मुद्रा – दुर्दम्य आशावादी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सागर देशपांडे


ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी नुकतीच वयाची 80 वर्षे पूर्ण केली. लवकरच त्यांच्या चरित्र ग्रंथांचेही प्रकाशन होणार आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथाचे लेखक आणि त्यांचे निकटचे स्नेही डॉ.सागर देशपांडे यांचा हा विशेष लेख.

काही वर्षांपूर्वी गोव्यात डॉ. माशेलकरांच्या जन्मगावी माशेलला जाण्याचा योग आला. पुन्हा एकदा त्यांच्या जन्मघरी जाऊन त्या पुण्यभूमीचं दर्शन घेतलं. अनेक अडथळ्यांशी सामना करीत-करीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्त्व करणाऱया एका ख्यातनाम शास्त्र्ाज्ञाचा, एका आधुनिक ऋषीचा जीवनपट डोळ्यासमोर सरकू लागला. फोंडा-गोवा येथील शासकीय वाचनालयाच्या वाचक सल्लागार समितीच्या पुढाकारानं माशेल आणि बोरी इथं माझी व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. त्यातील माशेलचं व्याख्यान हे डॉ. माशेलकरांवरच होतं आणि त्याचं शीर्षक होतं – ‘सत्यात उगवलेलं स्वप्न!’

माशेल हे दक्षिण गोव्यातील एक प्रमुख गाव. देवस्थानांचं गाव. माशेल आणि परिसरात लहान-मोठी सुमारे 21 देवळं आहेत. अर्थातच स्वच्छता आणि टापटीप बघण्याजोगीच. कोकण आणि गोव्यातील मंदिरांची बांधणी, भव्यता, उत्सव आणि स्वच्छता हे इतर प्रांतातील मंडळींनी अनुकरण करावं अशीच असते. माझ्या दृष्टीनं या दोन्ही व्याख्यानांच्या ठिकाणांचं मोल अधिक होतं. माशेल इथं त्यांचं बालपण सरलं. वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत ते इथंच खेळले-बागडले. माशेलमध्ये देवकी-कृष्णाचं एक फार छान मंदिर आहे. बहुतांशी ठिकाणी राधा-कृष्णाचं मंदिर असतं. या मंदिरासमोर रस्ता आणि विस्तीर्ण मैदान आहे. आजूबाजूलाही वेगवेगळी मंदिरं आहेत. या मैदानासमोरूनच एक छोटी गल्ली आहे. या छोटय़ाशा गल्लीतच डॉ. माशेलकरांचं मूळ घर आहे. कौलारु 4/5 खोल्यांचं घर. समोर तुळशीवृंदावन. इथल्या देवकी-कृष्णाच्या मंदिराच्या परिसरात त्यांचं बालपण सरलं. तिथल्या जुन्या वृक्षांना बांधलेल्या विस्तीर्ण पारावरही बसून ते मित्रांशी खेळायचे. वडिलांचं निधन झाल्यावर आईबरोबर वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी माशेल सोडलं. मुंबईला गेले. बऱ्याच वर्षानंतर ते आईला, कुटुंबियांना घेऊन माशेलला जाऊन आले, आपल्या जन्मभूमीच्या दर्शनासाठी.

काही वर्षांपूर्वी माशेलच्या ग्रामस्थांनी एकसष्टीनिमित्त डॉ. माशेलकरांचा सत्कार केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची त्यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सगळ्या ग्रामस्थांच्या कायमचा लक्षात राहील असा तो सोहळा होता. व्याख्यानाच्या निमित्तानं भेटलेल्या ग्रामस्थांनी या साऱया आठवणी जाग्या केल्या. तिथल्या रामानंद तारी या पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार सद्गुरू वामनराव पै यांचंही मूळ गाव माशेलच. गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचं सासरही याच परिसरातलं अन् मामा वरेरकरांच्या नाटकांत स्त्री भूमिका करणारे गोविंदराव माशेलकरही याच गावचे. मा. दीनानाथ मंगेशकरांना संगीत शिकवणारे बाबा माशेलकर तर डॉ. माशेलकरांचेच पूर्वज. एवढय़ा छोटय़ाशा गावाशी इतके जण संबंधित असावेत हा किती सुखद योगायोग होता. या सगळ्या आठवणी पाठीशी घेऊनच मी डॉ. माशेलकरांविषयी बोललो. ‘सत्यात उगवलेलं स्वप्न’ या शीर्षकाचा डॉ. माशेलकरांवरील चरित्रात्मक लेख ‘जडण-घडण’ मासिकाच्या एका दिवाळी अंकात लिहिला होता. त्याच विषयावर बोलावं असा संयोजकांचा आग्रह होता. डॉ. माशेलकरांच्या जन्मगावी त्यांच्या कर्तृत्वाविषयी बोलण्यातला अभिमान आणि आनंद मी पुरेपूर अनुभवला. तिथल्या ग्रामस्थांची आणि उपस्थित श्रोत्यांचीही हीच भावना होती असं जाणवलं.

काही माणसं आपल्या गावामुळं ओळखली जातात. काही गावं तिथल्या कर्तृत्ववान माणसांमुळं ओळखली जातात. आपला सारा देशच अशा कर्तृत्ववान माणसांनी आणि गावांनी सुद्धा समृद्ध असलेला देश आहे. या देशात आपला जन्म झाला हे आपलं फार मोठं भाग्य आहे.

सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांची पहिल्यांदा भेट झाली आणि साधेपणातच किती असामान्यत्व लपलेलं असतं याचा पुन्हा एकदा सुखद साक्षात्कार झाला. इ. स. 2000 साली पुण्यात झालेल्या सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. नोबेल पुरस्कारप्राप्त दिग्गज शास्त्र्ाज्ञांसह जगभरातील सुमारे पाच हजार शास्त्र्ाज्ञ या सायन्स काँग्रेससाठी आले होते. या अभूतपूर्व वातावरणातील सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून डॉ. माशेलकर सरांनी मांडलेले मूलभूत चिंतन देश-विदेशात फार गाजलं. ‘नव्या युगाचे पंचशील’ मांडताना त्यांनी विकासाच्या मूलभूत मुद्यांचा उल्लेख करुन एक सार्वत्रिक प्रगतीचं चित्र लोकांसमोर ठेवलं. 1. बालपेंद्रित शिक्षण 2. महिलापेंद्रित कुटुंब 3. मानवपेंद्रित विकास 4. ज्ञानपेंद्रित समाज 5. नवनिर्मितीपेंद्रित भारत या मुद्यांच्या आधारे त्यांनी या अध्यक्षीय भाषणाची मांडणी केली होती.

त्या नंतरच्या काळातही देश-विदेशात या ग्रंथातील विचार मांडण्यासाठी माशेलकर सरांना अनेक नामवंत संस्थांनी पाचारण केले. लोकमान्य सोसायटीने एकदा बेळगावमध्ये डॉ. माशेलकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. हजारो बेळगावकरांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. हुबळी इथं देशपांडे फाऊंडेशनमार्फत झालेल्या विशेष कार्यक्रमात टाटा उद्योगसमूहाचे निवृत्त प्रमुख रतन टाटा, माशेलकर सर, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती असे मान्यवर युवक-युवतींसमोर मार्गदर्शनासाठी एकत्र आले होते. सरांमुळे या कार्यक्रमातही मला सहभागी होता आले आणि या दिग्गजांच्या चर्चा ऐकता आल्या. ज्येष्ठ नेते ना. शरद पवार आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे यांनी ‘रयत सायन्स काँग्रेस’करिता साताऱयात डॉ. माशेलकरांना निमंत्रित केलं. तिथल्या शिक्षक-विद्यार्थ्यांसमोर त्यांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणांसह आपल्या स्वावलंबी जीवनाचा आणि देश विकासाचा मंत्र दिला.

डॉ. माशेलकरांसारख्या ऋषितुल्य शास्त्र्ाज्ञाच्या सहवासात वावरताना अनेक नव्या नव्या गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या मातोश्रींपासून साऱया कुटुंबियांच्या प्रेमाचा मला आणि माझ्या कुटुंबियांना स्नेह मिळाला. गणेशोत्सवात सरांच्या पुण्यातील निवासस्थानी पूजेसाठी पुण्यातील मोजक्या दिग्गजांना आमंत्रण असते. मातोश्री अंजनी माशेलकर यांच्याप्रमाणेच स्वतः डॉ. माशेलकर हे गणेशभक्त आहेत. या पूजेलाही दरवर्षी आवर्जून आम्हाला ते निमंत्रित करतात. या सर्व वाटचालीत त्यांचं प्रेम, सहवास, त्यांचं मार्गदर्शन, आपुलकीची अन् कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडत गेली.

माशेलकर सरांना अनेकजण आत्मचरित्र लिहा अशी नेहमीच विनंती करायचे. पण वेळेअभावी सध्या आपल्याला ते शक्य नसल्याचं ते सांगत. त्यांचं चरित्र लिहिण्यासंबंधीही अनेकांनी विचारणा केली. याच दरम्यान सुमारे 11 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मी लिहिलेलं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं ‘बेलभंडारा’ हे चरित्र सरांनी वाचलं. त्याच्या प्रकाशनालाही ते आवर्जून आले. विशेष आनंदाची बाब म्हणजे त्यांनी त्यांचं चरित्र लिहिण्यासाठी मला परवानगी दिली. गेल्या 11 वर्षांपासून त्याचे काम सुरू होते. शक्य त्या त्या वेळी, प्रवासात, अन्य एखाद्या कार्यक्रमाला जाता-येताना त्यांच्याशी चर्चा झाल्या. अनेक दुर्मिळ संदर्भसाधनं, छायाचित्रं मिळाली. लवकरच मी मराठीतून लिहिलेल्या ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ या त्यांच्यावरील अधिकृत चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. अमेरिकेतून या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाचे काम सुरू आहे.

भारत सरकारचे सर्वोच्च नागरी पुरस्कार, पुण्यभूषण, महाराष्ट्रभूषण, गोमंतविभूषण यासह देश-विदेशातील नामवंत 60 पेक्षा अधिक पुरस्कार, जगभरातील 45 पेक्षा अधिक विद्यापीठांची सन्माननीय डी.लिट्. देऊन केलेला त्यांचा सत्कार, 16 माशेलकर समित्या, पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य, हळद आणि बासमतीच्या पेटंट लढाईतील विजय हे सारं या चरित्रग्रंथात तपशीलवार वाचता येईल.

डॉ. माशेलकर सरांसारख्या व्यक्ती शतकातून अपवादानंच या पृथ्वीवर येत असतात. आपण त्यांच्या सहवासात आहोत, यापेक्षा आयुष्याच्या सार्थकतेसाठी आणखी काय हवे? त्यांना अनेकानेक शुभेच्छा.

 [email protected]
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि डॉ. माशेलकरांवरील चरित्रग्रंथाचे लेखक आहेत.)