
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘बायपोलर’ नामक मानसिक ‘आजार’. अत्यंत टोकाच्या आणि परस्परविरोधी भावना असलेलं असं या आजाराचं स्वरूप असतं. कधी कधी अत्यंत नैराश्याच्या अवस्थेत जाणं, काहीही करण्याची इच्छा न होणं तर कधी अत्यंत उन्माद, उत्साह अशीही मनोवस्था या मानसिक आजारात अनुभवास येते. या दोन टोकांचा अनुभव घेत असताना आलेल्या नैराश्यात ‘सगळं संपलंय’ हा विचार रुग्णाच्या मनाची इतकी ठाम पकड घेतो की, त्याची कार्यक्षमताच या अवस्थेत संपून जाते. मात्र असे काही मानसिक आजार योग्य मानसोपचारांनी नियंत्रणात येतात. औषधोपचार, समुपदेशन आणि कुटुंबाची साथ ही त्रिसूत्री त्यामुळेच महत्त्वपूर्ण ठरते.
श्री. कपूर (नाव बदलले आहे) हे प्रतिष्ठत असे व्यावसायिक. त्यांचा कपडय़ांचा व्यवसाय होता. वडिलोपार्जित असलेला हा व्यवसाय त्यांनी कष्टाने नावारूपास आणलेला होता. कुटुंबाचं म्हणायला गेलं तर दोन तरुण मुली, एक कॉलेजवयीन मुलगा आणि प्रेमळ बायको असं त्यांचं पाच जणांचं कुटुंब. मुंबई उपनगरात राहत होतं. सुखवस्तू असलेल्या या घरात मात्र शांतता नव्हती. कायम भांडणं आणि कटकटी हा कपूर कुटुंबाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला होता.
याचं कारण म्हणजे कपूर यांना असलेला ‘बायपोलर’ नामक मानसिक ‘आजार’. अत्यंत टोकाच्या आणि परस्परविरोधी भावना असलेलं असं या आजाराचं स्वरूप कपूर स्वतः अनुभवत होते. कधी कधी ते अत्यंत नैराश्याच्या अवस्थेत जात, ज्यावेळी त्यांना काहीही करण्याची इच्छाच होत नसे. मग कामाच्या ठिकाणी न जाणं, पूर्ण दिवस उदास बसून राहणं अशी त्यांची अवस्था होत असे. या नैराश्यात ‘सगळं संपलंय’ हा विचार इतका त्यांच्या मनाची ठाम पकड घेत असे की, कपूर यांची कार्यक्षमताच त्या अवस्थेत संपून जाई.
यावेळी ते कमालीचे उदास आणि नकारात्मक असत. त्यांच्या अशा अवस्थेवेळी घरालासुद्धा शोककळा येई. घरातला प्रत्येक जण त्याच्यापरीने त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत राही, पण ते त्याला काहीच प्रतिसाद देत नसत. उलट स्वतःला त्यांच्या खोलीत बंद करून घेत. खाणं-पिणं यावेळी कमी होत असे. ही नैराश्याची अवस्था काही काळ राही. काही काळाने या आजाराचा दुसरा भाग सुरू होई. अत्यंत टोकाची असणारी उन्मादाची भावना त्यांच्या मनाची पकड घेत असे. या अवस्थेत ते इतके उत्तेजित असत की, सगळ्यांशी ते भरपूर बोलत असत. त्या अत्यानंदाच्या भरात ‘‘आज मैं बहुत खूष हूं’’ करत भराभर फॅमिली ट्रिप प्लॅन करत. मग घरच्यांची तयारी असो वा नसो, त्यांना त्यांच्या बरोबर जावे लागे. या काळात कपूर भरपूर पैसा उडवत. मागचापुढचा विचार न करता भराभर निर्णय घेत असत. ‘‘जग माझ्या मुठीत आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन’’ असा अत्यंत टोकाचा विचार त्यांना इतकी ताकद देई की, ते कुठलंही काम त्या अवस्थेत संपवून टाकत.
त्यांच्या वागण्या-बोलण्यात लगेच फरक जाणवे. या उत्तेजित अशा अवस्थेत ते अत्यंत आनंदी असत. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा उत्साह असे आणि एकदा का कपूर या अवस्थेतून बाहेर आले की, दुसरी अवस्था सुरू होई, ज्यावेळी त्यांचे सूर निराशेचे असत. असे हे श्री. कपूर त्यांच्या पत्नीसमवेत याच अवस्थेत समुपदेशनाकरिता आले. ‘‘हे असेच राहणार का?’’ त्यांच्या पत्नी काहीशा काळजीने म्हणाल्या. त्यांची पतीबद्दलची काळजी अत्यंत बोलकी होती. खुद्द कपूरसुद्धा या प्रश्नाचे उत्तर जाणून होते, पण बायपोलरच्या नैराश्याच्या अवस्थेत असल्यामुळे या प्रश्नावर त्यांना रडू कोसळले.
‘‘मला या आजाराचे दहा वर्षांआधी निदान झाले. माझी औषधेही चालू आहेत आणि समुपदेशन घेण्याचं मुख्य कारण म्हणजे मला त्रास देणारे विचार, जे माझी पाठ सोडतच नाहीत. मी उत्तेजित अवस्थेत असलो तर पटकन सारासार विचार न करता निर्णय घेऊन टाकतो आणि जेव्हा निराशेची अवस्था होते तेव्हा मी पश्चात्ताप करत बसतो. मी उत्तेजित अवस्थेत असताना भरपूर पैसा उडवलाय, ज्यामुळे आता पैशांची कधी कधी तंगी जाणवते. हा आजार इतका वाईट आहे की, मी कुठल्याही अवस्थेत असेन; माझ्या घरच्यांना चिडीचूपच राहावं लागतं. कारण मला कोणीही हसलं तर आवडत नाही. पटकन राग येतो. ‘माझ्यावर कोणाचं प्रेम नाही’ असं वाटायला लागतं आणि स्वतःचं बरंवाईट करण्याची इच्छा होते.’’
त्यांच्या पत्नीनेही अवंढा गिळला आणि त्या पुढे म्हणाल्या, ‘‘यांचा दोष नाही हे आम्हाला कळतं, पण हे मग स्वतःला दोष देत असेच बसून असतात. ना कामावर जाणं ना इतर गोष्टींकडे लक्ष. या सगळ्यात जास्त कोणी भोगलं असेल तर आमच्या मुलांनी. तीसुद्धा हल्ली बाहेर वेळ जास्त घालवतात. त्यांना आमचं घर म्हणजे एक थिएटर वाटतं, जिथे रोज ड्रामा चालतो.’’
बायपोलर हा मानसिक आजार असाच असतो. त्याला कोणीही काहीच करू शकत नाही. मात्र प्रत्येक केसमध्ये त्याची तीव्रता ही कमीअधिक असते.
श्री. कपूर यांच्याबाबतीत बायपोलरचं स्वरूप हे राग, शिथिलता (नैराश्य अवस्था) आणि अविचारी निर्णय (उत्तेजित अवस्था) असं काहीसं होतं, ज्यामुळे त्यांना कौटुंबिक अशांतता तसंच आर्थिक नुकसान देत होता. या सगळ्यामुळे त्यांना पश्चात्तापाची बोचणी सतत होत होती. या आजारावर त्यांचे औषधोपचार चालू होतेच, पण आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावर समुपदेशनही सुरू झाले (बहुतांशी कुठल्याही गंभीर मानसिक आजारावर औषधोपचार सुरू असतील तर समुपदेशन हे त्यांच्या बरोबर किंवा काही काळाने सुरू होते. मात्र त्यासाठी तज्ञांचा सल्ला अत्यावश्यक असतो).
सर्वप्रथम कपूर यांना औषधोपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. कारण ते नैराश्याच्या अवस्थेत औषधे घेत नव्हते. यासाठी तक्ता बनवला गेला, ज्यावर ते रोज किती वाजता औषधे घेत त्याची ते किंवा त्यांची पत्नी नोंद करीत असे.
त्यासोबतच त्यांचा रोजचा दिनक्रम ठरवण्यात आला, ज्यामध्ये ध्यानसाधना आणि इतर सोपे व्यायाम अंतर्भूत करण्यात आले. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य काही प्रमाणात राखले जाणार होते.
समुपदेशनाचा महत्त्वाचा टप्पा होता ‘विचारांवर आणि भावनांवर दोन्ही अवस्थेत नियंत्रण ठेवण्याचा’, जो काही दिवसांनी सुरू झाला. सर्वप्रथम त्यांना अविचार आणि घाईत कुठलेही काम करण्याआधी ते लिहून काढायचा सल्ला देण्यात आला. त्यासाठी त्यांच्या पत्नीला आणि मोठय़ा मुलीला या प्रक्रियेत सामील करण्यात आले (कपूर यांचा त्यांच्या मोठय़ा मुलीवर जास्त जीव होता).
तसेच नैराश्य अवस्थेतही रोजचा दिनक्रम चालू ठेवण्यास सांगण्यात आले, पण या वेळी त्यांच्या घरच्यांसोबत त्यांना राहण्याचा सल्ला देण्यात आला. कपूर यांना वाचन, टी.व्ही पाहायला आवडायचे. त्यांची आवड या काळात कशी जपता येईल यासाठी त्यांच्या घरच्यांनाही काही मार्गदर्शन करण्यात आले.
‘संवाद’ आणि ‘स्वतःला मनमोकळं करणं’ या आजारावर नियंत्रण ठेवण्याचा काही उपायांपैकी एक असा उपाय आहे. म्हणूनच यासंबंधी कपूर कुटुंबालाच, विशेषतः मुलांना याविषयी समुपदेशन करण्यात आले.
या सर्व प्रक्रियेत आव्हान होते ते म्हणजे त्यांच्या मुलांचा आपल्या वडिलांबद्दलचा राग आणि चीड कमी करणे. तीही शेवटी पहिल्यापासून वडिलांच्या आजारामुळे दुर्लक्षित झाली होती. बऱयाच वेळा कपूर यांच्याकडून नकळत दुखावली गेली होती. हळूहळू का होईना, त्यांनी त्यांच्यापरीने या सर्वात साथ दिली.
काही मानसिक आजार हे योग्य मानसोपचारांनीच नियंत्रणात येतात. औषधोपचार, समुपदेशन आणि कुटुंबाची साथ ही त्रिसूत्री त्यामुळेच महत्त्वपूर्ण ठरते.
आज श्री. कपूर यांनी याच त्रिसूत्रीच्या मदतीने आपल्या ‘बायपोलर’ला व्यवस्थित जाणून घेतले आहे आणि ते त्याला व्यवस्थित ‘मॅनेज’ करत आहेत. आता त्यांच्यासाठी बायपोलर हा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]


























































