विशेष – अमेरिकन मतदारांवर शृंगापत्ती

>> दिवाकर देशपांडे

अमेरिका सध्या प्रचंड गोंधळलेली आहे व त्यातून मार्ग काढणारा अध्यक्ष अमेरिकेला हवा आहे. त्यांना दोन न आवडणाऱ्या उमेदवारांमधून एक उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडायचा आहे. ट्रम्प आणि बायडन या दोघांमधील कुणीही अध्यक्ष म्हणून निवडून आला तरी परिस्थितीत फार फरक पडेल असे वाटत नाही. ट्रम्प हे लोकप्रियतेत बायडन यांच्या पुढे असले तरी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक मतदारांना ट्रम्प यांचे हडेलहप्पी राजकारण पसंत नाही. मात्र बायडन यांच्या आजवरच्या कारभाराची जगाला माहिती आहे व त्यात यापुढे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तेच पुन्हा निवडून यावेत अशी बाकीच्या जगाची अपेक्षा असणार यात काही शंका नाही.

यावर्षी अमेरिकन मतदारांवर एक मोठीच शृंगापत्ती आली आहे. त्यांना दोन न आवडणाऱया उमेदवारांमधून एक उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडायचा आहे. दोन्ही उमेदवारांनी एकेकदा राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. एकाचा अनुभव वाईट आहे, तर दुसऱ्याचा वाईट नसला तरी खूप भूषणावह नाही. एक खूप अतिरेकी, तर दुसरा नको तितका मवाळ. दोघेही बरेच वृद्ध म्हणजे एकाची ऐंशीकडे वाटचाल, तर दुसऱयाची ऐंशी पार. एक विद्यामान राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकन परंपरेप्रमाणे त्यालाच उमेदवारी देणे भाग, तर दुसरा डोक्यावरच बसल्यामुळे त्याला उमेदवारी द्यावीच लागली. जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष, तर डोनाल्ड ट्रम्प हे माजी राष्ट्राध्यक्ष. ट्रम्प हे अमेरिकन देशीवादी. त्यामुळे उजव्या राष्ट्रवादी अमेरिकनांमध्ये लोकप्रिय. त्यामुळे निवडणुकीत त्यांना अधिक रेटिंग, तर बायडन हे ना धड राष्ट्रवादी, ना धड आंतरराष्ट्रीयवादी. त्यामुळे त्यांचे रेटिंग कमी, पण अजून निवडणुकीला बराच कालावधी आहे. त्यामुळे हे रेटिंग बरेच खालीवर होण्याची शक्यता आहे. ट्रम्प हे अराजकवादी आहेत. त्यामुळे ते निवडून आले तरी पंचाईत आणि निवडून आले नाही तरी पंचाईत. त्यांच्यावर फसवणूक, भ्रष्टाचाराचे खटले आहेत. गेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कॅपिटल बिल्डिंगवर आपल्या समर्थकांमार्फत हल्ला घडवून आणला होता. त्यामुळे अमेरिकन लोकशाहीवरचा एक डाग म्हणून काही लोक त्यांच्याकडे पाहतात, पण त्यामुळेच गोऱ्या व वर्णाभिमानी अमेरिकनांचे ते लाडके आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या 21 राज्यांत ते सध्या तरी आघाडीवर आहेत. बायडन हे फक्त सात राज्यांत आघाडीवर आहेत. नऊ राज्ये अजून कुणाकडे झुकलेली नाहीत.

बायडन यांची पोन व गाझा या दोन मोठय़ा युद्धांबाबतची भूमिका सध्या वादात सापडलेली आहे. पोनच्या युद्धात अमेरिकेने पडण्याचे काही कारण नाही, तसेच नाटो देशांनी आपल्या संरक्षणाची व्यवस्था आपणच करावी अशी भूमिका ट्रम्प यांनी

घेतली आहे व तिला वाढता पाठिंबा मिळत आहे. गाझा युद्धात इस्रायल पॅलेस्टिनींचे जे शिरकाण करीत आहे, त्याबद्दल अमेरिकेत वाढती नापसंती व्यक्त होत आहे आणि बायडन यांनी इस्रायलवर दबाव आणून हे शिरकाण थांबवावे अशी मागणी होत आहे. त्यामुळे बायडन यांची लोकप्रियता ओहोटीस लागली आहे. बायडन यांनी 8 मार्चला अमेरिकन प्रतिनिधीगृहात देशाला उद्देशून भाषण केले. हे निवडणुकीची दिशा ठरवणारे भाषण होते. त्यात त्यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली, पण त्याचा कितपत फायदा होइल ते आताच सांगता येणार नाही.

खरे तर ट्रम्प यांना त्यांच्या रिपब्लिकन पक्षातून खूप विरोध होता. निकी हेली यांनी त्यांना पक्षाच्या उमेदवारीसाठी चांगलीच लढत दिली. रिपब्लिकन पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित त्या तरुण उमेदवार असल्याचा त्यांना फायदा मिळाला असता, पण ट्रम्प यांचे ‘फर्स्ट अमेरिका’ हे धोरण पक्षाला अधिक आकर्षक वाटले. असे असले तरी अनेक मतदारांना हे दोन्ही उमेदवार पसंत नाहीत. एका प्रायमरी मतदाराच्या मते या दोघांपैकी एक उमेदवार निवडायचा म्हणजे आडात पडायचे की विहिरीत पडायचे, हे ठरवण्यासारखे आहे.

या दोन्ही उमेदवारांच्या निवडीबाबत लोकांचे काय मत आहे, याची चाचपणी मॅसेच्युसेट विद्यापीठाने जानेवारी महिन्यात केली तेव्हा असे आढळून आले की, 45 टक्के लोकांना हे दोन्ही उमेदवार वाईट आहेत असे वाटते. 26 टक्के लोक या दोघांबद्दलही उदासीन आहेत. म्हणजे ते धड चांगलेही नाहीत आणि धड वाईटही नाहीत, असे त्यांचे मत आहे. 29 टक्के लोकांना मात्र ते चांगले उमदेवार आहेत असे वाटते. आतापर्यंतच्या या उमेदवारांच्या लोकप्रियतेच्या पाहणीत बायडन यांना 38.1, तर ट्रम्प यांना 42.6 मते पडली आहेत. याचा अर्थ बहुसंख्य मतदारांना हे उमेदवार पसंत नाहीत असाच लावला जात आहे.

ट्रम्प या निवडणुकीत उतरलेले असल्यामुळे व सध्या तरी त्यांचे रेटिंग अधिक असल्यामुळे जगातील अनेक देशांत काहीसे धास्तीचे वातावरण आहे. कारण ट्रम्प हे केवळ अमेरिकेच्या स्वार्थाचा विचार करणारे विधिनिषेधशून्य राजकारणी मानले जातात. केवळ हिंदुस्थानपुरता विचार करायचा झाला तर ट्रम्प सत्तेवर आल्यास हिंदुस्थानींना अमेरिकेचा व्हिसा मिळणे अवघड होण्याची भीती तर आहेच, पण हिंदुस्थानींनी अमेरिकेत नोकऱया करण्यावरही निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान व अमेरिका यांच्यातला व्यापार हा सध्या अमेरिकेसाठी तोटय़ाचा आहे. त्यामुळे ट्रम्प हिंदुस्थानवर व्यापारी सवलतींसाठी मोठा दबाव टाकण्याची शक्यता वाटते. चीनसंबंधात ट्रम्प हे अधिक आाढमक आहेत. ते चीनला आव्हान तर देतीलच, पण हिंदुस्थाननेही चीनसंबंधीच्या अमेरिकेच्या धोरणाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा ठेवतील. त्यासाठी ते हिंदुस्थानची अडवणूक करण्याचे धोरणही स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ट्रम्प यांच्यामुळे युरोपात अधिक भीतीचे वातावरण आहे. कारण रशिया व पोन यांच्या युद्धात अमेरिकेने पडण्यास ट्रम्प यांचा विरोध आहे. तसेच नाटो राष्ट्रांना त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिकेने मदत करण्याचे काहीही कारण नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ट्रम्प अध्यक्ष म्हणून निवडून आले तर युरोपमध्ये रशिया अधिक मोकाट सुटेल असे नाटो देशांना वाटते.

ट्रम्प हे लोकप्रियतेत बायडन यांच्या पुढे असले तरी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक मतदारांना ट्रम्प यांचे हडेलहप्पी राजकारण पसंत नाही. त्यामुळे रिपब्लिकन उमेदवारीसाठी ‘ट्रम्प विरुद्ध निकी हेले’ अशी लढत चालू असताना निकी हेले यांना मतदान करणारे अनेक जण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्याऐवजी बायडन यांना मतदान करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचा जगातला प्रभाव कमी होत चालला आहे, जगात नव्या सत्ता उदयाला येत आहेत व त्या अमेरिकेला आव्हान देत आहेत. चीनचे आव्हान तर खूपच मोठे आहे व त्याचा सामना करताना अमेरिका बरीच गोंधळलेली दिसत आहे. चीनचा भस्मासुर हा अमेरिकेनेच निर्माण केला आहे. आता चीनची आर्थिक नाकेबंदी करताना अमेरिकेच्या नाकात दम येत आहे. आधी चिनी अर्थव्यवस्थेपासून आपल्याला तोडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला, पण दोन्ही देशांतला आर्थिक गुंता इतका किचकट आहे की, हे आर्थिक संबंध तोडल्याने अमेरिकेचीच घुसमट होऊ लागली. त्यामुळे आर्थिक संबंध तोडण्याऐवजी चिनी अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचे ठरविण्यात आले, पण हे अवलंबित्व कमी करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे आता बायडेन आपली आाढमक भाषा बदलून चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधू लागले आहेत. थोडक्यात, अमेरिका सध्या प्रचंड गोंधळलेली आहे व त्यातून मार्ग काढणारा अध्यक्ष अमेरिकेला हवा आहे. ट्रम्प आणि बायडन या दोघांमध्येही ती क्षमता आहे, असे दिसत नाही. त्यामुळे यातला कुणीही अध्यक्ष म्हणून निवडून आला तरी परिस्थितीत फार फरक पडेल असे वाटत नाही. त्यातल्या त्यात बायडन यांच्या आजवरच्या कारभाराची जगाला माहिती आहे व त्यात यापुढे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे तेच पुन्हा निवडून यावेत अशी बाकीच्या जगाची अपेक्षा असणार यात काही शंका नाही.