स्मृतिगंध – पंडितराज विद्याधर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्ञानेश पेंढारकर

गीतकार, नाटककार, संपादक, पत्रकार, राजकारणी अशी बहुविध बिरूद लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे विद्याधर गोखले. 4 जानेवारी 2023 पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख

11नोव्हेंबर 1957 या दिवशी मामा पेंडसे गोखले अण्णांना घेऊन आमच्या घरी आले. कारण होते गोखले अण्णांनी लिहिलेले नवीन संगीत नाटक ‘जगन्नाथ पंडित.’ मामांनी ओळख करून दिली, ‘हे पत्रकार विद्याधर गोखले!’ आमच्या अण्णांची भुवई वरती गेली. गोखले अण्णा मनात म्हणाले, ‘‘झालं! हे नाटक पेंढारकर घेणार नाहीत!’’ आणि कारणही तसंच होतं! ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकावरती गोखले अण्णांनी लोकसत्तेत सडकून टीका केली होती. त्याचा परिणाम इतका झाला की, 13 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्याची वेळ आली होती.

मामा पेंडसेंना खात्री होती की, गोखल्यांचे नाटक फक्त ‘ललितकलादर्श’च सादर करू शकेल आणि जर हे नाटक पेंढारकरांना आवडले तर ते नक्की रंगमंचावर आणतील! त्या दिवशी नाटकाच्या तीन अंकांचे वाचन झाले. कारण चौथा अंक अपुरा होता. आमच्या अण्णांना नाटक आवडले. तीन अंकांत हे नाटक बसवावे अशी सूचना देऊन, पुन्हा नाटकाचे वाचन करू असे सांगितले.

पुन्हा नाटकाचे वाचन झाले. वाचन झाल्यावर आमचे अण्णा म्हणाले की, ‘संवादात्मक नाटक उत्तम झाले आहे, पण तांत्रिकदृष्टय़ा कच्चे आहे. खूप काम करावे लागेल.’ त्यावर गोखले अण्णा म्हणाले की, ‘मला लक्षात आले नाही आपण काय म्हणता आहात!’ त्यावर अण्णा म्हणाले, ‘आपण कामाला लागू, आपोआप अर्थ कळेल. फक्त तुमची लिहिण्याची तयारी हवी आणि माझ्यावर विश्वास!’ गोखले अण्णा म्हणाले, ‘पेंढारकर, आपल्यामागे 50 वर्षांची नाटय़परंपरा, सिद्धारूढ स्वामी, वझेबुवा यांचा आशीर्वाद आणि आपली तपश्चर्या हे सर्व पाहता आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे!’ तो दिवस होता 27 मार्च 1958!

इथून गोखले अण्णांची, आमच्या अण्णांची आणि ललितकलादर्शची जी नाळ बांधली गेली ती गौरीशंकर आणि बावनखणीच्या रूपाने आज 64 वर्षे टिकून आहे.

साधारण जून 1960 ला नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. यादरम्यान काही लोकांनी गोखले अण्णांना सांगितले की, पेंढारकर नाटक करणार नाहीत. तुम्ही पूर्वी केलेल्या टीकेचा राग ते काढत आहेत, पण गोखले अण्णा म्हणत, काही हरकत नाही. या गुणीजनांचा सहवास लाभल्याने मला नाटक लिहिण्याचे तंत्र शिकायला मिळाले.

गोखले अण्णा एकदा मला म्हणाले, ‘‘या रियाझाचा फायदा माझ्या ‘सुवर्णतुला’ या नाटकाच्या वेळी झाला. या काळात संगीत नाटक लिहिताना शोकांतिका नको, प्रवेशावर प्रवेश यायला पाहिजेत, जेणेकरून आपले नाटक कोणालाही करता आले पाहिजे! सहज, सोपे, पण साहित्य आणि संस्कृती जपणारे नाटक कसे लिहावे, याचे धडे मिळाले, जे मी आयुष्यभर सांभाळले.’’

खरोखर गोखले अण्णांचा आमच्या अण्णांवर दाखवलेला विश्वास सार्थ झाला. 9 ऑक्टोबर 1960 साली मोठय़ा दिमाखात तीन अंकी ‘‘संगीत पंडितराज जगन्नाथ’’ या नाटकाचा हाऊसफुल प्रयोग सादर झाला. पहिला अंक सवा दोन तासांचा झाल्याने दुसऱया प्रयोगापासून चार अंकी नाटक करण्यात आले. जुन्या संगीत नाटकाच्या उज्ज्वल परंपरेतील गुणविशेषांना, सुसंगत नावीन्याची जोड देऊन उभारलेले ललितकलेचे हे संगीत, नृत्यमय नाटक नव्या पुनरुज्जीवनाचे आद्य प्रवर्तक ठरले.

केवळ दहा-बारा ओळींच्या कथेवर, काही दंतकथेवर आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर ‘‘पंडितराज’’ या यशस्वी नाटकाचा डोलारा उभा झाला, पण गोखले अण्णांचे म्हणणे वेगळे होते. ते म्हणत, ‘‘हे नाटक जरी मी लिहिले असे वाटत असले तरी हे नाटक माझ्याकडून लिहून घेतले त्या अज्ञात शक्तीने! कोणी विश्वास ठेवणार नाही, पण जिथे जिथे अडलो तिथे तिथे गंगेचे स्मरण केल्यावर लेखणी आपोआप चालू लागे. सतत ‘जगन्नाथ पंडित’, ‘गंगालहरी’ हाच विषय डोक्यात! या अवस्थेतच सुवर्णतुला नाटक कसे लिहून झाले किंवा कोणीतरी लिहून घेतले की काय हेही कळले नाही.’’ ही अज्ञात शक्ती कोण, हा प्रश्न सतत अण्णांना छळत असावा आणि म्हणूनच ते लिहून गेले की, ‘‘कोण असशी तू न कळे मजला!’’

नाटकात त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्रीचा एक शृंगारिक प्रसंग आहे. ‘नयन तुझे जादुगार, मदीर तुझे नयन तीर’ असे म्हणत शृंगारात रत झालेल्या जगन्नाथांना आपल्या बायकोच्या नयनात अचानक त्या निर्गुण निराकाराला, सगुण साकार करणाऱया जगदंबेचे दर्शन होते आणि एक काव्य जन्माला येते.

वंदनीया आदिमाया, तू चराचर मोहिनी।
कोटी कोटी चंद्रिकांचे, तेज तुझिया लोचनी।।

हा प्रवेश आठ ते दहा वेळा लिहिला गेला! प्रत्येक वेळेला निराळंच लिखाण समोर येई! त्यांचं भाषेवरील प्रभुत्व, शब्दभांडार आणि कल्पनेची भरारी हे सारंच थक्क करणारं होतं! या प्रवेशातील त्यांची प्रतिभा इतकी उच्च होती की, ती सर्वसामान्यांना झेपणारी नव्हती. शेवटी ‘आता थांबा’ असं म्हणत आतापर्यंत लिहिलेल्या प्रवेशांचे सार म्हणजे हा प्रवेश.

गोखले अण्णांचे संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू या भाषेवरील प्रभुत्व नाटक वाचताना, बघताना सतत जाणवते! जातीभेद त्यांना मान्य नव्हता म्हणून लिहितात,

मृदंगोवदत धीर-गंभीर घौषैः, पुराणे-कुराणेच रामे-रहिमे।
यदीयांतरे वर्तते भेदभावः, धिक तान, धिक तान, धिक तान, धिगेतान।।

त्यांचा बाणेदारपणा त्यांनी आयुष्यभर जपला. 1982 साली वृत्तपत्र बंद पडू नये म्हणून जिवाचे रान करणाऱया अण्णांच्या 10 साथीदारांना, संप मोडीत गेल्यावर व्यवस्थापनाकडून नोकरीत घेण्यास ‘हो’ म्हणून नंतर ‘नकार’ दिला गेला तेव्हा तिथल्या तिथे आपल्या संपादकीय खुर्चीचा राजीनामा दिला! या संपाच्या काळात लोक अण्णांच्या मागावर होते! अण्णा म्हणाले, ‘अरे कोणाच्या बापाची ताकद नाही मला हात लावण्याची!’ आणि खरंच लोक जवळ येऊनसुद्धा त्यांची हिंमत झाली नाही अण्णांना हात लावण्याची! हीच गोष्ट ते नाटकात लिहितात, ‘येऊ दे हजारो आपत्ती येऊ दे, हा जगन्नाथ त्यांना घाबरणार नाही.’

शेवटी त्यांना ध्यास लागला की, ‘एक निमिषांतरे गगन केले निळे करणारा कोण?’ आणि त्यांचा शोध प्रवास सुरू झाला 26 सप्टेंबर 1996 या दिवशी. त्या प्रवासाचे वर्णनही त्यांनी लिहून ठेवले होते.

‘‘हा प्रवास मोक्षनगरीचा प्रवास. संतापासून अनंताकडे, नाशिवंतापासून अविनाशाकडे जाणारा प्रवास! एक पाय चंद्रावर तर दुसरा सूर्यावर टाकीत कथी सूर्यमालिकांचे अग्निपराग अंगावर झेलीत, कथी शीतल चन्द्रिकेच्या अमृत तुषारांनी ओलाचिंब होत! अनेक प्रकाशांची रंगपंचमी बघत, सुसाट वादळाच्या वेगाने, माहेरी निघालेल्या मुलीच्या अधिरतेने, तारामंडळांमागून, तारामंडळं ओलांडीत, ध्रुवाच्या पाराभोवती प्रदक्षिणा घालणाऱया सस्तर्षींचा ‘सो।़ हम, सो।़ हम’’ हा घोष ऐकत हा विद्याधर त्या जगन्नाथाला शोधायला जाणार!’’