मनतरंग- फॅमिली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर–सौदागर

मोठय़ांच्या अपरिपक्व अशा कुरघोडी करण्याच्या स्वभावामुळे मुलांवर नको ते परिणाम होतात.  ज्यांचा मुलांवरही परिणाम होतो. अशा वेळी पालकांना व्यावहारिक पातळीवर मार्गदर्शन करून कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील यासाठी समुपदेशन होणे गरजेचे असते.  

“आज तुमची अपॉइंटमेंट मिळेल का मॅडम?” अशी विचारणा करणारा फोन आला आणि त्याच दिवशी त्या कुटुंबाला समुपदेशनासाठी येण्यास सांगितलं गेलं. आठवडय़ाचा मधला दिवस असतानाही त्या कुटुंबाने येण्याचं ठरवलं होतं. त्याला कारणही तसंच असणार हे नक्का होतं.

ठरल्यावेळी दोन शाळकरी मुलं आणि त्यांचे नोकरी करणारे आई-वडील असे चारजण केबिनमध्ये बसले होते. जुजबी ओळख करून दिल्यानंतर वडिलांनी मूळ समस्येबद्दल सांगण्यास सुरुवात केली…“मॅडम, आमची वेल टू डू फॅमिली आहे. आम्ही दोघंही आमच्या मुलांशी खूप क्लोज आहोत आणि तशीच आमची मुलंही आमच्याशी. आमची मुलं हुशार आहेत. दोघंही चौथी आणि सातवीत अशा इयत्तांमध्ये शिकताहेत. आता आम्ही जिथे राहतो ती पूर्ण बिल्डिंग आमचीच; म्हणजे आम्हा भावंडांचीच आहे. तीन मजल्यांच्या आमच्या या बिल्डिंगमध्ये एका फ्लोअरवर आम्ही दोन भावंडं आमच्या कुटुंबाबरोबर, एका फ्लोअरवर माझे आईवडील आणि एक भाऊ असे राहतो. तर शेवटचा फ्लोअर आम्ही फंक्शनसाठी किंवा मोकळी जागा असावी म्हणून ठेवली आहे. माझे वडील स्वत कन्स्ट्रक्शनमध्ये होते. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र रहावं म्हणून त्यांनी एक जमीन सुमारे तीस वर्षांपूर्वी विकत घेऊन ही बिल्डिंग बांधली आणि प्रत्येकाचं स्वतंत्र बिऱहाडही करून दिलं. म्हणजे पुढेमागे आम्हा भावंडांमध्ये भांडणं नकोत हा हेतू. पण आता असं झालंय की, आमच्यामध्ये आपापसांत तुलना होऊ लागली आहे.” असं बोलतच त्यांनी मुलांच्या आईकडे पाहिले.

तिने मग पुढे सांगायला सुरुवात केली. वरुण आणि तनुज (नावे बदलली आहेत) या त्यांच्या दोन्ही मुलांना त्याच बिल्डिंगमध्ये राहणारी त्यांची इतर चुलत भावंडं त्यांच्यामध्ये सामील करून घेत नव्हती. कायम त्यांना चिडवणं, एकटं पाडणं आणि खिल्ली उडवणं या प्रकारांनी त्यांना त्रास देत होती. वरुण हा तनुजपेक्षा वयाने मोठा आणि शांत स्वभावाचा होता, तर तनुज तापट. तो क्षुल्लक कारणानेही संतापत असे. खेळायला कोणीही त्या दोघांना घेत नसे. त्यामुळे दोघांनाही वाईट वाटत असे. “आता हे जास्त होऊ लागलं आहे, मॅडम.” डोळ्यांतलं पाणी पुसतच आई म्हणाली, “त्या लहान मुलांबरोबर आमचे दीर आणि जावासुद्धा आम्हाला एकटं पाडत आहेत. कुठलंही घरात कार्य असो, आम्हाला सगळ्यात शेवटी समजतं.”

त्या दोघांच्याही म्हणण्यानुसार या सगळ्याचा जास्तीत जास्त परिणाम हा दोन्ही मुलांवर होत होता. त्यांचे आई-वडील मुलांना त्या नकारात्मक वातावरणातून बाहेर काढण्यासाठी फिरायला नेतही असत. मात्र मुलं कंटाळत. त्यात वरुण जास्त कंटाळून जात असे, पण तो तसा शांत असल्यामुळे कुठेही बाहेर जायचं टाळत होता  आणि अभ्यासाच्या नावाखाली स्वतला खोलीत कोंडून घेत होता. तनुज बाहेर गेल्यावर स्वतच्या मागण्या पूर्ण करून घेत असे. मग आई-वडिलांसमोर त्याच्या मागण्या पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसे. अशी विचित्र कोंडी या कुटुंबाची झालेली होती. एका बाजूला पालक  हतबल होते, तर दुसऱया बाजूस मुलांचाही कोंडमारा होत होता. समुपदेशन सत्रांत या चौघांशीही वैयक्तिकरीत्या बोलणं गरजेचं होतं. त्यानुसार सत्रांची आखणी करण्यात आली.

सुरुवातीला वरुण आणि तनुजसाठी सत्रे घेतली जाऊ लागली. त्यामध्ये त्या दोघांशी बोलताना जाणवलं की, दोघेही मनमोकळ्या स्वभावाचे होते आणि त्यांना इतर मुलांशी मैत्री करायला आवडायचं. त्यांचा मित्रपरिवारही होता, पण आजूबाजूला असणाऱया त्यांच्या भावंडांमुळे ते दोघंही आपापल्या मित्रांना घरी खेळायला बोलवत नसत. सततच्या टोमण्यांमुळे दोघांनाही न्यूनगंड निर्माण झाला होता. त्या दोघांनाही सतत प्रश्न पडायचे की, मॅम, ते सगळे तर आमचे कझिन्स आहेत. तरीही आमच्याशी का बोलत नाहीत? आम्ही चांगले नाही आहोत का? किंवा त्या सगळय़ांनी आमच्याशी खेळावं म्हणून आम्ही काय करू?

त्यांच्या या प्रश्नांतून त्या दोघांना ‘एकटं पाडल्याची’ बोच जाणवत होती. “आता तुमची भावंडं तुमच्याशी असं का वागताहेत याची उत्तरं तर सध्या आपल्याकडे नाहीत आणि मीही ती देऊ शकणार नाही, पण एक सांगू शकते… ती भावंडं म्हणजेच तुमचं सर्वकाही आहे का? ज्यामुळे तुम्हाला इतकं फील होतंय?” यावर वरुण विचारात पडला. थोडा विचार करून म्हणाला, “तसं नाही म्हणता येणार. मी आणि तनुजही गेम्स खेळतो ना! माझे फ्रेन्ड्सही आहेत, पण रोज त्यांच्याशी शाळा संपल्यावर खेळता येत नाही आणि हा सतत भांडतो,” असं म्हणून त्याने तनुजकडे बघितलं. तनुजही पटकन म्हणाला, “अरे दादा! तूच रडीचा डाव खेळतोस… आणि मेन म्हणजे मला घरी गेम्स खेळण्यापेक्षा ग्राऊंडवर जास्त आवडतं.”

 “मग तसं सांग ना” वरुण पटकन त्याला म्हणाला. “मग तुम्ही एक डील का नाही करत? एक वेळ ग्राऊंड आणि एक वेळ घरी गेम्स असं काही केलं तर?” असा तोडगा त्यांना सुचवताच दोघांचेही चेहरे खुलले.

त्यासोबतच त्यांच्या पालकांचीही सत्रे सुरू झालेली होतीच. त्यांच्याशी बोलताना एक जाणवलं की, मोठय़ांच्या अपरिपक्व अशा कुरघोडी करण्याच्या स्वभावामुळे सगळ्यांच्याच मुलांवर नको ते परिणाम होत होते आणि अहंकार, मोठय़ांचा अनादर तसंच दुसऱयाला कमी लेखल्यावरही त्यांना मिळणारं प्रोत्साहन या चुकीच्या गोष्टींमुळे वरुण आणि तनुज भरडले जात होतेच, शिवाय त्यांच्या पालकांनाही सर्व बाजूंनी मनस्ताप होऊन त्यांनाही ताण आणि नैराश्याने ग्रासलं होतं. म्हणून त्यांच्या पालकांना व्यावहारिक पातळीवर विचार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या नकारात्मक वातावरणातून दूर जाण्यासाठी काही पर्यायांचा विचार करण्यास सांगण्यात आलं. म्हणजे  नातीही तुटणार नाहीत आणि कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील.

ही अशी चौघांबरोबर वैयक्तिक तसंच एकत्रित सत्रं चालू असतानाच एक दिवस वरुण आणि तनुजने सांगितलं की, ते आता नवीन घरात जाणार आहेत. त्या दिवशी त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱयावर सुटका झाल्याचे भाव जाणवले आणि कौटुंबिक समुपदेशनाचा योग्य तो परिणाम होत असल्याची पुष्टी मिळाली.

एकत्र कुटुंबामध्ये वादविवाद किंवा कलह हे आजकाल थोडय़ाफार प्रमाणात असतातच. मात्र त्यातून बाहेर पडायचं असेल आणि मानसिक स्वास्थ्य जपायचं असेल तर सर्वात आधी स्वतच्या कुटुंबातील व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्यासंबंधी अधिकाधिक विचार होणं गरजेचं असतं. त्यासाठी काही वास्तवतेशी समरूप अशी व्यावहारिक पावलं टाकणंच श्रेयस्कर ठरतं.

[email protected]

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)