पश्चिम रंग – नाट्यमय शोकांतिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील

उत्कट प्रेम, फसवणूक आणि नाट्यमय शोकांतिका असणाऱया ‘स्वान लेक’या बॅलेसाठी संगीत रचणं हे चायकॉस्कीचं एक स्वप्न होतं आणि  त्याने या बॅलेसाठी अतिशय भावपूर्ण संगीत रचलं. चायकॉस्कीचं ‘स्वान लेक’चं संगीत आजही प्रचंड लोकप्रिय आहे. जगभरात सर्वात जास्त सादर होणाऱया बॅलेमध्ये ‘स्वान लेक’चा समावेश होतो.

आपण मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे ‘स्वान लेक’च्या कथानकात राजकुमार सिग्फ्रिड आपल्या मित्रांसहित जंगलात जातो. तिथे त्याला एका तळ्याजवळ हंसांचा थवा दिसतो. एका हंसाचं रूपांतर एका तरुणीमध्ये होताना तो पाहतो. त्या तरुणीचं नाव ओडेट असं असतं. एका दुष्ट जादूगाराने केलेल्या जादूमुळे तिचं हंसामध्ये रूपांतर होत असल्याचं त्याला कळतं. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो. कधीही प्रेमात न पडलेला एखादा तरुण ओडेटच्या प्रेमात पडला आणि जर त्याने तिला जन्मभर प्रेम करण्याचं वचन दिलं तरच या जादूतून त्यांची सुटका होणार असते. ओडेट ही सारी गोष्ट सांगताना तिथे तो दुष्ट जादूगार येतो. सिग्फ्रिड त्याला मारण्यासाठी आपलं धनुष्य उचलतो, पण ओडेट त्याला बाण मारण्यापासून रोखते.

यानंतर तिसरा अंक सुरू होतो. आता राजकुमार सिग्फ्रिड राजवाड्यात पोहोचलेला असतो. रीतिरिवाजाप्रमाणे त्याला आज आपली होणारी पत्नी निवडायची असते. त्याला वेगवेगळ्या प्रदेशांमधून आलेल्या पाच तरुणींपैकी एका तरुणीची आपली पत्नी म्हणून निवड करायची असते. अर्थातच तो आता ओडेटच्या प्रेमात पडलेला असतो. त्यामुळे या पाच तरुणींमधली कुणीही त्याला पसंत नसते. तो आपल्या आईला तसं सांगतो. इतक्यात आमंत्रण नसणारे दोन लोक तिथे येतात. खरं तर हे दोघे म्हणजे दुष्ट जादूगार आणि त्याची मुलगी असतात. पण जादूगार पित्याने केलेल्या जादूमुळे ती मुलगी ओडेटसारखी दिसत असते. तिला पाहून सिग्फ्रिड प्रचंड आनंदी होतो. सिग्फ्रिड तिच्यावरचं प्रेम व्यक्त करतो आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवतो.

जादूगार सिग्फ्रिडकडून तिच्याशी लग्न करण्याचं वचन मागतो. सिग्फ्रिड त्यांना विवाहाचं वचन देतो. आता जादूगार आणि त्याची मुलगी आपल्या मूळ रूपात येतात. सिग्फ्रिडला आता आपली चूक कळते. आता ओडेटच्या सुटकेचा मार्ग बंद झालेला असतो. कारण त्याने ओडेट सोडून वेगळ्याच तरुणीला लग्नाचं वचन दिलेलं असतं. दु:खी झालेला सिग्फ्रिड राजवाड्यातून बाहेर पडतो. ओडेटला शोधत जंगलातल्या तळ्याजवळ येतो.

चौथ्या अंकात तळ्याजवळचं दृश्य दिसतं. सिग्फ्रिड ओडेटची माफी मागतो आणि ती त्याला माफही करते, पण आता काहीही करून तिची सुटका होणार नसते. तळ्यात बुडी मारून ती आपलं आयुष्य संपवते. तोही तिच्यापाठोपाठ तळ्यात उडी मारून आपलं आयुष्य संपवतो.

उत्कट प्रेम, फसवणूक आणि नाट्यमय शोकांतिका असणाऱया या बॅलेसाठी संगीत रचणं हे चायकॉस्कीचं एक जुनं स्वप्न होतं. त्याने या बॅलेसाठी अतिशय भावपूर्ण संगीत रचलं, पण हे संगीत बॅलेमधलं नृत्य सादर करण्यासाठी अवघड होतं असं बॅलेमधल्या नर्तकांना वाटलं. हे संगीत रचताना

चायकॉस्की संगीतात इतका बुडून गेला की, जितकं संगीत रचायला हवं होतं त्यापेक्षा थोडंसं जास्तच संगीत त्याने रचलं. पुढे चायकॉस्कीच्या मृत्यूनंतर हा बॅले सादर होताना या संगीतात बरीच काटछाट झाली.

‘स्वान लेक’मधलं सारंच संगीत लोकप्रिय असलं तरी पहिल्या अंकातला ‘वॉल्ट्झ’ हा विशेष लोकप्रिय आहे. पहिल्याच अंकात सिग्फ्रिड वयात आल्यानिमित्त जो कार्पाम चालू असतो, त्या कार्पामासाठी हे वॉल्ट्झ संगीत वापरलं गेलेलं आहे. याशिवाय दुसऱयाच अंकाच्या सुरुवातीला येणारं ‘स्वान लेक’ची थीम म्हणून ओळखलं जाणारं संगीतही सर्वात लोकप्रिय रचनांपैकी एक आहे. याच अंकात तळ्याजवळ होणाऱया हंसांच्या नृत्यासाठी वापरलं गेलेलं संगीतही प्रचंड लोकप्रिय आहे. नंतरच्या काळात ‘स्वान लेक’चं संगीत इतकं लोकप्रिय झालं की, 1931 साली आलेल्या ‘ड्रक्युला’पासून ते 2023 मध्ये आलेल्या ‘फास्ट एक्स’पर्यंत कित्येक

हॉलीवूडपटांमध्ये ‘स्वान लेक’मधलं संगीत वापरलं गेलं. आज जगभरात सर्वात जास्त सादर होणाऱया बॅलेंमध्ये ‘स्वान लेक’चा समावेश होतो. चायकॉस्कीचं ‘स्वान लेक’चं संगीत जवळपास दीडशे वर्षांनंतर आजही प्रचंड लोकप्रिय का असावं, हे पाहण्यासाठी आपण यूट्यूबवर एwaह थ्aव ंaत्तू स्ल्sग्म् एकदा तरी ऐकायलाच हवं!