दखल : मर्यादित शब्दांची ‘बंदिस्त रुणझुण’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

डॉ. शशिकांत गंगावणे यांचा हायकू कवितासंग्रह ‘बंदिस्त रुणझुण’ नुकताच प्रकाशित झाला आहे. आशयाला कमीतकमी शब्दात बसवून विषय मांडणे यात अभिप्रेत आहे. 17 शब्द 5-7-5 अशा प्रकारे हायकूत असतात. प्रत्येकाच्या मनात एक विचारांची मालिका असते. विचारांना बंदिस्त करणं हे एक कौशल्य आहे. योग्य शब्दांना एकत्र बंदिस्त केलं की, एक रुणझुण मनात जाणवते. शब्दांना शिस्तीत, लयीत, बंदिस्त केले की, कविता होते. पैंजणाची रुणझुण असते तशी शब्दांचीही रुणझुण असते. अशीच शब्दांची बंदिस्त रुणझुण डॉ.शशिकांत गंगावणे यांनी आपल्यासमोर सादर केली आहे.

सुरुवातीलाच आपल्या मनातील भाव हायकूच्या स्वरूपात प्रकट केले आहेत. निसर्गाची मानवी मनाशी सांगड घालणे म्हणजे हायकू. आधुनिकीकरणामुळे निसर्ग कमी होत चालल्यामुळे सभोवताली जे जे आहे, त्याचीच आज मनाशी सांगड घालावी लागते.

हायकू लिहिणाऱ्यापेक्षा आकलन करणाऱ्यांची जबाबदारी जास्त असते. आशय मांडत असताना कमीतकमी शब्दांत विषय आकलन होण्यासाठी त्यांची गुंफण करणे म्हणजे हायकू.

गर्भ ठेचले
सुशिक्षितांच्या पोटी
प्रतिष्ठा खोटी

प्रतिष्ठेसाठी अनेक गर्भ ठेचले जातात. मुलगी नकोत म्हणून सुशिक्षित ही प्रतिष्ठेची बाब करतात.

फुलांचा सडा
नसेना माझ्या दारी
तुळस घरी

अंगणात तुळस वातावरण पवित्र करते. फुले नसली तरीही तुळस हवीच. फुले वातावरण सुगंधी करतात, पण तुळस वातावरण पवित्र करते. काळानुसार विविध प्रकारच्या हायकू काळजाला भिडतात. हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीतही रुळत आहे. डॉ. शशिकांत गंगावणे यांची शब्दांची कसरत अनुभवावी अशीच आहे.

बंदिस्त रुणझुण
लेखक : डॉ. शशिकांत गंगावणे
प्रकाशक : संवेदना प्रकाशन
मूल्य : रुपये 150/-