‘तरु’णाई – घरट्यांचे काव्य

>> डॉ. सरिता विनय भावे

जून महिना म्हणजे ऋतूंच्या संक्रमणाचा काळ… ग्रीष्माच्या तलखीने त्रस्त झालेली धरा पावसाळ्यातील शीतल सरींच्या सुखद विचारांमुळे रसरसलेली वाटते… त्याचा दृश्य परिणाम वृक्षांवर झालेला दिसतो… वसंत ऋतूतील लालसर, कोवळी पालवी आता फांद्याफांद्यांवर गर्द हिरवाईचे प्रौढत्व मिरवत असते… वृक्ष त्यांच्या आधार, पोषण, संगोपन या कार्यासाठी सुसज्ज झालेले असतात. त्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठीच जणू पक्ष्यांचा विणीचा हंगाम याच वेळी जुळून येत असावा! पक्षी मिलनोत्सुक असले तरी भविष्य काळात येणाऱया पालकत्वाच्या जबाबदारीची जाणीव त्यांच्यात ओतप्रोत भरलेली असते. म्हणूनच आपल्या चिमुकल्या पिल्लांसाठी आधीच भक्कम आधाराच्या घरटय़ाची सोय करण्याचे व्यवहारचातुर्य ते दाखवतात.

खानदेशच्या बहिणाबाई म्हणतात, ‘‘अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला!’’ आता तुम्ही सांगा… मुंबईच्या गगनचुंबी इमारतींच्या जंगलात (तेही लॉक डाऊनच्या काळात) असा लडिवाळ खोपा, शिंपी पक्ष्याचा अक्षरशः कापसाच्या तंतूंनी दोन पानांना बांधून केलेला सुबक खोपा किंवा काही पक्ष्यांचे मातीने लिंपून केलेले टुमदार अनवट घरटे कुठून बघायला मिळणार? अर्थात कुठलीही रिकामी, सुनीसुनी घरटी बघण्यापेक्षा वावर असणारी घरटी बघण्याची मजा काही औरच! असाच काहीसा सुरेख अनुभव नुकताच माझ्या वाटय़ाला आला.

आमच्या सोसायटीची बाग सोसायटीच्या आवारातच असल्याने लॉक डाऊनच्या काळातही मास्क लावून रहिवासी ‘मार्ंनग वॉक’चा आनंद घेत असतात. तेव्हा लक्षात आले की, बऱयाच झाडांवर घरटी तर दिसताहेत पण भल्या सकाळी फोटो तेवढे चांगले आले नसते. म्हणून मी कॅमेरा घेऊन 11 वाजता पुन्हा बागेत गेले. बघते तर काय… माणसाचे ‘चिटपाखरू’ही तिथे नव्हते! या शांततेचा फायदा घेऊन कावळ्यांची अधीर लगबग चालू होती. काही ‘लेटलतीफ’ अजूनही चोचीत काडी घेऊन भरभर जाताना दिसत होते. पिंपळ, सप्तपर्णी, जांभूळ, सुरू, बिट्टीच्या झाडांवर घरटी होती; पण चाफ्याच्या झाडांवर घरटी बांधणाऱया दोन कावळा जोडप्यांना मी ‘रसिकते’चे 100पैकी 100 गुण दिले! सगळी घरटी तपकिरी, जाडसर काडय़ांनी बांधलेली वाटत होती. पण एका जोडप्याने मात्र एकसारख्या दिसणाऱया मऊ, पिवळसर तुसांनी पिल्लांसाठी शय्या तयार केली होती. विणीच्या हंगामात पालक कावळे खूप आक्रमक होतात. आक्रोश करून, पंखांचा फडफडाट करून, प्रसंगी चोचीने वार करून ते ‘दुश्मना’ला पळवून लावतात. त्यांना अडथळा न करता, बेताबेतानेच मी फोटो काढत होते. तरी एका अस्वस्थ ‘आई’ला माझा भरवसा वाटत नव्हता. मी तिला मनात म्हटले, ‘‘बाई गं, तुझ्या गोड संसारात डोकावून बघण्याचा मोह मला आवरत नाहीये, म्हणून एवढा अट्टाहास, बाकी काही नाही.’’ ते बहुदा अंतःप्रेरणेने तिला कळले आणि पटले असावे. कारण नंतर ती घरटय़ात शांत बसून राहिली व मला फोटोही काढू दिले!

दुसऱया दिवशी मी पुन्हा त्याच वेळी बागेत गेले. सर्व ‘मायाळू’ आया घरटय़ात तशाच विराजमान होत्या. बाबा कावळे जवळपास राहून काय हवं-नको ते बघत होते. ते बघून मला हसूही आले आणि भरूनही आले. खरंच रोमान्सची इतकी उघड रेशमी किनार असलेला गृहस्थाश्रम माझ्या पाहण्यात तरी दुसरा नाही!

शेवटी काय तर निसर्गातील प्रत्येक जीव त्याला नेमून दिलेले काम निष्ठेने करून ऋतूंच्या चक्राबरोबरीने सृजनाचे चक्रही अव्याहत चालू ठेवत असतो… ते तसेच चालू राहो!
z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या