
>> दिलीप ठाकूर
आयुष्याच्या लहान-मोठय़ा प्रत्येक क्षणाचा स्वत: आनंद घेत घेत इतरांनाही त्यात सामील करून घेण्यात कायमच रस असलेल्या शिरीष कणेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक. कालच सोमवारी त्यांच्या एकूणच पन्नास बावन्न पुस्तकातील लेखनातील दोन दीर्घ खंड ’निवडक शि.क.’ या नावाने पुढील एक दोन महिन्यांतच प्रसिद्ध करण्यासंदर्भात काम कुठपर्यंत आले आहे, यावर आमचे फोनवर बोलणे झाले. तेव्हा त्यांच्या बोलण्यातील उत्साह, ऊर्जा पाहता चोवीस तासांतच अशी काही बातमी येईल असे वाटणे शक्यच नव्हते.
मी कायमच कौतुकाने म्हणतो, साठच्या दशकात म्हणजे ’ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटाच्या काळात जन्माला आलेल्या माझ्या पिढीला ’ािढकेट व चित्रपट’ यावर ’रंगीत’ वाचायला शिकवले ते शिरीष कणेकर यांनी. वृत्तपत्राचे संपूर्ण पान, मासिक/ साप्ताहिक/ दिवाळी अंक यांची चक्क दहा-बारा पाने लिहिणे आणि वाचकांना पहिल्या वाक्यापासून अगदी शेवटच्या वाक्यापर्यंत जणू पकडून ठेवणे, बाहेरच्या जगाचा विसर पडू देणे ही त्यांची खुसखुशीत, मार्मिक, मिस्कील कणेकरी शैली म्हणजे दैवी देणगी. त्यांचा स्वभाव आणि तिरकस दृष्टिकोन यातून ते येत होते आणि तेदेखील तब्बल सहा दशके.
आपले नाव आणि लेखन कायमच तरुण ठेवण्यात कणेकर यशस्वी ठरलेत हे सत्य कायमच राहील. मध्यंतरी सहज गप्पांत ते म्हणाले, ’मी इतकी वर्षं भरभरून लिहितोय, त्यात मला आवडलेली, भावलेली कॉम्प्लिमेंट माझ्या वडिलांची. 1964 साली मी लिहायला सुरुवात केली. तेव्हा महिना-दोन महिन्यांतून माझा एखादा लेख प्रसिद्ध होई. तेव्हा एकदा वडील म्हणाले, तुझं शेवटपर्यंत वाचावंसं वाटतं. ही शैली टिकवून ठेव. मला वाटतं, इतकं चांगलं मूल्यमापन अन्य कोणी केलं नसेल…’ कणेकर सांगत असताना त्यांच्या चेहऱयावरचे समाधान खूप बोलके वाटले.
6 जून रोजी त्यांनी वयाची ऐंशी पूर्ण केली आणि त्यांच्या लेखन प्रवासाची साठ वर्षेही झाली. त्यानिमित्त हे त्यांच्या माहीमच्या घरी छान कौटुंबिक सेलिब्रेशन केले. सकाळीच मी त्यांना शुभेच्छांसाठी फोन केला असता, संध्याकाळी घरी ये, माझे इतर मित्र, पाहुणेही येणार आहेत. छान गप्पा करू. तशी एक छोटीशी गप्पांची मैफल जमलीही. कणेकर बोलत असताना आपण फक्त ऐकायचे असते, एन्जॉय करायचे असते हा माझा तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव. लता मंगेशकर, दिलीपकुमार, राजेश खन्ना, चित्रपट संगीत याबद्दलच्या आठवणी, किस्से, अनुभव ऐकावे ते त्यांच्याकडून. अतिशय खुलवून, रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी. लेखनात, स्टेजवर, गप्पांच्या मैफलीत आणि फोनवर एकाच आनंदात बोलणे ही त्यांची खासियत. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या वर्षीच्या वर्धापन दिनाला कणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्यांनी पत्रकारितेतील आपले अनुभव खुमासदार शैलीत सांगितले. तेव्हा माहीम येथील भाटिया बिल्डिंगपासून पत्रकार संघापर्यंत ते, मी आणि कणेकरांचे सहकारी उज्ज्वल वाडकर आमच्यात जुना काळ आणि आजचे चित्र यावर छान गप्पा रंगल्या.
अलीकडे त्यांच्या लेखनात/ बोलण्यात ’निरोपाची भाषा’ येत असे. अनेकदा कोणीही गप्पा करायला नाही, काहीसे एकटेपण आल्यासारखे वाटते असे ते म्हणत आणि मग पुन्हा आपल्या आनंदात रमत. ही त्यांची सकारात्मक वृत्तीच त्यांच्या जगण्याचा आधार होते. स्वत:चा हुकमी वाचकवर्ग असलेले कणेकर फार पूर्वी आपल्या लेखनावर आलेल्या वाचकांच्या पत्राला स्वअक्षरात उत्तर देत. मी कॉलेजमध्ये असताना असेच एक पत्र त्यांना पाठवले असताना त्यांनी चक्क त्यावर उत्तर दिले. ते पत्र आजही मी जपून ठेवले आहे. मध्यंतरी त्यांना ते आवर्जून दाखवलेही होते. आपल्या लेखनावर, कणेकरी, माझी फिल्मबाजी, फटकेबाजी या स्टॅन्ड अप शोवर बेहद्द प्रेम करणारे जगभरात आहेत आणि ते सतत कुठे ना कुठे भेटतात याचा त्यांना विशेष आनंद होई. तेच त्यांचे टॉनिक होते.
1964 च्या जानेवारीत त्यांनी नाशिकच्या ’अमृत’ मासिकात त्यांचा ’ािढकेटर जॉर्ज गन एक लहरी फलंदाज’ हा पहिला लेख प्रसिद्ध झाला आणि जणू एक ’सुपर स्टार’ लेखक जन्माला आला. आपल्यातील लेखकाला त्यांनी तसे घडवलेही. स्वत:वर मेहनत घेतली. ’शिरीष कणेकर यांचा लेख वाचायला हवा’ असे वाचकांना वाटते हे केवळ शैली असणाऱया लेखकाच्या बाबतीत घडते. ती शैली टिकवावीही लागते. ते सामर्थ्य त्यांच्या शैलीत होते. स्टेज शोचे त्यांनी इंग्लंड, अमेरिका, आखाती देश इत्यादी मिळून विदेशात पन्नास दौरे केले. या एकपात्री कार्पामाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण त्यांचेच. काय जबरा स्टॅमिना हो! अफाट कर्तृत्व व ऊर्जेशिवाय हे शक्यच नाही. ’या कातरवेळी’ या कार्पामाचे फक्त विदेशात शो केले.
त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरातील नावीन्य प्रकाशनने कणेकरांची पाच पुस्तके पुनर्प्रकाशित केली. चापटपोळी, कट्टा, यादों की बारात, मेतकूट, नानकटाई या पुस्तकांत बोचरे, चुरचुरीत लेखन आणि कणेकरी शैली यांची छान केमिस्ट्री यात वाचायला मिळेल. या पुस्तकांच्या निर्मिती प्रािढयेचा आनंद आणि त्यांच्याच घरी या पुस्तकांचे प्रकाशन हा अनुभव त्यांच्यासोबत एन्जॉय करताना लक्षात आले की, यह जीना है अंगूर का दाना अशी त्यांची प्रवृतीच त्यांना पुढील नियोजनात उपयुक्त ठरतेय. शिरीष कणेकर म्हणजे बरेच काही आणि चौफेर आणि मनमुराद. वाचक त्यांच्या लेखनाच्या प्रेमात कायमच राहिलेत यात बरेच काही आले.
एक वेगळी आठवण सांगतो, मी कॉलेजमध्ये असताना एका पुस्तकाच्या मागच्या पानावर कणेकर यांचा फोटो पहिल्यांदा पाहिला होता. लेखक असो, पत्रकार असो तो त्यांच्या लेखनातून दिसायला हवा असे कितीही म्हटले जात असले तरी आपला आवडता लेखक दिसतो कसा याचे वाचकाला कुतूहल असतेच. जुन्या शिवसेना भवनातील हॉलमध्ये त्यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांना मी पहिल्यांदा पाहिले. नंतर मी मिडियात आल्यावर त्यांच्याशी संबंध आला, व तो वाढत वाढत गेला आणि आज त्यांच्या निधनानंतर बरेच काही डोळ्यासमोर येत होते.




























































