
>> चंद्रसेन टिळेकर
संध्याकाळची वेळ होती. गावच्या घरात असाच काहीतरी पुस्तक वाचीत बसलो होतो, तेवढय़ात 15-20 तरुण पोरे अंगणात आली. त्यातल्या एकाने मला आत येऊन सांगितले,
‘भाऊ पोरांना तुझ्याशी बोलायचंय, बाहेर येता का जरा?’
एवढी मुलं घरात मावणे कठीणच होते, तेव्हा मी बाहेर आलो. मुलं भाऊबंदकीतलीच होती, तेव्हा त्यांना मी ओळखत होतोच.मी त्यांना विचारलं,
‘काय झालं रे बाबांनो, एवढे घोळक्याने आलात?’
त्यांचं एकमेकांना तू बोल – तू बोल असे चालले होते.
शेवटी त्यातल्या एकाने जरा जाब विचारण्याच्या स्वरातच विचारलं,
‘भाऊ, तू गावातल्या लोकांना म्हणे सांगतो की जगात भूत बित काही नसते.’
‘हो. खरे तेच मी सांगतो, त्यात काय चुकलं?’
‘कमाल आहे भाऊ तुझी, तू आमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, तुला तर माहीतच असलं पाहिजे की आपल्या माळवाडीत खविस नावाचे भूत आहे आणि किती तरी लोकांना त्या भुताने आपटून आपटून मारले आहे.’
त्या पोरांचे खरे होते. मी त्या खविसाबद्दल अनेकदा लहानपणापासून ऐकत आलो होतो आणि चांगला मोठा होईपर्यंत माझाही विश्वास होता. विश्वास होता त्याचे खरे कारण त्या खविसाचा जोडल्या गेलेल्या एका ऐतिहासिक धनाशी संबंध हे होते.त्या धनाबद्दल शेकडो वर्षे अशी अख्यायिका होती की, शिवाजी राजाने देहूच्या संत तुकोबाला सात गाडय़ा धन पाठवले होते, पण ‘सोने नाणे आम्हा मृत्तिकेसमान’ असे म्हणून तुकोबांनी त्या गाडीवानांना ते धन परत न्यायला सांगितलं, पण त्या गाडीवानांनी ते धन परत न नेता त्या पिंपळाच्या झाडाखाली पुरले. त्या आख्यायिकेवर विश्वास ठेवून अनेकांनी ते धन काढायचा प्रयत्न केला, पण ज्यांनी ज्यांनी असा प्रयत्न केला त्या सगळ्यांना त्या झाडावरील खवीस जो त्या धनाचा रक्षक मानला गेला होता, तो खाली उतरून त्या माणसाला आपटून आपटून त्याने ठार मारले होते. माझ्याशी वाद घालायला आलेल्या त्या तरुण पोरांनी तर आमच्याच वाडीतील 30 लोकांची मला चक्क नावे सांगितली ज्यांनी ते धन काढण्याचा प्रयत्न केला होता आणि खविसाने त्यांना जिवे मारले होते. ज्यांची ज्यांची नावे मला सांगितली त्या सर्वांना मी ओळखत होतो आणि त्यातले कुणी जिवंत नव्हते तेही खरे होते, परंतु त्यांना खरंच खविसाने मारले होते की ते त्या झाडाजवळून जाताना केवळ भीतीने घाबरून परलोकी गेले हे सांगणे कठीण होते. मी गप्प बसलेलो पाहून त्या पोरांना चेव आला. ते मला म्हणाले, ‘बघ भाऊ, तुला जी नावे सांगितली त्यांना तू ओळखत होतास, आता बोल, जगात भूत असते की नाही?’
ती ओळखीची नावे आणि त्यांची खविसाने केलेली अखेर ऐकून मी नाही म्हटलं तरी गांगरलो होतोच, पण आता माघार घेणे अवसानघातकी झालं असतं. मग मी अवसान गोळा करून म्हणालो, ‘तुम्ही काहीही म्हटलं तरी भूत नसते असेच मी छातीवर हात ठेवून सांगतो.’ ‘ठीक आहे. मग तुझी हिंमत असेल तर ते धन काढून दाखव, जर तुला काहीच झाले नाही तर आम्ही समजू जगात भूत नसते.’
मी त्यांना म्हणालो, ‘मी आव्हान एका अटीवर स्वीकारतो, ते म्हणजे धन असो नसो, मी ते काढण्याचा प्रयत्न करून झाल्यावरही खवीस आला नाही आणि मी जिवंत राहिलो तर जगात भूत नाही असा तुम्ही प्रचार करायचा.’
सगळ्यांनी होकार दिला. काही दिवसांनी अमावास्या येत होती. त्या दिवशी ते धन काढायचा प्रयत्न करायचे असे ठरले. त्याप्रमाणे मी मुंबईहून दोन दिवस अगोदरच गेलो. कारण कुदळी, फावडी, घमेली लागणार होती, ती तयार ठेवणे गरजेचे होते, परंतु मला कुणी साहित्यच देईनात. गावकऱयांचे म्हणणे पडले की मी मुंबईला निघून जाईन, पण खवीस त्यांना धरील.
मोठा बाका प्रसंग होता. शेवटी मी गावातल्या सरपंचाकडे गेलो, त्यांचे नाव पांडोबा गायकवाड असे होते. गडी चांगलाच आडदांड होता, कुस्त्या मारायचा. खरं तर ते पैकाडी समाजातले होते, पण पुरोगामी विचाराचे होते. खविसाच्या भीतीने लोक साहित्य देत नाही असं सांगितल्यावर पांडोबांनी एक इरसाल शिवी खविसाच्या नावाने घातली आणि मला म्हणाले- चल, माझ्याबरोबर, बघतो कसे तुला कोणी सामान देत नाही ते. आणि त्यांनी आठ दहा घरांतून मला सामान द्यायला लावले. सरपंचांना कोण नाही म्हणणार? मी सरपंचांना म्हणालो की, वाडीतले लोक म्हणतात की, तीन कुदळी मारून होतात न होताच खवीस येतो आणि त्या माणसाला जिवे मारतो.
तसे पांडोबा सरपंच म्हणाले, ‘असं आहे होय? मग पहिली कुदळ मारायला मीच येतो. आलाच खवीस तर त्यालाच आपटून आपटून मारीन.’ पांडोबाच्या देहाकडे पाहिल्यावर कोणालाही ते पटले असते.
रात्री बारा वाजता खोदकाम करायचे ठरले होते, तसे मी सरपंचांना सांगितले. ते म्हणाले, मी येणार म्हणजे येणार. पुण्याला तेव्हा डॉ. बोरकर अंनिस या संस्थेचे काम पाहायचे. ते 25- 30 अंनिसचे कार्यकर्ते घेऊन आले. त्यात महिला कार्यकर्त्या प्राधान्याने होत्या आणि विशेष म्हणजे ते पत्रकारांनाही घेऊन आले होते.
देहुगावच्या परिसरात चारशे वर्षांपूर्वीचे धन काढले जाणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रात्री बाराच्या सुमारास जवळ जवळ 500 -600 ग्रामीणवासीय जमा झाले होते. त्यांनी धन काढणाऱया माणसाला खवीस ठार मारतो हे ऐकलेले होतं. त्यामुळे एकापरीने ते माझ्या मरणाचा सोहळा पाहयलाच जमले होते.
रात्री बरोबर बारा वाजले तशी पहिली कुदळ सरपंचांनी मारली. तशी जमलेला मोठा जमाव मागे सरला. कारण तीन कुदळी मारताच खवीस झाडावरून खाली येतो अशी श्रध्दा होती. दुसरी कुदळ मी मारली. जमाव आणखी मागे गेला. मग ‘अंनिस’ या संस्थेच्या स्त्राr कार्यकर्त्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी एकापाठोपाठ कुदळी मारल्या. सारा जमाव जीव मुठीत धरून ते पाहात होता. चांगला अर्धा पुरुष उभा राहील असा मोठा खड्डा आम्ही खणला, पण धन काही सापडले नाही आणि त्या धनाचा कथित रक्षक तो खवीसही आला नाही. जमलेला मोठा समाज काहीसा चकित अन् बराचसा निराश झाला होता. कारण ते जे पाहायला आले होते ते त्यांना पाहायला मिळाले नव्हते. मी पारावर चढून भूत ही कशी अंधश्रध्दा आहे हे सांगितले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भातले अनुभव सांगितले. शेवटी जमाव पांगला.
दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांच्या पुणे आवृत्तीत ‘खवीस पळाला’ म्हणून ठळक अशा हेडलाईन्स पडल्या. इतपंच नव्हे तर देहू परिसरातील शाळांनी याबद्दल वर्गातून सर्क्युलर फिरवले व यापुढे मुलांनी तिथून जाताना अजिबात घाबरू नये सांगण्यात आले. जे शेतकरी खविसाच्या भीतीने त्या पिंपळाच्या झाडाजवळील शेतावरून लौकर घरी परतायचे तेही निर्धास्त झाले. तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आनंदी आनंद झाला. तुकोबांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असे झाले.


























































