प्रासंगिक : माणुसकी हाच खरा धर्म

2947

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]

आज आपण आधुनिक काळात वावरतोय. जगात प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती झाली आहे. सगळीकडे यांत्रिकी संसाधनांचा बाजार दिसतोय, पण माणूस आपल्या मुळापासून दूर होतोय, भरकटत चाललाय. माणूस एवढा स्वार्थी वृत्तीचा झालाय की, स्वतःच्या फायद्यापोटी कोणाचे अहित होत असले तरीही स्वतःलाच महत्त्व देतो. आपल्यात माणुसकी नसेल तर माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला हवी. आपल्या डोळ्यासमोर वाईट घटना घडताना दिसूनही मनात दया, करुणा उत्पन्न होत नसेल तर आपण मानव नाही. माणसाची ओळख त्याच्या कपडय़ांवरून होते, कर्तृत्वावरून नाही. आदर व संस्काराचा अंत होत आहे. आज आपण कोणत्याही माध्यमांद्वारे बातमी ऐकली किंवा बघितली तर आपल्याला कळते की, समाजात किती अमानवीय घटना घडत आहेत. माणूस एवढा स्वार्थी झाला की, त्याने पशु-पक्ष्यांचे क्षेत्रही हिरावून घेतले. पुढच्या पिढीच्या हिश्शाचे नैसर्गिक संसाधने, इंधन, शुद्ध जल, प्राणवायू, वने, हिरवेगार वातावरण माणूस संपवत आहे. 

कोणताही धर्म इतर धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही. अर्थात सर्वच धर्म न्याय, शांती व समभावाची शिकवण देतात, पण मानवच धर्मात अंतर बघतो. सर्व मानव सारखेच. मग हा भेदभाव कशाकरिता? जगात सगळीकडे गावांत, शहरांत जातीभेद करून  गंभीर घटना घडतच चालल्या आहेत. मुले अनाथ, लोक बेघर होत आहेत. आजचा मानव मानवतेकडे न वळता दानवतेकडे वळत आहे. जगात कुठेही चांगल्या कामाचे कौतुक व वाईट घटनेवर बंधन घालायलाच हवे. सर्व प्राण्यांमधे मानवातच जास्त विचारशक्तीची क्षमता आहे. तरीसुद्धा पुष्कळदा रानटी प्राण्यापेक्षा जास्त वाईट कृत्य मानवच करतो. प्रेमाने मन जिंकणे, दया, करुणा व निःस्वार्थ सेवाभाव हाच जगात माणुसकीचा आधार आहे. जगात माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नाही.

आज ‘मी, माझा’ असा विचार येतो, पण ‘आपला’ असा विचार करणारे काहीच. म्हणजे स्वतःपुरता विचार करणाऱया लोकांमध्ये स्वतःचा श्रेष्ठत्व आणि इतरांप्रति ईर्षाभाव वाढला आहे. नात्यात, मैत्रीत, परिवारात, शेजारात, ऑफिस, कोणत्याही ठिकाणी असेच घडत असते. माणूस का असा वागतो? माणुसकीच नसेल तर तो मानव कसला? जास्त गुन्हे ईर्षा व श्रेष्ठत्वामुळेच घडतात. त्यामुळे सज्जन माणूस फसत आहे, फसवला जात आहे. बेइमान लोक यशाकडे जात आहेत व इमानदार संघर्षच करत चाललाय. आई-वडील दहा मुलांचे पालन करू शकतात, पण दहा मुले मिळूनसुद्धा आपल्या आई-वडिलांचे पालन करू शकत नाहीत यापेक्षा जगात काय दुर्भाग्य असणार! कित्येक ठिकाणी मानवाचे जीवन जनावरांपेक्षाही वाईट परिस्थितीत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद आदी अनेक संत आणि समाजसेवकांनी आपले संपूर्ण जीवन जनतेच्या सेवेत खर्चले. आजही गडचिरोलीचा आमटे परिवार, मेळघाटातील डॉ. कोल्हे परिवार, सिंधूताई सपकाळ, मेधा पाटकरसारखी माणसे  खऱया अर्थाने माणुसकी जिवंत ठेवून आहेत. म्हणजे हे व्यक्तिगण जगात मोठय़ा समृद्धी व विलासी जीवन जगू शकतात, पण त्यांनी लोकसेवेसाठी जीवन जगायचे ठरविले. भुकेल्याला अन्न दिल्यावर मनाला जे आत्मिक सुख मिळते ते सुख पैशांनीसुद्धा घेता येत नाही. एकमेकांवर प्रेम करणे, मदत करणे, सहानुभूती, आदर मनात बाळगणे, समोरच्याला कधीही तुच्छ न लेखणे. तो गरीब असो की श्रीमंत असो, जाती-धर्माचा भेदभाव न करता मनुष्यावर किंवा कुठल्यातरी प्राणिमात्रावर असो, आपल्या मनात त्याविषयी प्रेमभावना ठेवणे हाच खरा मानवता धर्म. आपण कितीही धन कमवले असले तरी आयुष्यात जिंकलेली मने, मिळवलेलं प्रेम, केलेली मदत मरणानंतरसुद्धा जिवंतच राहते आणि यालाच आपण माणुसकीचा धर्म म्हणतो. आपल्याला माणसाचे जीवन मिळाले आहे. तेव्हा या छोटय़ाशा जीवनात सगळ्याबरोबर मिळून राहायला पाहिजे. आपणही आपल्या आयुष्यात दुसऱयांच्या जीवनासाठी, सुखासाठी, अधिकारासाठी मदत करू शकत असू तर आपण ते नक्कीच करायला हवे आणि हीच माणूस म्हणून आपली खरी माणुसकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या