नव्या दृष्टीचे आशय चित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. शशिकांत लोखंडे

भालचंद्र नेमाडे यांनी प्रत्यक्षात कादंबरी आणि तत्सबंधित विचार याद्वारे अभिनव क्रांती घडवली आणि कादंबरी विश्व व कादंबरी संबंधीचे विचार-समीक्षा पूर्णपणे बदलले. कादंबरीसंबंधीची जुनाट परिमाणे त्यामुळे मागे पडली. नेमाडे यांच्या ‘कोसला’ने हे प्रत्यक्षात घडवून आणले आणि मग खांडेकर-फडके-माडखोलकरांचा कादंबरी मार्ग मागे पडला. नवकथेचा परिणाम नव्या कादंबरी-लेखनावर पडला. कादंबरी म्हणजे ‘महादीर्घकथा’ ही समजूत मागे पडली. तरीही घटना-प्रसंगांची बहुलता काही नव्या कादंबरीकारांनी अंगीकृत केलीच. त्यापैकी प्रामुख्याने मनोहर शहाणे आणि श्याम मनोहर यांचा उल्लेख करता येईल.

प्रत्यक्ष जगण्याच्या प्रक्रियेतून निवडलेल्या प्रसंगांद्वारे आपल्या कादंबरी लेखनातून जैविक विचार देण्याचा प्रयत्न श्याम मनोहर यांचा राहिला आहे. सामान्यपणे आजच्या मध्यमवर्गाची विस्कळीत मनोप्रवृत्ती, स्थितीप्रियता व विज्ञानदृष्टीची उपेक्षा किंवा विचारानुकरण हे सगळे श्याम मनोहर कादंबऱयातून दाखवून देतात. त्यामुळे त्यांच्या कादंबऱयांमधील पात्रे अंतर्मनात-जाणिवेत कशी आहेत याचेच दर्शन विचारप्रवृत्त करते. जाणिवेतील क्रियापेक्षा नेणिवेतील काळोखाची प्रतिक्रिया आधिक्याने श्याम मनोहर टिपतात. म्हणून त्यांच्या कादंबऱयांतील संवाद संज्ञा प्रवाह प्रवृत्तीशी नाते सांगतात. ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’ या नव्या कादंबरीतही त्याचे प्रत्यंतर येते. अरूढ शोषके घेतलेली त्यांची कादंबरी अंतरमनाचे भांडारच उघडे करते. प्रेम करणारे जीव हत्येकडे कसे वळले, ही अनवट वाट श्याम मनोहर शोधताना दिसतात. मानवी मनाच्या, जीवनाच्या अज्ञातातले काही हरवलेपण शोधणे त्यांना महत्त्वाचे वाटते. यातील असेच एक पात्र म्हणजे दीपिका. तरुणपणापासून दीपिकाजी या हरवलेपणाचा शोध घेत राहतात. बाह्यरूप ज्ञाताने भरले आहे आणि अंतरमन अज्ञात आहे हे दीपिकाजीला जाणवतं.

भाषा ही अडथळा आहे तसे उच्च बुद्धीचा अयोग्य वापर हेही माणूस समजून घेण्यामधला अडथळा आहे. ‘‘कॅन्सर होऊन पप्पा यातनात वारला ही पप्पाची ट्रेजेडी नाही. पप्पा उच्च बुद्धीचा असूनही भलतीकडे बुद्धी वापरत राहय़ला ही पप्पाची ट्रजेडी. नरेंद्रचे वडील स्मृतिभंश होऊन वारले, ही टॅजेडी नाही’’, ‘‘…नरेंद्रने प्रतिभावंत म्हणवून घ्यायचा माज दाखवलाः ही ट्रजेडी.’’ या सूचक वक्तव्यातून, संवादातून माणसांची अकृत्रिमता, नैसर्गिकता महत्त्वाची असे श्याम मनोहर या कादंबरीतून सुचवत असावेत. आजचा समाज बुद्धीचा विपरीत वापर करून अश्रद्धेयाकडे तसाच अंधश्रद्धेकडे वळला आहे हीच समाजाची ट्रजेडी आहे. जीवनाचा अर्थशोध व्यर्थ आहे. जीवनाचा अर्थ अटळ मृत्यू आहे. माणसाची नियती आणि त्याचे स्वातंत्र्य यांचे द्वंद्व निष्फळ आहे. अन्य विचारसरणी आणि वास्तव यातील अंतर श्याम मनोहर या कादंबरीत दाखवून देतात. असामान्य लोक हा अशुद्ध प्रकार आहे हे भान ही कादंबरी जागृत करून समाज, संस्कृती, सभ्यता यांचे गतिशास्त्र्ा समजून घेण्यास प्रवृत्त करते. समाजाला मानवी समस्यांची ‘रेडिमेड’ उत्तरे हवी असतात म्हणून समाज शोधवृत्तीपासून ऱहास पावला आहे हेही या कादंबरीतून सूचित होते.

श्याम मनोहर यांच्या कादंबरीत व्यक्ती आणि समाज यांच्या द्वंद्वांची चित्रे येतात तेव्हा महाराष्ट्रीय ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांची कादंबरी आठवते. त्यातील समाजशास्त्र्ााrय चर्चाही श्याम मनोहरांच्या कादंबरीतील तत्त्वचर्चेशी समन्वय साधक दिसतात आणि थॉमस हार्डी यांच्या ‘फार फ्रॉम दी मॅडिग क्राऊण्ड’मधील जीवनशैलीची आठवण श्याम मनोहरांमुळे होते असे माझे निरीक्षण आहे. पुष्कळदा विश्लेषणाने पसरटपणा येऊनही ‘प्रेम आणि खूप खूप अंतर’मधील दोन भागांतील घटक जाणिवेची नवी दृष्टी देणारे आशय चित्र आहे. हे स्वागतार्ह आहे. जे वाया जाणे नाहीच.

श्याम मनोहर : प्रेम आणि खूप खूप नंतर
प्रकाशक – पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठ – 281 मूल्य – 450 रुपये