संस्कृती-सोहळा : इंदूरची देखाव्यांची जुनी परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनश्री देसाई (तोडेवाले)

माता अहिल्याबाईंच्या कारकीर्दीत इंदूरमध्ये कला आणि संस्कृतीची भरभराट झाली. याचबरोबर त्यांनी इंदूरला व्यापार केंद्र हा लौकिक मिळवून दिला. कापड मिल ही इंदूरची आणखी एक ओळख. कला, संस्कृती आणि व्यापार असा मिलाफ असणाऱया इंदूरमध्ये अनंत चतुर्दशीला दाखवण्यात येणारे कापड मिल देखावे प्रसिद्ध आहेत. केवळ मिल कामगारांच्या प्रयत्नांमुळे ही परंपरा आजही जिवंत आहे असेच म्हणायला हवे.

कलेचा आणि इंदूरचा खूप जुना संबंध आहे. अगदी लता मंगेशकर, रामू भैया दाते यांच्यासारखे आणि अनेक मोठे कलाकार इंदुरात जन्मले आणि जगभर प्रसिद्ध झालेत. इंदूरनं कला आणि संस्कृती भरभरून दिली आपल्या लोकांना. जसं आई आपल्या कुशीत जपून कला शिकवते तसंच माता अहिल्याबाईंच्या कारकीर्दीत कला आणि संस्कारांची इंदुरात भरभराट झाली. कला, संस्कार इथे त्यांच्याच सावलीत रुजले, फुलले आणि खूप वाढले.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इंदूरमध्ये गणपती उत्सवात अनेक ठिकाणी भव्यदिव्य साजसज्जा करण्यात आली होती. कलाकार, कला दिग्दर्शक मोठी आरास आणि लाखोंचा कारभार असं चित्र काही ठिकाणी होतं तर कुठे परंपरा जिवंत ठेवण्यासाठी माणसं आपल्याच पगारातून हातभार लावून ऐतिहासिक ठेव अजरामर झाली पाहिजे यासाठी झटणारी मंडळी, स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांच्या शासनात आपली संस्कृती लयास जातेय हे बघून जुन्या गणपती उत्सवाला नवीन स्वरूप देऊन सुरू केले आणि ते सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून जगभर ओळखले गेले आणि त्याला क्रांती म्हणून सर्वांनी मनावरही घेतले. इंदुरातही ही चळवळ सुरू होतीच. राजवाडय़ावर गणपती बसवले गेले आणि गणेश हॉलमध्ये आरास केली गेली. 19 व्या शतकात इंदुरात अनेक कापड मिल सुरू झाल्या. तसं इंदूर हे 16 व्या शतकात जेव्हा पेशव्यांकडून होळकरांना माळव्याची सुभेदारी सोपवली गेली तेव्हाही इंदूर हिंदुस्थानातली एक आर्थिक आणि व्यापारिक राजधानी होतीच. व्यापार केंद्र म्हणून इंदूरचा नावलौकिक होता.

1715 च्या दरम्यान स्थानिक जमीनदारांनी नर्मदा नदीच्या घाटाचा मार्ग वापरून इंदूरला व्यापार केंद्र म्हणून स्थापन केले. 17 व्या शतकात मल्हारराव होळकरांनी पेशव्यांच्या साथीनं अनेक लढाया जिंकल्या. 18 मे 1724ला इंदूरला मराठा साम्राज्यात सामील केलं गेलं आणि 1733 साली इंदूर हे पुरस्कार म्हणून मल्हाररावांना सोपवण्यात आलं. 1767 मध्ये अहिल्याबाईंनी राज्याची धुरा हाती घेत महेश्वरला राजधानी केलं, पण इंदूर हे व्यापरिक आणि सैन्याचं केंद्र कायम स्वरूपी राहिलं. मग कालांतराने पुन्हा इंदूरला राजधानी करण्यात आलं. अर्थात इंदूर हा व्यवसायाचा खूप मोठा केंद्र होळकरांच्या कारकीर्दीपासूनच होता आणि त्यांच्या शासकीय वाटचालीत तो वाढलाही.

काळ बदलला, अहिल्याबाईंच्या निधनानंतर शासक बदलले आणि हळूहळू सरकार आली आणि सगळा मराठी कारभार हिंदीत होऊ लागला. हिंदी भाषिक व्यावसायिकांनी इंदुरात वास्तव्य केले आणि कापड मिल उभारल्या गेल्या.

साधारण पहिली मिल स्थापित झाली 1907 साली सर हुकूमचंद यांची. त्यांनी गणपती उत्सवात देखावा तयार केला त्यावेळी देखाव्यांसाठीं बैलगाडीचा वापर केला गेला ते वर्ष होते 1924. बैलगाडीवर कंदील लावून रोषणाई करण्यात आली होती. सर हुकूमचंद यांनी टिळकांच्या सार्वजनिक उत्सवाला पाठिंबा देण्यासाठी आपल्याच कापड मिलमधल्या कलाकार कामगारांकडून तो देखावा तयार केला. त्यानंतर इंदुरात अहिल्याबाईंना मानवंदना म्हणून अनंत चतुर्दशीला अनेक कापड मिल देखावे तयार करून त्यात सामील होऊ लागले. देखावे तयार करण्यामागे कामगारांच्या कलाकुसरीला वाव मिळावा हा हेतू होता जो अहिल्याबाईंच्या काळापासून सर्वांनी ऐकलेला होता. त्याला हळूहळू स्पर्धेचं स्वरूप देण्यात आलं. पण ही स्पर्धा ताण निर्माण करायला नसून त्यांच्या अंगीभूत असलेल्या कलेला बाहेर आणण्यासाठी होती. कामाच्या ताणातून त्यांना बाहेर काढून काही वेळ प्रसन्नता देणारी होती. आपल्या भावना ठामपणे मांडता याव्या यासाठी होती. विविध विषय मांडता यावे, आपल्या अडचणी शासनाला/ मालकांना न बोलता सांगता याव्या म्हणून होती.

आधी अनेक कापड मिल इंदुरात होत्या. स्वदेशी मिल, मालवा मिल, राजकुमार मिल, कल्याण मिल, भंडारी मिल, हुकूमचंद मिल अशा एकूण 12 मिल होत्या इंदूरला. इंदूरच्या कापडाला हिंदुस्थानभर प्रसिद्धी मिळाली तिथल्या कामगारांच्या हस्तकलेमुळे.

आधी देखावे फक्त राजवाडय़ात गणेश हॉलमध्ये मांडले जायचे. मग कालांतराने फिरणारे देखावे तयार करण्यात आले आणि ते संपूर्ण इंदूरला प्रदक्षिणा घालत (साधारणपणे 20 किलोमीटर) पुन्हा आपापल्या कापड मिलमध्ये जाऊन ठेवले जायचे. मग पुढे अनेक दिवस लोक तिथे जाऊन ते देखावे बघायचे. पण बंडखोरी होण्याच्या भीतीने शासनाने काही नियम बसवले. देखावे तयार झाले की त्यांची तपासणी व्हायची, कारण देखावा बघून जनतेवर काय परिणाम होईल त्या देखाव्यांचा याचा विचार केला जायचा. 1991 साली तेव्हाच्या शासनाच्या दुर्लक्षामुळे कापड मिल बंद पडल्या. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत झाल्या आणि अशा बसल्या की पुन्हा उभारी नाही घेऊ शकल्या.

हळूहळू राज्यातल्या सर्व मिल बंद झाल्या आणि लोकांना इतर कामासाठी धावपळ करावी लागली, पण देखाव्याच्या या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी कापड मिलमधले कर्मचारी वर्षभर नोकरी करतात आणि अनंत चतुर्दशीच्या 2 महिन्यांपूर्वी मेहनतीनं देखावे तयार करतात. आपल्या उत्पन्नाचा एक वाटा त्याचसाठी ठेवतात. मिल बंद होण्यापूर्वीही सारे कामगार एक दिवसाचा पगार या देखाव्यांना तयार करण्यासाठी वर्गणी म्हणून जमा करायचे. आता मिल बंद होऊन अनेक वर्षे झालीत तरीही या कामगारांप्रमाणे ही 100 वर्षे जुनी इंदूरची परंपरा आणि हा सांस्कृतिक वारसा आहे आणि याला पिढय़ान् पिढय़ा हस्तांतरित करणे आपले कर्तव्य आहे.

अनंत चतुर्दशीला हे देखावे निघतात आणि ते बघायला इंदुरात जागोजागी लोकांची गर्दी असते. रात्री 10च्या सुमारास मिलमधून हे देखावे निघायला सुरुवात होते आणि राजवाडय़ाला प्रदक्षिणा घालत व सलामी देत सकाळी 8 वाजता हे देखावे आपापल्या मिलमध्ये परततात. आजही सर्व मजुरांनी आपापल्या परीने पैसे गोळा करून ही परंपरा जिवंत ठेवली आहे. स्पॉन्सर मिळो वा ना मिळो, हा गरीब मजदूर वर्ग आपली परंपरा जिवंत ठेवून अहिल्याबाईंना मानाचा मुजरा करतोय. अनेक कामगारांनी आता वयाच्या 70-75 वर्षांत पदार्पण केलेय. शरीर थकलेय, पण उत्साह आणि जिद्द कायम आहे. काही वर्षांपासून इंदूर नगरपालिका आणि इंदूर विकास प्राधिकरण यांच्याकडून थोडी का होईना आर्थिक मदत मिळतेय, पण तितकी पुरेशी पडत नाही.

विद्युतशक्तीचा सुरेख वापर करून हे देखावे तयार केले जातात. कामगारांच्या मेहनतीचे कौतुक करायला आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला संपूर्ण इंदूर एकत्र होऊन जागरण करून हे देखावे बघतं. अनेक आखाडे, व्यायामशाळेची मुलं अनेक प्रकारचे मैदानी खेळ, कलाबाजी करणारेही यात सामील असतात. मेहनतीला सलाम करण्यासाठी लहान मुलापासून वयोवृद्ध मंडळी ही आपली हजेरी लावतात. अनेक लोक गावा, शहरातून फक्त देखावे बघण्यासाठी येतात.

शासनाने अश्या जुन्या पण वैभवशाली परंपरेला जपलंच पाहिजे. किमान त्या परंपरेला जपणाऱयांना पाठिंबा दिला पाहिजे एवढीच त्यांची मागणी आहे. कारण या देखाव्यांना तयार करायला दोन महिन्यांचा पगार देण्यात येतो, पण तो फारच नाममात्र असतो. हे देखावे इंदूरची ऐतिहासिक ठेव आहे आणि कुठलीही मिळकत नसलेले हे कामगार/कलाकार याच ऐतिहासिक ठेव्याला, संस्कार आणि परंपरेला जिवंत ठेवत आहेत हे अभिमानास्पद आहे.

– [email protected]