
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
आईवडील आणि मुलांच्या विश्वासाच्या नात्याची वीण ही मायेचा स्पर्श आणि संवाद याद्वारेच तयार होत असते. पालकांना त्यांचा स्वतःचा वेळ हवा असतो हे मान्य आणि हवाच, पण तो कसा आणि किती ही चर्चा मुलांशी केली गेली तर मुलंही समजूतदारपणा दाखवतात.
‘माझ्या दहा वर्षांच्या मुलाला तुमच्याकडे घेऊन यायचं आहे. कधी येऊ आम्ही?’’ वर्षाताई (नाव बदलले आहे) त्यांच्या अक्षयसाठी (नाव बदलले आहे) अपॉइंटमेंट घेत होत्या. ठरल्या दिवशी त्या आणि त्यांचे पती शेखर (नाव बदलले आहे) अक्षयला घेऊन आले. त्याची वाढत जाणारी मस्ती आणि सारखं घराबाहेर खेळणं या त्याच्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी होत्या.
‘‘अक्षरशः वैताग आणलाय या मुलाने. दिवसभर मस्ती करत असतो. जरा स्वस्थ बसत नाही. आम्ही दोघं जॉब करतो. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून घरी एका मुलीला मदतीसाठी आणलंय. तीही कंटाळते. खाली खेळायला जातो सांगून कुठे कुठे भटकत बसतो. बराच वेळ घरी येतच नाही. ती मग घाबरून आम्हाला फोन करत राहते.’’
वर्षाताईंची अक्षयबद्दलची कम्प्लेंट लिस्ट संपत नव्हती. ‘‘याला ADHD असेल का? खूप चंचल आहे आमचा अक्षय. मी वाचलं होतं ‘गुगल’वर’’ एवढं बोलून त्या थांबल्या. त्यांचे पती शेखर यांनीही त्यांचीच ‘री’ ओढली. ‘‘मी ओव्हर टाईम करतो मॅडम. घरी तसा उशिराच पोहोचतो, पण मग घरी गेल्यावर याची जी माझ्या अंगाखांद्यावर मस्ती सुरू होते ती काही केल्या थांबतच नाही. मला शांत बसायला की झोपायलाही देत नाही. आम्हाला रोजच उशीर होतो झोपायला’’ असे ते सांगत असतानाच अक्षयने नजर चोरली आणि तो इकडे तिकडे बघू लागला.
‘‘अक्षयला आताच असं काही लेबल लावू नका. त्याच्याशी बोलून, त्याच्या हालचालींचं निरीक्षण करून हे बघता येईल. तुम्ही आता बोलण्यात घाईगडबड करू नका’’ असा त्यांना जरा सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच कुठल्याही मानसिक समस्येबाबत असे सरसकट (कुठल्याही मानसिक चाचणी अथवा मानसोपचार तज्ञाशिवाय) विधान न करण्याबाबत बजावण्यात आले.
(समुपदेशनासाठी किंवा मानसोपचारांसाठी येणाऱयांसाठी आम्ही नेहमीच ‘गुगल’ वाचून न येण्याची आणि दुसऱया कोणाशीही तुलना न करण्याची कळकळीची विनंती करतो.)
अक्षयशी स्वतंत्रपणे बोलणे आवश्यक होते. कारण ADHD ची सर्वसामान्य चिन्हे म्हणजेच बसल्या जागी चुळबुळ, हातापायांच्या सततच्या हालचाली किंवा लक्ष विचलित होणे काही त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवली नाहीत. तो व्यवस्थित बसला होता, शांत होता आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कुठलीही घाईगडबड न करता सांगत होता.
‘‘काय रे? आईबाबा खरं बोलत होते का?’’ असं विचारल्यावर तो पटकन ‘‘हो’’ म्हणाला, पण लगेच ‘‘पण ते सगळंच खरं सांगत नव्हते. मी काही आईबाबांना त्रास नाही देत. मला त्यांच्याबरोबर राहायचं असतं, खेळायचं असतं, पण दोघांनाही माझ्यासाठी वेळच नसतो’’. मग जरा थांबून कसनुसं हसून तो सांगत होता, ‘‘माझे बाकीचे सगळे फ्रेन्ड्सचे पॅरेन्टस् ऑफिसमधून घरी आले की, त्यांच्याबरोबर खेळतात, मस्ती करतात, पण माझी आई मला सारखी अभ्यास करायला सांगते आणि स्वतः मोबाईलवर असते. बाबासुद्धा तसाच. ऑफिसमधून आला रे आला की, टी.व्ही. आणि मोबाईलवर असतो. त्याला सांगितलं की, माझ्याशी खेळ, तर तो हार्डली दहा मिनिटं खेळतो आणि मग अभ्यास करायला सांगून तोही मोबाईल हातात घेतो. मग मी पण सारखा अभ्यास करून बोअर होतो’’ हे त्याने एक दमात सांगून टाकले.
अक्षय जे काही सांगत होता ते खरे होते. दिवसभर एकटा राहून तो कंटाळत होता. त्यात घरी आल्यावर त्याच्या आई-वडिलांचं त्यांच्याच उद्योगात असणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासाठी वेळ नसणं हे त्याला कुठेतरी त्रास देत होतं. ‘माझे आईवडील माझ्याकडे लक्ष देत नाहीत’ हा विचार त्याच्या डोक्यात इतका पक्का बसला होता की, त्यामुळेच की काय, त्याने आईवडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मस्तीचा मार्ग अवलंबला होता. ‘Any Attention is Good Attention’ या न्यायाने अक्षय दुसऱयांना (त्याला सांभाळणारी मुलगी) लक्षात येईल इतकी मस्ती करून त्यांचा जीव जेरीस आणत होता. यामागे भोळा हेतू हाच की, आईबाबांनी किमान मला ओरडण्यासाठी तरी बोलावं, माझ्याकडे लक्ष द्यावं.
पण त्याचा हा केविलवाणा प्रयत्न पुरता फसून गेला.
बऱयाच मुलांचा हा असा प्रयत्न फसत असेल नाही? मग त्यामागून येणारा मनस्ताप हा जेवढा त्यांच्या पालकांना होतो तितकाच, किंबहुना त्याहूनही जास्त मनस्तापातून ही मुलं जात असतात. त्यातूनच मग…
– आईवडील आणि मुलांमध्ये विसंवाद
– मुलांचे बंडखोर वागणे
– मूल चिडचिडे होणे
– मुलांचे घराबाहेर जास्त राहणे
– नैराश्य किंवा ताण
– व्यसनाधीन होणे
– आत्मघातकी विचार किंवा प्रयत्न
यांसारख्या समस्या मुलांमध्ये उद्भवू शकतात आणि एकदा का त्यांचा ‘माझ्या आई-बाबांचे माझ्याकडे लक्ष नाही’ हा (गैर)समज पक्का झाला तर विसंवादाची आणि परिणामी त्यांच्या एकटेपणाची सुरुवात होते.
हे सर्व टाळण्यासाठी पालकांनी काही गोष्टी या समजून घ्यायला हव्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना आपल्या पालकांकडून फक्त आणि फक्त निखळ प्रेमाचीच आवश्यकता असते. ते त्यांना शाब्दिक किंवा पालकांच्या देहबोलीतून जरी मिळाले तरी त्यांच्यासाठी ते खूप असते.
दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी वेळ देणं. मुलांना आपले आईवडील कामाला जातात, तेव्हा तेही थकतात, त्यांच्याकडे वेळ कमी असतो’ हे सगळं समजतं, पण तरीही त्यांची ‘मला सांगा आणि वेळ मिळेल तसे माझ्याशी बोला’ एवढीच अपेक्षा असते. जर का पालक वेळ असला तरी मोबाईल किंवा त्यांच्या उद्योगात असतील आणि मुलांना वेळ देत नसतील तर मात्र तीही मग पालकांना समजून घेत नाहीत.
आईवडील आणि मुलांच्या विश्वासाच्या नात्याची वीण ही मायेचा स्पर्श आणि संवाद याद्वारेच तयार होत असते. पालकांना त्यांचा स्वतःचा वेळ हवा असतो हे मान्य आणि हवाच, पण तो कसा आणि किती ही चर्चा मुलांशी केली गेली तर मुलंही समजूतदारपणा दाखवतात.
अक्षयची ही समस्या ‘Attention Seeking Behaviour’ (लक्ष वेधून घेणे) याच प्रकारात मोडत होती. त्याची कारणं त्याच्या पालकांना सांगण्यात आली. त्याचबरोबर अक्षयबरोबर वेळ घालवणे का महत्त्वाचे आहे हे पटवण्यात आले. त्यासाठी वर्षाताई आणि शेखर यांची मोबाईलची सवय सर्वप्रथम मोडण्यात आली. तसेच अक्षयबरोबर जास्तीत जास्त संवाद आणि वेळ घालवण्यास सांगण्यात आले. काही सेशन्स झाल्यावर यथावकाश अक्षयची मस्ती कमी झाली. त्याची गाडी रुळावर आली आणि त्याच्या पालकांची आणि त्याची मोठय़ा मनस्तापातून सुटकाही झाली.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]





























































