
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
रिचा (नाव बदलले आहे) ही कॉलेजवयीन युवती. शेवटच्या वर्षाला शिकत होती. अभ्यासात प्रगती होतीच तिची. शिवाय मेहनती वृत्ती, पुढे जाण्याची जिद्द या तिच्या गुणांमुळे ती कॉलेजमध्ये नावाजलीही जात होती. एकुलती एक असल्याने रिचाकडे आईवडिलांचे व्यवस्थित लक्ष होते. एकूणच म्हणायचे झाल्यास तिच्या आयुष्यात तशी काहीच समस्या नव्हती. कॉलेज, नंतर क्लासेस, त्याच्या जोडीला मित्र-मैत्रिणी, अभ्यास असं एपंदरीत रिचाचं चांगलंच चाललं होतं.
पण गेल्या काही दिवसांपासून तिचं मन अभ्यासातून काहीसं उडालं होतं. ती जेव्हा जेव्हा वाचायला किंवा लिहायला बसत होती तेव्हा तेव्हा तिच्या मनात एकच विचार घोळत होता. नुकताच ‘व्हॅलेंटाइन्स डे’ होऊन गेला होता आणि तिच्या जवळपास सगळ्याच मित्र-मैत्रिणींनी त्यांच्या जोडीदारासोबत तो साजरा केला होता. मात्र रिचाला कोणी बॉयफ्रेन्ड नसल्यामुळे ती त्या दिवशी लवकर घरी आली आणि टीव्ही बघत राहिली.
त्या दिवसापासून ती कुठल्याशा विचारात हरवत गेली. ‘‘तुझं जेवणात लक्ष नाहीये रिचा’’ आईने असं टोकल्यावर रिचा भानावर आली. ‘‘मी काही दिवस बघतेय, तू हल्ली कमी जेवते आहेस. आम्हा दोघांशीही हल्ली गप्पा वगैरे मारत नाहीस. अभ्यासाचं टेन्शन घेतलं आहेस की काय?’’ आईने तिला काळजीच्या स्वरात विचारलं. रिचाने यावर काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी रात्री तिचे वडील तिच्या जवळ आले आणि म्हणाले, ‘‘बाळा, अभ्यासाचं टेन्शन आलं नाहीये नं तुला?’’ रिचाने ‘‘नाही’’ म्हणून मान डोलावली.
रिचाला समुपदेशनासाठी तिचे आई-वडील घेऊन आले. रिचाबाबत वरील सर्व माहिती देतानाच तिचे वडील म्हणाले, ‘‘आमची रिचा ही पहिल्यापासूनच खूपच संवेदनशील आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सहनशीलसुद्धा. ती जेव्हा शांत होते तेव्हा आम्हाला कळतं की, काहीतरी हिचं बिनसलं असणार. एरवी तिला आम्ही बोलतंही करतो, पण यंदा मात्र तुमचीही मदत घ्यावी असं आम्हाला वाटलं. बोलता का तिच्याशी?’’ असं बोलून ते दोघंही बाहेर जाऊन बसले.
रिचा आत आली आणि शांत बसली. गोंधळ आणि प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱयावर स्पष्टपणे दिसत होतेच. तिला त्याबद्दल विचारल्यावरही ती थोडा वेळ शांत राहिली. बहुधा ती शब्दांची जुळवाजुळव करत असावी. ‘‘मॅम, मला आता माझं फ्रेन्ड सर्कल एकटं पाडायला लागलंय. कारण मी अजूनही सिंगल आहे. माझा कोणीही बॉयफ्रेन्ड नाही आणि माझे सगळे फ्रेन्ड्स एन्गेज्ड आहेत. त्यामुळे आता मला इतका कॉम्प्लेक्स आलाय की, विचारू नका! कॉन्सन्ट्रेशन तर मी करूच शकत नाही. आताच्या व्हॅलेंटाइन्स डेसाठी माझ्या ग्रुपने एक व्हॉटस्अॅप ग्रुप तयार केला. प्लॅनिंग करण्यासाठी. त्यात मी नव्हते. मला खूप फील झाली ही गोष्ट.’’ रिचा आता तिच्या मनातला सल बोलून दाखवत होती.
रिचाचं असं ‘फील होणं’ हे असं अनेकांच्या बाबतीत घडत असतं. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांच्या बाबतीत तर हे ‘फील होण्या’चं प्रमाण अधिकच आहे. आजकालच्या काळात ‘जोडीदार असणं’ हे तरुण मुलामुलींसाठी अत्यावश्यक अशी गोष्ट झालेली आहे. यातून शाळकरी मुलं-मुलीही सुटलेली नाहीत. म्हणूनच बव्हंशी शाळांमध्ये व्हॅलेंटाइन्स डे, दहावीच्या मुलांचे सेन्ड ऑफ्स या दिवसांमध्ये सक्त पहारा ठेवला जातो.
ज्या मुलांना या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत आणि करीअर महत्त्वाचे वाटते अशांना वेगळे ठेवले जाते. त्यांची खिल्ली उडवणं नाहीतर त्यांना ‘या वयात खास व्यक्ती कशी महत्त्वाची आहे’ हे ठसवण्यात येतं. जी मुलं तरीही अशा सर्व गोष्टी कानाआड करून करीअर आणि अभ्यासावर लक्ष पेंद्रित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर बाकीच्यांकडून दबाव आणला जातो.
रिचासारखी काही मुलं आणि कॉलेजवयीन युवक-युवतींनी त्यांच्या वैयक्तिक समस्यांबाबत बोलताना हीसुद्धा समस्या समुपदेशनावेळी बोलून दाखवली आहे. अशा संवेदनशील मुलांना ‘एकटं पडणं’ तेही ‘या’ कारणासाठी कुठेतरी त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतं आणि ही मुलं कोषात जाऊ शकतात. नाहीतर एकटं पडण्याच्या भीतीने ग्रूप सांगेल तसं वागायला सुरुवात करतात. मग ते मिंगल होणं असो किंवा दारू, सिगारेट, ड्रग्जसारखी व्यसनंही असोत.
मला या लेखाद्वारे रिचासारख्या सगळ्याच मुलांना हेच सांगायचं आहे की मुलांनो, स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. तुम्ही ज्या काही उद्दिष्टांवर सध्या लक्ष पेंद्रित केलेलं आहे, ते योग्यच आहे आणि तीच उद्दिष्टे तुम्हाला आयुष्यात प्रगतिपथावर घेऊन जाणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, जर का कोणी या अशा गोष्टींसाठी तुमची खिल्ली उडवत असतील तर त्यांच्याकडे एकतर दुर्लक्ष केलेलं चांगलं आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष पेंद्रित करणं महत्त्वाचं आहे. तसंही जो मित्रपरिवार तुम्हाला समजून घेत नसेल आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो निश्चितच तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही आता खचितच सारासार विचार करू शकताय, पण जर नसाल करू शकत तर आम्ही असूच तुमच्या साथीला.
रिचाचाही दृष्टिकोन काही दिवसांनी बदलायला सुरुवात झाली. तिला समुपदेशनामुळे स्वतःबद्दल, तिच्या स्वतःच्या तत्त्वांबद्दल खात्री पटली आणि जोमाने ती सगळ्या नकारात्मक विचारांना बाजूला सारून, महत्त्वाचं म्हणजे तिच्या मित्रपरिवाराकडे दुर्लक्ष करून झटून अभ्यासाला लागली. सरतेशेवटी सगळ्यात चांगली संगत ही स्वतःचीही असू शकते हे तिला अनुभवाने समजलं. तिचे आई-वडील आणि समुपदेशन यांच्या जोडीने तिने पुढील आयुष्याचा सकारात्मक विचार करायला सुरुवात केली.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)





























































