टाळेबंदीमधील अनाहुत पाहुणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. नागेश टेकाळे

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर ‘न भूतो न भविष्यती’ असे प्रदूषण कमी झाले आहे. मानवी जगताची आर्थिक चाकं रुतली असली तरी निसर्गात मात्र पक्षी-प्राणी मुक्तपणे वावरत आहेत. निसर्गाचं हे रूप खरोखरच अनुभवण्यासारखं आहे.

24 मार्च कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी टाळेबंदीची घोषणा झाली आणि देशाच्या निसर्गसंपत्तीवर राज्य करणारा लोभी मनुष्य प्राणी प्रथमच चार भिंतीच्या आत बंद झाला. विमनस्क अवस्थेत दोन दिवस घरामध्येच फिरत असताना प्रथमच मला गॅलरीचे महत्त्व समजले. दोन तीन दिवसांनी थोडी सकारात्मकता स्वीकारून मी गॅलरीमधून बाहेरचा निसर्ग न्याहाळण्यास सुरुवात केली आणि सर्वप्रथम विदेशी म्हणून शिक्का मारलेल्या सोनमोहर वृक्षावर लक्ष केंद्रित केले. झाडाखाली पडलेल्या पिवळ्या फुलांच्या गालिच्यामध्ये थोडी हालचाल जाणवली. आणि काय आश्चर्य त्यामधून पिवळा धम्म रंगाचा एक सरडा सर्रकन पुढे जाऊन खोडावर त्याची शेपटी हलवत कुठेतरी एकटक पाहू लागला. निश्चितच तो त्याच्या भक्ष्याच्या शोधात होता. पाच मिनिटे स्वारी त्याच अवस्थेत तेथे होती. माझी नजर बाजूच्या फांदीवर गेली. दोन हिरव्याकंच पोपटांचे हितगुज सुरू होते. नजर हटवून मी कंपाउंडची भिंत आणि त्यापलीकडच्या सिंगापूर चेरी च्या लहान झाडाकडे पाहिले. पिवळा बुलबुल लालबुंद चेरी खाताना मला, ‘येतोस का?’

फोटो काढण्याचा मोह टाळून मी त्या दृश्याकडे एकटक पाहत राहिलो. कॅमेऱयाच्या लोभापोटी अशी अनेक निसर्गदृश्य आपण प्रत्यक्ष न अनुभवता क्लिकवरच लक्ष केंद्रित करतो. सिंगापूर चेरीने लॉकडाऊनमध्ये माझ्यासाठी आनंदाचा एक निर्झरच तयार केला होता. प्रतिदिन गॅलरीत जाऊन मी त्या झाडावर कितीतरी पक्ष्यांची मेजवानी पाहिली. त्यात बारबेट बरोबरच सूर्यपक्षी होते. गुलाबी मानेचे छोटे कबुतर आणि त्या दिवशी पाहिलेला लालबुडया बुलबुल प्रत्येक दिवशी त्याच्या नवीन मित्रमैत्रिणीस घेऊन येत होता. एके दिवशी तर 9-10 पोपटांनी त्या चेरीला ताब्यात घेऊन सकाळच्या गुलाबी भोजनास सुरुवात केली. जेवणाऱयाच्या ताटाकडे पाहू नये असे संस्कार असतानाही जीव व्याकुळ होत होता. माझ्या लहान दोस्तांसाठी ही हिरवी टोळी काही शिल्लक ठेवणार की नाही, असे वाटून गेले.

दुसऱया दिवशी पहाटे उठून प्रथम गॅलरीत गेलो आणि पाहतो तर काय? केवढे तरी अनाहूत छोटे पाहुणे लालचुटूक चेरी खाण्यात मग्न होते. काल संपलेल्या चेरी आज एवढया कुठून आल्या आणि त्याही लालबुंद! वृक्ष आणि पक्षी यांचे ते नातेच वेगळे असते. प्रत्येकालाच आपला वंश वाढवायचा असतो. चेरी खाऊन त्याच्या बीया पक्ष्याच्या वि…sमधून बाहेर आल्याशिवाय रुजतच नाहीत. पूर्वी केवढे तरी चेरीचे वृक्ष त्या जागेत होते. सर्व पक्ष्यांचीच निर्मिती होती. कोणीतरी एका विकासकाने ती जागा विकत घेतली, चारीही बाजूने पत्रे चढवले आणि आठ दिवसांत आतमध्ये स्वच्छ मैदान तयार झाले. फक्त हा एकटाच वृक्ष कंपाउंडच्या भिंतीत आणि त्याच्या फांद्याही आमच्याच बाजूला झुकलेल्या म्हणून वाचला होता. आज मला तो सत्यभामेच्या परिजातकाप्रमाणे वाटत होता. एक महिन्यापूर्वी याच वृक्षाला त्याच्या भाऊबंदाच्या विरहात कोमेजून मरणाची वाट पाहत असलेला पाहिले होते. तोच आज टाळेबंदी नंतर एकदम फुलून उठला होता, केवढय़ातरी चेरी त्याला लगडल्या, कितीतरी लहान पक्षी त्याच्या अंगाखांद्यावर नाचत होते. आता मी वाट पाहत आहे ती पावसाची आणि वृक्षाखाली उगवणाऱया वृक्ष बाळाच्या प्रभावळीची.

वृक्ष आणि पक्ष्यांच्या नात्यांची ही घट्ट वीण आपण कधी पाहण्याचा प्रयत्नच केला नाही. गेल्या एका महिन्यात कितीतरी अनाहुत पाहुण्यांनी मला आनंद दिला. सूर्यपक्षी, सुभग, टोपीवाला खंडया, सुतार, धीवर, तांबट, चष्मेवाला हळद्या, कोकीळ, नवरंग, शिंपी, शिंजिर, वटवटया, शिक्रा, कितीतरी चिमण्या, मैना, सातभाई, चिरक, दयाळ आणि भारद्वाजसुद्धा. माणसाला घाबरून कायम वृक्षसांभारात लपणारा हा पक्षी आज मला दिवसातून कितीतरी वेळा भेटतो. छोटा किंगफिशरही असाच अचानक भेटला. कोकीळची कुहुकुह प्रतिदिन पहाटे मला उठवत असते. पूर्वी असे कधीही घडले नव्हते.

कावळे, चिमण्या आणि कबुतरे सर्वांनाच दिसतात मात्र एवढे विविध रंगाचे सौंदर्य एका महिन्यात आले कुठून? उत्तरंही सोपे आहे ते म्हणजे ज्याची त्यांना भीती होती तेच त्यांच्या वाहनासह घरात बंद आहेत. हवेमधील प्रदूषण दहा पटीने कमी झाले आहे. प्रदूषित हवेला नेहमी दिसणारे पक्षी सरावलेले आसतात पण अनाहूत पाहुणे मात्र थोडे दूर,गर्द झाडीत लपलेले असतात. तेथील स्वच्छ प्राणवायू हाच त्यांचा आधार असतो. प्रदूषित हवा आणि सततचा वाढता आवाज हे पक्ष्यांचे दोन मुख्य शत्रू. टाळेबंदीमुळे दोन्हीही घटक कमी झाल्याचा अंदाज आल्यावर या पाहुण्यांचा वावर वाढू लागला. अर्थात तो संख्येने नव्हे तर त्याच्या परिसरामधील हालचालींतून व्यक्त होत होता. पक्षी हे समुद्राच्या वाटा, धबधबे, वादळे, पाऊस, विजेचा कडकडाट आणि पावसाच्या आवाजाला नैसर्गिक पध्दतीने सामोरे जातात. पण जेव्हा अचानक फटाक्यांचा मोठा आवाज होतो तेव्हा हेच पक्षी घाबरून दिशाहीन उडू लागतात.

पक्षी तज्ञांनी मेक्सिको शहरामधील पक्ष्यांच्या आणि शहरामधील वाहतुकीचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मोठय़ा आवाजाने अनेक पक्ष्यांची श्रवणकेंद्रे तेवढी कार्यक्षम राहिलेली नाहीत. पक्षीअभ्यासक असेही म्हणतात की पूर्वी लहान थव्यांमध्ये राहणारे पक्षी आता वाढत्या ध्वनी प्रदूषणापासून सुरक्षा मिळवण्यासाठी त्यांच्या थव्याचा आकार मोठा करत आहेत. सातभाई हा लहानसा पक्षी सातच्या थव्यामध्ये आढळतो. ग्रामीण भागात अजूनही हे चित्र आढळते मात्र शहरामध्ये आज हेच पक्षी सातपेक्षा जास्त मोठय़ा थव्यामध्ये दिसून येतात. अनेक पक्षी त्यांच्या वेगवेगळ्या आवाजातून, मंजुळ गाण्यामधून समूहामधील त्यांच्या प्रियजनाशी संवाद साधत असतात. अनेकदा हा संवाद संकटाची चाहूल, अन्नाची उपलब्धता, आकर्षण आणि प्रजोत्पादनासाठी असतो. मात्र शहरामधील कोलाहलात असा संवादच होऊ शकत नाही. म्हणूनच शहर परिसरामधील अनेक सुंदर पक्षी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. चैत्रामध्ये लिंबायाला छान छोटी पांढरी सुगंधी फुले येतात. वृक्ष फुलांनी बहरून जातो. अनेक मधमाश्या त्याकडे आकर्षित होतात आणि त्यांना भक्ष्य करण्यासाठी ‘बी फ्लाय कॅचर’ हे छोटे पक्षी सुद्धा. शहरामधील लिंबाऱयाला मी ग्रामीण भागातील वृक्षाप्रमाणे आलेली फुले आणि लिंबोळ्या पाहिल्या नाहीत कारण ध्वनी हा मधमाश्या आणि या पक्ष्यांचा शत्रू आहे. मधमाश्या नाहीत म्हणून बी फ्लाय कॅचर नाही आणि मधमाश्याच नसतील तर लिंबारा या वृक्षाने एवढी फुल निर्मिती करून त्याची ऊर्जा का वाया घालवावी? ध्वनी प्रदूषणामुळे लिंबाऱयाची जैवविविधता नष्ट होऊन या दोन घटकांचाही नाश झाला आहे. महानगरांमध्ये असे अनेक वृक्ष आणि त्यांची जैवविविधता या वाढत्या आवाजाने नष्ट केली आहे.

आज लॉकडाउनमध्ये माझ्या गृहसंकुलामधील लिंबारा केवढा तरी फुलला असावा याचा अंदाज मी त्याच्या पहाटेच्या सुगंध लहरींमधून सहज ओळखले. गृहसंकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच्या हॅलोजनच्या प्रखर दिव्यावर सायंकाळी कितीतरी पतंग झेप घालताना दिसत आहेत आणि त्यांच्यावर ताव मारणारा ‘वेडा राघू’ हा पक्षीही प्रथमच मी पाहतो आहे. कुठे होता तो इतके दिवस? हवा प्रदूषण हा पक्ष्यांचा असाच एक शत्रू. पक्षी हवेतून प्राणवायू घेतात आणि कर्ब वायू बाहेर टाकतात. आपल्याप्रमाणे त्यांची श्वसनसंस्था प्रगत नसते. हवेमध्ये उडताना ऊर्जेसाठी त्यांना जास्त प्राणवायू लागतो पण प्रदूषित हवेत तो तेवढा शुद्ध त्यांना मिळत नाही उलट श्वासाबरोबर धुलीकणच त्यांच्या शरीरात जास्त जातात. संशोधनाने असे सिध्द झाले आहे की शुद्ध हवेच्या अभावी पक्ष्यांना लवकर धाप लागते. ते थकतात आणि नजिकच्या वृक्षावर स्थिरावतात पण वृक्षच उपलब्ध नसतील तर? शहरामधील पक्षीसंख्या कमी होण्यामागे वृक्षतोड आणि देशी वृक्षसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत.

फिनलँडमधील संशोधन असे सांगते की, हवेतील कर्ब वायू, कार्बन मोनाक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड या घटकांबाबत जमिनीवर उडय़ा मारत चालणारे, कमी उंचीवर उडणारे लहान पक्षी जास्त संवेदनशील असतात. वाहनांमधून जीवाष्म इंधन जाळल्यामुळे अनेक अस्थिर सेंद्रिय संयुगे तयार होऊन त्यामधून घातक ओझोनची निर्मिती होते. शहरामधील चिमण्या कमी होण्यामागे धूर ओकणारी वाहने जास्त जबाबदार आहेत. गॅलरीमधून खाली पाहताना मला किती तरी चिमण्या जमिनीवर बागडताना दिसत होत्या. त्या एवढया कुठून आल्या याचे उत्तर मला मिळाले होते.
हिंदुस्थानातील पक्ष्यांची स्थिती दर्शविणारा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच सादर झाला. 2000 सालाच्या तुलनेत गेल्या 20 वर्षात देशामधील 50 टक्के पक्षी कमी झाले आहेत आणि त्यामध्ये महानगरे आघाडीवर आहेत.या पक्षिसंख्येत किटकभक्षी पक्ष्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. पक्षी आणि त्यांच्याबरोबरचे आपले नाते याची वीण कुठेतरी विस्कटून जात आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या प्रोफेसर आणि पक्षी अभ्यासक डॉ. सँडरफूड म्हणतात की, शहरामध्ये हवेची आणि आवाजाची गुणवत्ता दर्शविणारे फलक लावले जातात. यामध्ये या घटकांना संवेदनशील असणाया पक्ष्यांची संख्यासुद्धा असावी कारण ही वाढती संख्याच तुमच्या स्वच्छ हवेचे आणि कमी आवाजाचे खरे दर्शक आहे.

कोरोना लॉकडाउनमध्ये आपण सगळ्यांनीच हे अनुभवले. येणारे पाहुणे कायमचे राहणारे नसतात पण या अनाहूत पाहुण्यांना आपल्याकडे कायमचे राहण्यासाठी आमंत्रित करावयाचे असेल तर शहरात सुदृढ सुरक्षित देशी वृक्षांबरोबरच आपण आपली जीवनशैली आणि राहणीमानसुद्धा पर्यावरणस्नेही करणे गरजेचे आहे. म्हणतात ना ‘पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी दसरा’, म्हणूनच यापुढे येणाराआपला प्रत्येक दिवस या अनाहूत पाहुण्यांसाठी दिवाळी दसरा ठरो हीच शुभेच्छा.

[email protected]
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)