुकीत मात्र ते पथ्य पाळले जात नाही. पोलिसही तक्रार केल्यावर दखल घेत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की, ‘आम्ही धार्मिकबाबतीत ढवळाढवळ करीत नाही.’ यामुळे सर्वसामान्य माणूसही धर्माच्या नावाने होणारा हा अन्याय, अत्याचार सहन करीत असतो.
खरे तर धार्मिक, भाविक मंडळींनी हे आपण होऊन थांबवले पाहिजे. परंतु धर्माची नशा भल्याभल्यांना काही सुचू देत नाही असे म्हटले जाते ते खरेच आहे. तेव्हा आता आपल्या समाजाने धार्मिकतेला मुरड घालून विवेकी विचारांकडे वळणे अत्यंत निकडीचे झाले आहे. विवेकी विचारांची ही पेरणी आपल्याला बालवयातच करावी लागेल हे उघड आहे. त्याचबरोबर हेही उघड आहे की, त्यांच्यासाठी जी पाठय़पुस्तके तयार करावी लागतील त्यांच्यामध्ये दुरूनही धार्मिक विचारांची घुसळण असता कामा नये. परंतु याबाबतीत आपल्या शासनाची गंगा उलटी वाहू लागल्याचे दिसत आहे. आपल्या धर्मग्रंथातील शिकवण कोवळ्या वयातील मुलांच्या मनात कोंबण्याचा चंग शासनाने बांधला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘आम्ही धर्मातील फक्त चांगल्या तेवढय़ा गोष्टी शिकवणार आहोत.’ हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान कवटाळून बसलेल्या धर्मग्रंथात शासन म्हणते तसे चांगले काही निवडायला जावे तर ‘उडीदा माजी काळे गोरे काय निवडावे’ अशीच परिस्थिती झाली तर त्यात नवल ते काय?
अगदी स्पष्टपणे सांगायचे तर हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले धर्मग्रंथ विज्ञानाने आपल्या अस्तित्वाने केव्हाच कालबाह्य करून टाकले आहेत. तेव्हा त्यातले ज्ञान फुंकून फुंकूनच घ्यावे लागेल यात काही शंका नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, देव, धर्म, धर्मग्रंथ, अध्यात्म ही भक्तिमार्गाकडे लोटणारी आयुधे आहेत. एकदा भक्तिमार्ग स्वीकारला की, आपली ज्ञानेंद्रिये सत्याला पारखी होतात. कारण भक्तिमार्गात श्रद्धा प्रमाण असते आणि तीही गुरू सांगेल ती! प्रश्न विचारणे औद्धत्याचे लक्षण मानले जाते. इथेच विवेकीजन आणि भाविकजनांचे द्वंद सुरू होते. मानवाची प्रगती प्रश्न विचारण्यातूनच झालेली आहे असा ठाम विश्वास विवेकीजनांचा असतो आणि तो मुळीच चूक नाही. तेव्हा पाठय़पुस्तकातून जेव्हा आपण धर्म तत्त्वाची पेरणी करायचा निर्धार करतो, तेव्हा एका परीने प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीचाच आपण गळा घोटीत आहोत हे नीट लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा पाठय़पुस्तकातून काय किंवा इतर मार्गानेही, कोवळ्या वयातील मुलांवर धार्मिक संस्कार करताना आपणच आपला हात आखडता घेतला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विज्ञान आणि भाविकता एकत्र नांदू शकत नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विज्ञान युगात जर आपण भाविकतेला महत्त्व देणार असू तर आपल्या या गरीब देशाचा पाय बुडत्याप्रमाणे खोलातच जाईल याची जाणीव आपण सदैव ठेवली पाहिजे यात काही शंका नाही.
आता गंमत अशी आहे की, ज्या आपल्या देव-देवतांबद्दल अन् एकूणच भक्तिपंथाबद्दल भाविक मंडळी एवढी हळवी असतात त्या अध्यात्माच्या क्षेत्रात तरी एकवाक्यता आहे का? इथे कविवर्य कुसुमाग्रजांच्या एका वचनाचा आधार घ्यावासा वाटतो. ते म्हणतात, ‘विश्वाचा आकार केवढा, तर ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा.’ त्यात चालीवर असे म्हणता येईल की, ‘देव दिसतो कसा, राहतो कसा तर भक्ताचा मेंदू असेल तसा.’ भक्त आक्रस्ताळी असेल तर त्याच्या कल्पनेतल्या देवाच्या हातात गदा, कुऱहाड, तलवार असले काही शस्त्र दिल्याशिवाय त्याच्या देवाला देवपण येणारच नाही. हे झाले दिसण्याबद्दल, पण देवाने काय ल्यावे, काय नेसावे याचे स्वातंत्र्यही देवाला नसते (तो विश्व पालनकर्ता असला तरी) तो अधिकार भक्तांचा. काही वर्षांपूर्वी पंढरीच्या विठोबाने काय पेहरावे याबद्दल पुजारी अन् भक्तमंडळीत सुंदोपसुंदी झाली होती. काही भक्तांचे म्हणणे पडले की, विठोबा म्हणजे देवाधिदेव. तेव्हा त्याचा पोषाखही तसाच साजेसा पाहिजे. म्हणजे अगदी जरी-भरजरी धोतर -बंडी असली तरी रेशमी मुलायमी, तर दुसऱया भक्तांचा जत्था हात सावरीत म्हणाला, विठोबा हे गोरगरीबांचे दैवत आहे. त्याचा पोशाख भरजरी असा चालणार नाही तर भरताडच पाहिजे. विठोबा आपला कमरेवर हात ठेवून मुकाटपणे आपले वस्त्रपुराण ऐकत होता. इथे असे झाले होते की, आले भक्तांचिये मना, तिथे देवाचे काही चालेना!
केरळमध्ये कार्तिकेय देवाचे एक मंदिर आहे, त्या देवाला बिस्किटांचा नाहीतर चॉकलेटस्चा नैवेद्य द्यावा लागतो. का तर म्हणे हे देवाचे बालपणातले रूप आहे. भक्त जर मांसाहारी असेल तर त्याचा देवही मांसाहारी आहे असे तो सोयीस्करपणे समजतो आणि त्या तीर्थक्षेत्री गेल्यावर देवाला मांसाहाराच्या नैवेद्य दाखवतो. आपल्या महाराष्ट्रात असे मारून मुटकून मांसाहारी केलेले देव बरेच आहेत. एकवेळ हेही परवडले, पण गुजरातमधील काही देवतांना म्हणे मद्याचाच नैवेद्य दाखवावा लागतो. तेव्हा देवाला जाताना नारळ, हार, फुले घेऊन जातात ना तसे तिथे देवासाठी बाटली घेऊन जातात. तळीरामांना इथे किती प्रतिष्ठा असेल याची कल्पनाच केलेली बरी!
थोडक्यात काय तर, आले भक्तांचिये मना, तिथे देवाचे काही चालेना!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)