
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘यश आणि पैसा’ ह्याची तरुण पिढीला नेहमीच भुरळ असते. ह्या गोष्टी मिळवताना त्यांच्याकडून अनेक मार्ग चाचपडले जातात. ह्यातले काही मार्ग हे सारासार विवेकबुद्धीला धरून नसतात. पण ‘अंत भला तो सब भला’ या उक्तीनुसार या मार्गांचं अनुकरण केलं जातं. ह्यात फक्त तरुण अथवा वयात आलेलीच मुलं नाहीत, तर प्रौढ व्यक्तीही अडकू शकतात. लाखो रुपयांना गंडलं जाणं, बोगस व्यक्तींच्या भूलथापांना फसणं ही ह्याचीच उदाहरणं आहेत.
लताताई आणि अशोकराव (दोघांची नावे बदलली आहेत) हे तसे साधे-सरळ असे मध्यमवर्गीय दांपत्य होते. अशोकराव खासगी कंपनीत नोकरीला होते, तर लताताई गृहिणी होत्या. ह्या दांपत्याला एकुलता एक रोहन (नाव बदलले आहे) नावाचा मुलगा होता. नववीत होता तो. शाळेत पहिल्या पाचात रोहनचा नंबर कायम ठरलेला असायचा. शिवाय इतर अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांमध्ये त्याची प्रगतीही होतीच. त्यामुळे लताताई आणि अशोकराव रोहनच्या बाबतीत तसे निर्धास्त होते.
पण त्या दिवशी शाळेमधून आलेल्या एका पह्नकॉलने त्यांना प्रचंड धक्का बसला होता. त्यांना तडक शाळेत बोलावण्यात आले होते. अशोकराव अर्ध्या दिवसाची ऑफिसची रजा टाकून तर लताताई घरून तडक शाळेत पोहोचल्या होत्या. त्यांच्या रोहनच्या दप्तरात पाच हजार रुपये शिक्षकांना सापडले होते. ‘काय म्हणताय तुम्ही मॅडम?’ अशोकरावांचा ह्यावर विश्वासच बसत नव्हता. ‘काल मी ह्याला फक्त पाचशे रुपये दिले होते. तेही पॉकेटमनी म्हणून.’ लताताई रडपुंडीला येत म्हणाल्या. ‘अगं, दोन दिवसांपूर्वीच तर रोहनने हजार रुपये माझ्याकडून घेतले आणि काल तू पण दिलेस?’ अशोकरावांना नेमपं काय झालंय हेच समजत नव्हतं.
लताताई त्यांना काही बोलणार इतक्यात मुख्याध्यापकांनी रोहनला आणि त्याच्या वर्गशिक्षिकेला बोलावलं. रोहन खाली मान घालूनच आत शिरला. ‘रोहनचं शाळेत हल्ली लक्ष नाहीये. तो कायम कुठल्या तरी विचारात गढलेला असतो. आता हे पाच हजार आम्हाला आज सापडले, कारण लेक्चरच्या वेळी रोहन स्वतःचे पाकीट पुनः पुन्हा बघत होता. त्याला हटकलं तेव्हा त्याच्याकडे पाच हजार सापडले. कसे आले हे इतके पैसे?’ मुख्याध्यापक पुढे अजून काही बोलणार इतक्यात, ‘मॅम, मी बोलू का?’ रोहनने हळू आवाजात त्यांना विचारले आणि त्यांच्या परवानगीने त्याने जे काही सांगितले तेव्हाच त्याला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले.
रोहनने ऑनलाईन ‘स्वयंघोषित बाबा’कडून दीक्षा घेतली होती आणि त्या बाबाची फी तो जमवत होता. झालं असं होतं की, त्याला फेसबुकवर ‘झटपट यशाचा मार्ग’ दाखवणाऱया भोंदू बाबाची प्रोफाईल अचानकच सापडली होती. त्या बाबाच्या पेजवर जाऊन रोहनने त्या माणसाशी संपर्क साधला होता. त्या माणसाने रोहनला त्याच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याच्या ‘झटपट यशाच्या मार्गांनी’ किती लोपं यशस्वी झाली याचे दाखले ‘सक्सेस स्टोरीज’च्या माध्यमांतून दिले होते. अजाण रोहन ह्याला भुलला आणि त्याची फी गोळा करू लागला. आई-वडीलांना त्याला ‘सरप्राईज’ म्हणजेच ‘झटपट यशस्वी होऊन’ दाखवायचं होतं. फी भरल्यावरच त्याचा भोंदूबाबा त्याला यशाचे फंडे दाखवणार होता. त्यामुळे रोहनने त्याच्या वर्गातील काही मुलांकडून काहीबाही खोटी कारणे देऊन पैसे जमा केले आणि तो ज्या दिवशी त्याला भेटणार त्याच दिवशी सुदैवाने पकडला गेला.
रोहनला समुपदेशन करणे काही कठीण काम नव्हते, पण आव्हानात्मक निश्चितच होते. कारण त्याच्यावर बाबाच्या ‘सक्सेस स्टोरीज’चा पगडा प्रचंड होता. त्याच्या बुद्धीला गोष्टी पटत होत्या. मात्र मन अजूनही तिथेच धाव घेत होतं.
रोहनचं असं का होत होतं? का त्याला भोंदू व्यक्तीच्या गोष्टी पटत होत्या? …अर्थातच नव्हत्या. पण तरीदेखील तो गुरफटला होता. ‘आमचा हुशार, साधा-सरळ रोहन का ह्या गोष्टीत अडकला?’ अशोकराव आणि लताताई दोघांनी काळजीने विचारलं. रोहन बाजूलाच बसला होता. त्याने त्या दोघांकडे पाहिलं आणि मध्येच म्हणाला, ‘मलाही कळलं नाही. पण त्याचं फेसबुक पेज खूपच अपिलिंग होतं. त्यात मला तो माणूस पटला, कारण तो फिलॉसॉफर नव्हता; जरी तो साधुसंत टाईप्स कपडे घालायचा.’
‘म्हणजे?’ लताताई ओरडल्याच. ‘तू त्याला भेटलास की काय?’
‘नाही नाही! मी त्याचं झूम सेशन अटेंड केलं होतं. इंट्रोडक्टरी सेशन. ते मला आवडलेलं. मग फी भरल्यावर जॉइन व्हायचं होतं.’ रोहन निरागसपणे बोलून गेला.
रोहनशी बोलताना लक्षात आलं की, त्याच्यासारखी अनेक मुलं ह्या माणसामध्ये अडकली होती. ‘यश आणि पैसा’ ह्याची तरुण पिढीला नेहमीच भुरळ असते. ह्या गोष्टी मिळवताना त्यांच्याकडून अनेक मार्ग चाचपडले जातात. ह्यातले काही मार्ग हे सारासार विवेकबुद्धीला धरून नसतात. पण ‘अंत भला तो सब भला’ या उक्तीनुसार या मार्गांचं अनुकरण केलं जातं. ह्यात फक्त तरुण अथवा वयात आलेलीच मुलं नाहीत तर प्रौढ व्यक्तीही अडकू शकतात. लाखो रुपयांना गंडलं जाणं, बोगस व्यक्तींच्या भूलथापांना फसणं ही ह्याचीच उदाहरणं आहेत.
रोहनच्या बाबतीत त्याचं वय हा घटक होताच. पण त्याशिवाय त्याची महत्त्वाकांक्षा, एकुलता एक असल्यामुळे स्वतःनेच स्वतःवर लादून घेतलेलं जबाबदारीचं ओझं (आता पुढे माझ्यावरच माझ्या आईवडिलांची जबाबदारी आहे. म्हणून मला आता लवकर कमवावं लागणार.) या सगळ्यामुळे तो गोंधळला होता. ह्या गोंधळामध्येच त्याला हा मोबाईलमध्ये मार्ग सापडला होता आणि अशा आकर्षक, प्रभावशाली स्वरूपात त्याच्या समोर गोष्टी घडल्यामुळे त्याच्यावर त्या स्वीकारण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय दिसत नव्हता, कारण त्याच्यावर त्या माणसाचा प्रभाव पडत चालला होता.
रोहनला समुपदेशनादरम्यान बऱयाच गोष्टी समजावण्यात आल्या. सर्वप्रथम त्याला अर्थातच असे प्रकार त्याच्यासाठी किती घातक ठरू शकतात हे पटवण्यात आलेच. त्याच्या जोडीला त्याच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही सत्रांमध्ये भर देण्यात आला. यात त्याच्या स्व-विकासावर, आत्मविश्वास कमावण्यावर तसेच सारासार विचारांवर काम करण्यात आले. रोहनच्या आईवडिलांचीही काही सत्रे घेतली गेली, ज्यामध्ये त्यांना काही गोष्टी (आर्थिक आणि खासगी बाबी) रोहनसमोर न बोलण्यास सांगितले गेले. तसेच त्याला काही गोष्टींमध्ये सांभाळून घेण्यासही सांगण्यात आले. त्याला पुन्हा या गोष्टीमध्ये अडकू न देणे हे महत्त्वाचे होते.
‘मी नाही अडकणार मॅम.’ रोहन आत्मविश्वासाने म्हणाला. ‘आता मला समजलंय. यश हे मेहनतीनेच मिळतं. त्यासाठी स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास हवा हे मला समजलंय.’ लताताई आणि अशोकरावांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि निश्चिंत मनाने दोघेही रोहनबरोबर केबिनबाहेर पडले. रोहनची केस आता बंद झाली होती.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]





























































