अनवट वाटा – उपेक्षित सौंदर्य गोंदेश्वर मंदिर

छायाचित्र सौजन्य- संजीव दहिवदकर

>> डॉ. सरिता विनय भावे

नाशिक जिल्ह्यातील ‘सिन्नर गावाजवळ ‘गोंदेश्वर’ नावाचे नितांत सुंदर अनमोल रत्न लपलेले आहे. जगभरातील निरनिराळय़ा प्रेक्षणीय वास्तूंना भेट देताना आपल्याजवळच असणारा ठेवा मात्र आपण दुर्लक्षित करतो. गोंदेश्वर मंदिराचं देखणेपण सूर्यकिरणांच्या लपंडावात अधिकच उजळून निघते. समरूपता, भव्यता आणि जटिल नक्षीकाम यातच या ‘यादव’ मंदिराचे ‘उपेक्षित’ सौंदर्य सामावले आहे.

स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव नसलेला, मात्र तिच्या मोहक गंधाने उद्दिपित होऊन तिच्या शोधार्थ रानोमाळ भटकणारा कस्तुरीमृग आपल्या सर्वांनाच ठाऊक असतो, परंतु असाच एक ‘विचित्र’ कस्तुरीमृग आपल्या सगळ्यांतही दडलेला असतो असे म्हटले तर! आता हेच पहा ना, काही पर्यटनस्थळे/प्रेक्षणीय जागा आपल्या आजूबाजूलाच असतात, पण त्या आपल्या जवळच आहेत किंवा त्यांचे माहात्म्य काय आहे याची आपल्याला त्या कस्तुरीमृगासारखीच अजिबात कल्पना नसते. आपण ‘वर्ल्ड टूर’ करण्याची स्वप्ने पाहतो, परंतु आपल्याच परसदारात काही विशेष, देदीप्यमान आहे याचा आपल्याला पत्ताही नसतो. अशाच फारशा परिचित नसलेल्या एका प्राचीन मंदिराची ओळख करून घेऊ या.

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या नाशिक जिह्यातील ‘सिन्नर’ गावाजवळ ‘गोंदेश्वर’ नावाचे नितांतसुंदर अनमोल रत्न लपलेले आहे. खरे तर ‘लपलेले’ म्हणण्याइतका काही या मंदिराचा परिसर लहानसहान नाही. महाराष्ट्र राज्य गॅझेटीअर्स (ब्रिटिश कालखंड) नुसार नाशिक जिल्हय़ांतर्गत (1883) सिन्नर विभागासाठी असलेल्या माहितीत इ. स. 1069 साली मिळालेल्या ताम्रपटात ‘सिन्दिनर’ असा सिन्नरचा प्रथमोल्लेख आढळतो. गवळी (यादव) राजवंशाचा प्रमुख ‘राव शिंगुनी’ याने सिन्नरची स्थापना केली होती. त्याचा पुत्र ‘राव गोविंद’ याने 12 व्या शतकात दोन लाख रुपये खर्च करून या अत्याकर्षक मंदिराची निर्मिती केली होती. त्यालाच ‘गोविंदेश्वर’ किंवा ‘गोंदेश्वर’ हे नाव पडले. यादवकालीन माणकेश्वर (झोडगे), भुलेश्वर (यवत), दैत्यसुदन (लोणार) इ. मंदिरांत गोंदेश्वरचे मंदिर सर्वात विशाल आहे. चांगले ऐसपैस आवार, चोहोबाजूंनी तटबंदी आणि पूर्व व दक्षिण दिशेला प्रवेशद्वार या मंदिराला लाभलेले आहे. पूर्व दिशेच्या रेखीव प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मंदिराची भव्यता, त्याचे निराळे देखणेपण आणि भोवतालची नीरव शांतता आपल्यालाही आपसूकच धीरगंभीर करते. ‘महाराष्ट्रातील महत्त्वाचे राष्ट्रीय स्मारक’ असा दर्जा प्राप्त झालेला असूनही इतक्या वैभवशाली मंदिराचे वास्तुसौंदर्य रसिक भाविकांच्या अनुपस्थितीने ‘उपेक्षित’ राहिले आहे ही खंत मात्र जाणवत राहते.

मराठी विश्वकोश (खंड 14, यादव घराणे) नुसार वास्तुरचनेच्या दृष्टीने हे मंदिर नागर शैलीतील ‘भूमिज’ या उपशैलीत बांधले आहे. हिंदुस्थानात अशा प्रकारची मोजकीच मंदिरे असणाऱया ‘पंचायतन’ प्रकारातील हे मंदिर आहे. पंचायतन प्रकारात एका प्रशस्त आयताकृती जोत्यावर चार कोपऱ्यांवर चार लहान मंदिरे आणि केंद्रस्थानी मोठे मुख्य मंदिर अशी पाच मंदिरे स्थापित असतात. ‘गोंदेश्वर’चे मंदिर ‘शिवपंचायतन’ प्रकारचे आहे. मध्यवर्ती मंदिराच्या उत्तरेला असलेली दोन उपमंदिरे श्रीविष्णू व गणपती यांना आणि दक्षिणेला असलेली दोन उपमंदिरे सूर्य व पार्वती या देवतांना समर्पित आहेत. उपमंदिरे आयताकृती असून मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी विभागलेली आहेत. मुख्य मंदिर हे गर्भगृह, अंतराळ, महामंडप आणि उत्तर, दक्षिण व पूर्व दिशांना असलेले अर्धमंडप असे विभागलेले आहे. मंदिराच्या बाह्यभागावर पाने, फुले, प्राणी, पक्षी, वेलबुट्टी, कीर्तिमुख, योद्धे, रामायणातील दृश्ये, पौराणिक प्रतिमा, काममग्न जोडपी, नृत्यमग्न अप्सरा यांच्या शिल्पांची रेलचेल आहे.

मध्यवर्ती मंदिराची रचना या भागातील मंदिरांत विशेष उल्लेखनीय मानली जाते. बांधणीत सांधण्यासाठी माती किंवा चुना न वापरता दगडांना खाचा पाडून एकावर एक दगड रचून कोनाकृती भक्कम भिंती रचल्या आहेत. मंदिराच्या भिंतींवर ब्राह्मी, पार्वती, शिव, भैरव या प्रतिमा प्रामुख्याने दिसतात. गर्भगृहातील रेखीव शिवलिंग मनाला प्रसन्न करणारे असून आतील भव्य खांब दर्जेदार कलाकुसरीने सुशोभित आहेत. मुख्य मंदिराचे शिखर (आता) कळसविरहित आहे. नेहमीपेक्षा वेगळे, लक्षणीय असे वक्ररेखीय शिखर शंक्वाकृती असून अनेक छोटय़ा होत जाणाऱया शिखरांनी (ऊरुशृंगे) बनलेले असून अतिशय देखणे आहे. महादेवाचे वाहन असलेला नंदी मंदिरासमोर बहुतांश वेळा उघडय़ावरच स्थापलेला असतो. इथे मात्र मुख्य मंदिरासमोर निराळ्या, सुरेख कोरीवकाम केलेल्या मंडपात नंदीला स्थान दिले आहे. साधारणतः मंदिरांच्या गर्भगृहातून निघणारे पाणी ‘गोमुखा’द्वारे बाहेर सोडतात. या मंदिराच्या गर्भगृहातून निघणारे पाणी मात्र गंगानदीचे वाहन असणाऱया मगरीच्या तोंडातून सोडले जाते. ते पाणी गंगाजलाच्या दर्जाचे आहे हे सूचित करण्यासाठी केलेली अलंकृत अशी ही ‘मकर’ मुखाची बांधणी हेसुद्धा या मंदिराचे आगळेवेगळे वैशिष्टय़ आहे.

नैसर्गिक आणि स्थानिकरीत्या उपलब्ध असलेला काळा बेसाल्ट पाषाण आणि पिवळट-गुलाबीसर सच्छिद्र पाषाण (ज्वालामुखीच्या रसापासून खडक तयार होताना वायूच्या बुडबुडय़ांमुळे पोकळी निर्माण होऊन झालेली भोकाभोकांची रचना) वापरून या मंदिराची बांधणी केलेली आहे. सच्छिद्र दगडात शिल्पकाम करणे कठीण असल्याने येथील शिल्पांतील मूर्तींचे सौष्ठव, अलंकारांचे वैविध्य आणि कोरीवकाम अंबरनाथ, भुलेश्वर, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पांच्या मानाने थोडे ओबडधोबड असले (शिवाय कालानुरूप झिजून त्यांची पडझडही लवकर होते) तरी सूर्यकिरणांच्या लपंडावात त्यांचे देखणेपण जसे उजळून निघते, त्याला तोड नाही. खरे तर समरूपता, भव्यता आणि जटिल नक्षीकाम यातच या ‘यादव’ मंदिराचे ‘उपेक्षित’ सौंदर्य सामावले आहे.

 [email protected]