
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
गुगलवर उपलब्ध असणारी माहिती ही जरी खरी असली तरी बहुतेक जण ती वरवर वाचून आपले ठाम मत बनवतात. खरं तर ही माहिती त्या त्या विषयासंबंधी जागरूकता निर्माण करण्यास मदत करत असते, मात्र जर कुठलीही शहानिशा न करता आणि त्या विषयातील तज्ञांचे सखोल मार्गदर्शन न घेतल्यास त्यासंदर्भातली अशी वरवरची मते ही आपले वैयक्तिक पातळीवर नुकसानकारकही ठरू शकतात.
रुचिता (नाव बदलले आहे) ही साधारण विशीतली मुलगी. अत्यंत हुशार आणि होतकरू. रुचिताला लिखाणाची अत्यंत आवड होती. लहानपणापासून ती सतत काहीना काही लिहायची. मग तिला आलेले काही अनुभव असोत किंवा दैनंदिन गोष्टी, ती तिच्या शब्दांत लिहून काढायची.
शाळेत असल्यापासूनच रुचिताने लेखिकाच व्हायचं ठरवलेलं होतं. त्यामुळे कॉलेजमध्येही तिने अभ्यासासाठी ‘भाषा साहित्य’ हा विषय निवडला होता. रोजच्या रोज लिखाण करत असल्यामुळे रुचिताच्या विचारांमध्ये परिपक्वता आलेली होती. तशीच लिखाणातूनही प्रगल्भता दिसावी असा तिचा कायम प्रयत्न असायचा.
रुचिताचे आई-वडीलही उच्चशिक्षित पालक होते. त्यांच्या दोन्ही मुलींचे म्हणजेच रुचिता आणि तिच्या धाकटय़ा बहिणीचे संगोपन त्यांनी व्यवस्थितरीत्या केले होते.
एवढं सगळं व्यवस्थित असूनदेखील रुचिताने कॉलेजला ड्रॉप घेतला होता. तिला कॉलेजात जाण्याचं, तिथल्या वातावरणाचं थोडं दडपण आल्यासारखं झालं होतं. आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटत होता. ‘मॅडम, मी काहीच करत नाही. मला खरं तर बरंच काही माझ्या करीअरमध्ये करायचंय, पण मला काय झालंय ते समजतच नाहीये. कदाचित माझ्यातला उत्साह निघून गेलेला असावा. मी तशीही कुणाशी जास्त बोलत नाही. घरातच रमलेली असते. मला कदाचित अभ्यास झेपेल की नाही हे कळत नसल्याने आणि कसली तरी भीती असल्याने मी शेवटी एक वर्ष कॉलेजला न जाण्याचं ठरवलं. मी हल्ली लिखाणही बंद केलेलं आहे. मनात कायम विचार चालू असतात. जे काही ठरवते त्यातही चालढकल चालू असते माझी. मी एक पेंटिंगही करायला घेतलं होतं. तेही बऱयाच महिन्यांपासून अर्धवट आहे.’
रुचिताच्या बोलण्यातून नैराश्य जाणवत नसले तरी स्वतःबद्दलची कमालीची काळजी मात्र नक्कीच जाणवत होती.
‘मला एक सवय लागून गेलेली आहे.’ रुचिता आता मोकळेपणाने स्वतःच्या खऱया समस्येबद्दल बोलत होती. ‘मला पहिल्यापासूनच गुगल करण्याची सवय आहे. मी इतरांसारखी जास्त सोशल मीडियावर नसते, मात्र गुगलवर नक्कीच असते. मला उत्कृष्ट लेखिका व्हायचंय. माझं लिखाण सुधारावं म्हणून मी गुगलवर उत्तम लेखन कसे करावे हे कायम वाचत असते. आता असं झालंय की, तिथे सांगितल्याप्रमाणे मी माझ्या लेखनाची पद्धत बदलली आणि मला काहीच सूचेनासं झालं. अक्षरशः मला इतकी त्याबद्दल माहिती मिळाली आहे की, माझं आता डोकंच चालेनासं झालंय. लिहिणं म्हणजे कुठेतरी ओझं वाटायला लागलं आहे.’
रुचिताया चेहऱयावरचं काळजी आणि चिंतेचं जाळं आता अधिकच स्पष्ट दिसायला लागलं होतं. ती बोलताना सारखी बोटंही मोडत होतीच तसंच बसल्याजागी तिची चुळबूळही वाढत होती.
रुचितानं सर्वोत्तम आणि लोकप्रिय लेखिका होण्याचा ध्यास घेतला होता आणि ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी गुगलचा आधार घेतला होता, पण हल्ली मात्र तिचं हे गुगलवर अवलंबून राहणं जास्तच वाढलं होतं. ती झपाटून ‘सर्वोत्तम लेखन कसे करावे?’ याबद्दल गुगलवर सर्च करत होती आणि अधिकाधिक मिळणाऱया माहितीमुळे गोंधळून जात होती. ‘माझं लेखन हे सर्वांना आवडायलाच हवं’ असे काहीसे तिचे विचार बनत चालले होते. त्यामुळे तिच्यासाठी लिखाण ही आनंददायी गोष्ट न बनता एक ताणाचा विषय ठरत चालली होती. तिचं लेखन तिलाच स्वतःला आता आवडेनासं झालं होतं. ‘मला कदाचित लेखिका म्हणून लोकप्रियता मिळणार नाही’ अशी हुरहुर तिला लागून राहिली होती आणि ती त्याच विचारांच्या गोंधळात पुरती अडकत चालली होती.
आज रुचितासारखी आपल्याला बरीच उदाहरणं सापडतील जी गुगलवर असणाऱया माहितीवरच अवलंबून असतील. हल्लीच्या काळात एकंदरीतच कुठलीही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट हा सोपा आणि आवाक्यात आलेला असा मार्ग आहे आणि याला कुठलाही विषय वर्ज्य नाही. कला, संगीत, खेळ, अभ्यास, आरोग्य अशी एक ना अनेक क्षेत्रं ही एन्सायक्लोपीडिया म्हणून एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. त्यासाठी विशेष असे कष्टही आपल्याला घ्यावे लागत नाहीत. पण ही सगळी माहिती मिळवण्याच्या नादात आपण आपली सर्जनशीलता आणि सारासार विवेकबुद्धी हरवत बसलोय का? याचाही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज इंटरनेटवरून कुठलीही आणि कुठल्याही विषयाची माहिती सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याच्या जोडीला आवश्यक असणारे तज्ञांचे मार्गदर्शन आणि पुस्तके हे जणू दुय्यम स्थानावर आले आहे.
गुगलवर उपलब्ध असणारी माहिती ही जरी खरी असली तरी बहुतेक जण ती वरवर वाचून आपले ठाम मत बनवतात. खरं तर ही माहिती त्या त्या विषयासंबंधी जागरूकता निर्माण करण्यास मदत करत असते, मात्र जर कुठलीही शहानिशा न करता आणि त्या विषयातील तज्ञांचे सखोल मार्गदर्शन न घेतल्यास त्यासंदर्भातली अशी वरवरची मते ही आपले वैयक्तिक पातळीवर नुकसानकारकही ठरू शकतात.
रुचिताचे असेच काहीसे होत होते. ती लेखनाचे कौशल्य गुगलवर उपलब्ध असणाऱया अगणित माहितीच्या आधारे सरसकट शिकण्याचा प्रयत्न करत होती ज्यात तिने स्वतःमध्ये असलेली उपजत लेखन क्षमता हळूहळू गमावली होती. तिचे लिखाण ती तिच्या प्राध्यापकांना न दाखवता; गुगलच्या माहितीच्या आधारे चांगले-वाईट ठरवत होती. या अशा तिच्या अर्धवट वाचून ठरवण्याच्या नादात तिने लेखनाचा आत्मविश्वास गमवला होताच आणि उत्साहही घालवला होता. या सर्वांमुळे रुचिताची काम कमी आणि विचार अधिक अशी अवस्था झाली होती.
तिचा गेलेला आत्मविश्वास आणि लेखनाचे कौशल्य तिला पुन्हा मिळवून देणे हे समुपदेशनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. सर्वप्रथम रुचिताचे अवास्तव गुगल करणे बंद करण्यात आले. यासाठी तिला गुगल करण्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे गुगलऐवजी उपलब्ध असणारे पर्याय (त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन, इतर लेखकांचे लेखन वाचणे) सुचवण्यात आले. रुचिताला आता मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करणे गरजेचे होतेच. त्यासाठी तिला ‘प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेक्शन’ ही ध्यानधारणेची एक पद्धत शिकवण्यात आली.
या सर्वांचा योग्य तो परिणाम हळूहळू दिसायला लागला आणि रुचिता तिचं कॉलेज एन्जॉय करायला लागली. आता ती लेखनाच्या विविध स्पर्धांमधून भाग घेतेच, शिवाय सातत्याने लिखाणही करते आणि गुगल गरज असेल तेव्हाच वापरते.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
n [email protected]