सा रम्या पुण्यनगरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मंजिरी भालेराव

पुण्याचे महत्त्व हे इ.स.च्या 8व्या शतकात म्हणजे राष्ट्रकूट राजांच्या काळात किती वाढले होते हे समजते. त्याच काळात पुण्यातील पाताळेश्वर नावाचे शैव लेणे कोरले गेले. किनारपट्टीच्या प्रदेशातून घाटमार्गाने सह्याद्री डोंगररांगा पार करून देशावर आल्यावर जे मोठे वसतिस्थान लागते ते काळाच्या ओघात मोठे नागरी, व्यापारी केंद्र बनते हे नाशिक, जुन्नर, कराड, कोल्हापूर अशा उदाहरणांतून सहज लक्षात येते. पुणेही त्याला अपवाद नव्हते. बोरघाटातून देशावर आल्यावर लागणारे सर्वात मोठे नगर हे त्या काळात पुणेच असावे असे वाटते. यादव-शिलाहार काळात पुण्याची अशीच भरभराट होऊन पुणे हे ‘देश’ या विभागाचे प्रशासकीय केंद्र बनले होते.

छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक यांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पुणे परिसराचा काही लाख वर्षांपूर्वीचा इतिहास आपल्याला समजू शकतो, असे जर कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. आजपासून जवळ जवळ 8 लाख वर्षांपूर्वी आजच्या इंडोनेशियामधील सुमात्रा नावाच्या बेटावर टोबा नावाच्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जी राख आकाशात उडाली ती हवेच्या जोराने दक्षिण आशियात अनेक ठिकाणी पसरली आणि पडली. पुणे जिल्ह्यातील नारायणगावजवळील बोरी-सालवाडी आणि मोरगाव या ठिकाणीसुद्धा ती आढळली. एवढेच नव्हे, तर त्या राखेच्या खाली अश्मयुगीन मानवाने केलेली दगडी हत्यारेसुद्धा सापडली. त्यामुळे या परिसरात या काळात मानवाचे अस्तित्व होते हे सिद्ध झाले. डेक्कन कॉलेजच्या डॉ. शीला मिश्रा, डॉ.शरद राजगुरू, डॉ. सुषमा देव आणि इतर यांनी केलेल्या संशोधनातून हा सर्व पुरावा उजेडात आला आहे.

प्रागैतिहासिक माणूस पुणे जिह्यात जसा अनेक ठिकाणी वास्तव्यास होता तसाच तो आजच्या पुणे शहरातही होता असे पुरावे दत्तवाडीजवळ, बंडगार्डनजवळ आणि डेक्कन कॉलेजच्या परिसरात डॉ. ह. धी. सांकलिया आणि डॉ. शरद राजगुरू यांनी शोधले होते. डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनीही पुणे परिसरात सर्वेक्षण करून मध्याश्मयुगातील मानवाने केलेली सूक्ष्मास्त्रे वेताळ टेकडीवर सापडल्याचे नोंदवले होते.

पुणे जिल्ह्यात इतिहासपूर्व काळातील अनेक स्थळे नोंदवली गेली आणि त्यापैकी अनेकांचे उत्खननही झाले. थेऊर, साष्टेवाडी, चांडोली, सोनगाव, वाळकी, कोरेगाव-भीमा, इनामगाव अशा अनेक ठिकाणी साधारणपणे आजपासून 3700 वर्षांपूर्वीच्या ताम्रापाषाणयुगीन वसाहतींचे अवशेष मोठय़ा प्रमाणावर उजेडात आले. घोड, मुळा, भीमा या नद्यांच्या काठावर असलेल्या या वसाहतींमध्ये इनामगाव हे शिरूरजवळील गाव अत्यंत महत्त्वाचे ठरले. या ठिकाणी डेक्कन कॉलेजच्या डॉ.म.के. ढवळीकर, डॉ.वसंत शिंदे, डॉ. अन्सारी यांच्या चमूने तेरा वर्षे उत्खनन केले. एक ताम्रपाषाणयुगीन गावच उजेडात आले. त्या लोकांची घरे, भांडीपुंडी, उद्योग-व्यवसाय, शेती, पाणीपुरवठा, त्यांच्या धार्मिक परंपरा, अंत्यविधीचे प्रकार, त्यांची गुरेढोरे, वसाहतीच्या काळातील हवामानात होणारे बदल इ. आणि इतर अनेक गोष्टींवर यातून प्रकाश पडला. भोसरी परिसरात साधारणपणे इ.स. पूर्व 1000 च्या काळातील महापाषाणयुगीन दफनेसुद्धा तज्ञांनी नोंदवली आहेत.

पुणे जिह्यात जरी अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे अनेक पुरावे सापडले असले तरी खुद्द पुणे शहरात मात्र मोठय़ा प्रमाणात पुरातत्त्वीय उत्खनन करता न आल्यामुळे नेमका पुरावा काय आहे हे अजून स्पष्टपणे कळलेले नाही, परंतु काही वर्षांपूर्वी पुरातत्त्वज्ञ वरदा खळदकर आणि डॉ. मंजिरी भालेराव यांनी सांगवी येथे केलेल्या सर्वेक्षणात आजपासून 3000 वर्षांपूर्वीचे ताम्रपाषणयुगीन खापर सापडले होते. पुणे शहराचा सर्वात जुना भाग म्हणून ओळखला जाणारा कसबा पेठ हा भाग खूप वस्तीने गजबजलेला असल्यामुळे त्या परिसरात शास्त्रीय पद्धतीने मोठय़ा प्रमाणावर उत्खनन करता आलेले नाही. तरीही अनेकदा घरांचा पाया खणताना किंवा पाइपलाइनचे काम करताना काही प्राचीन अवशेष अचानक सापडले आहेत. त्या त्यावेळेस डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वज्ञांनी तिथे शक्य तेवढे उत्खनन केले. तेव्हा ते सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्व 1ल्या शतकातील अवशेष होते हे लक्षात आले. त्याहून खाली काय आहे हे पाहणे शक्य न झाल्यामुळे सर्वात खालचा स्तर कोणत्या संस्कृतीचा आहे हे सांगता येणे अवघड आहे.

पुणे आणि उपनगरे या परिसरात वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना, राम या नद्यांचा तीन ठिकाणी एकमेकांशी संगम झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे या भागात पाण्याचा कधीच तुटवडा नव्हता. आज जरी या नद्या आकाराने लहान वाटत असल्या तरी त्या नद्यांच्या जाळ्याने हा सगळा परिसर सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. त्यामुळे या परिसरात प्राचीन मानवाने वस्ती केली नसती तरच नवल! ज्या ठिकाणी दोन नद्यांचा संगम होतो, त्या ठिकाणी भेट देऊन जर त्या संगमात स्नान केले तर मोठे पुण्य लाभते असे हिंदुस्थानी परंपरेत मानले जाते. या ठिकाणी सर्वात मोठा संगम हा मुळा आणि मुठा या नद्यांचा आहे, पण येथे असलेली मुळा आधीच राम आणि पवना यांच्या संगमाचे पाणी घेऊन पवित्र झालेली आहे. त्यात तिचा मुठेशी संगम झाल्यावर हे क्षेत्र अत्यंत पवित्र, पुण्यकारक समजले गेले यात आश्चर्य वाटायला नको. या संगमाच्या जवळची वसाहत ही त्याच पुण्याच्या नावाने ओळखली गेली आणि तिचे नाव ‘पुणक’ असे पडले असावे. पुण्य देणारे ते ‘पुणक’, त्यातूनच पुढे इ.स.च्या 8 व्या शतकात ‘पुणकविषय’,

इ.स.च्या 10 व्या शतकात ‘पुणकदेश’ असे हे नाव काळाच्या ओघात बदलले गेले. ‘विषय’ म्हणजे आजच्या जिह्यासारखा प्रशासकीय प्रदेश. ‘पुणकविषय’चे पुणक हे पेंद्र होते, तर ‘देश’ हा विषयापेक्षा अजून मोठा प्रशासकीय विभाग होता. या दोन्हींचे पुणे हे पेंद्र होते हे नावातून लक्षात येते. त्यामुळे पुण्याचे महत्त्व हे इ.स.च्या 8व्या शतकात म्हणजे राष्ट्रकूट राजांच्या काळात किती वाढले होते हे समजते. त्याच काळात पुण्यातील पाताळेश्वर नावाचे शैव लेणे कोरले गेले.

किनारपट्टीच्या प्रदेशातून घाटमार्गाने सह्याद्री डोंगररांगा पार करून देशावर आल्यावर जे मोठे वसतिस्थान लागते ते काळाच्या ओघात मोठे नागरी, व्यापारी केंद्र बनते हे नाशिक, जुन्नर, कराड, कोल्हापूर अशा उदाहरणांतून सहज लक्षात येते. पुणेही त्याला अपवाद नव्हते. बोरघाटातून देशावर आल्यावर लागणारे सर्वात मोठे नगर हे त्या काळात पुणेच असावे असे वाटते. यादव-शिलाहार काळात पुण्याची अशीच भरभराट होऊन पुणे हे ‘देश’ या विभागाचे प्रशासकीय केंद्र बनले होते. अशा या समृद्ध आणि संपन्न नगरीवर ताबा मिळवण्यासाठी अनेक सत्तांमध्ये चढाओढ लागली असणार हे आपण समजू शकतो. अशाच उद्देशाने दिल्ली सुलतानांनी बडा अरब नावाचा आपला अधिकारी पुण्याचा ताबा घेण्यासाठी पाठवला. त्याने पुण्यात आल्यावर आज जिथे शनिवारवाडा आहे, त्याच परिसरात ‘किल्ले हिस्सार’ नावाचा एक भुईकोट किल्ला आणि त्याला ‘पांढरीचा कोट’ (तटबंदी) बांधला. या नोंदीवरून लक्षात येते की, जुन्या पुण्याच्या वस्तीची पांढर (अनेक वर्षांच्या मानवी वसाहतीने पांढरट झालेली माती) त्याने त्याच्या कोटासाठी वापरल्यामुळे प्राचीन वसाहतीचे अवशेष इ.स. 12व्या-13व्या शतकातच नष्ट झाले. या घटनेनंतर पुण्याच्या इतिहासाला एक वेगळे वळण लागले. त्यापैकी काही महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या भागात पाहू.

(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
 [email protected]