
>> डॉ. श्रीरंग देशपांडे
माझ्या मनाला भावलेलं, उमगलेलं हे आत्मचरित्र. जीवनाच्या रंगमंचावरची अभ्यंकरांनी शब्दचित्रांनी साकारलेली ही स्वतःची भरारी. या आत्मचरित्रातील ज्या पात्रांनी त्यांचं दारिद्र्य, विवंचनेनं भरलेलं जीवन अर्थपूर्ण केलं. त्यांच्या भोवती गुंफलेलं हे कथानक. या पात्रात जन्म देणारे मायबाप, भाऊबहीण या रक्ताच्या नात्याबरोबरच वर्गमित्र, स्नेही, कार्यालयातील सहकारी कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाची त्यांची अर्धांगिनी. वाळलेल्या, सुकलेल्या बागेला पाणी द्यावं आणि ती फुलावी अशी ही कहाणी. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. अभ्यंकर यांचाही हा संघर्ष येथे आला, परंतु हा संघर्ष मांडण्याची, शब्दांनी कुटुंबाचं, समाजाचं चित्र उभं करण्याची पद्धत अत्यंत प्रांजळ असल्याचे दिसून येते. वेगवेगळ्या जुन्या प्रचलित म्हणींचा वापर अगदी चपखल पद्धतीने केला आहे. बालवयातील आठवणी वाचताना त्यांनी पचवलेला त्रास आपल्याला जगण्याचं बळ देतो. त्यांचे वर्गमित्र, त्यांचं वागणं बोलणं, मदतीचा हात, त्याचप्रमाणे पन्नास वर्षांपूर्वीचा काळ स्पृश्य-अस्पृश्यता पाळणारा, परंतु त्या काळातही हे सिद्ध होतं की, मैत्रीला जात नसते, धर्म नसतो आणि असते फक्त मैत्री. मैत्री हीच जात, मैत्री हाच धर्म. लेखकाचे एक विशेष म्हणजे बालवयातच कष्ट करण्याची सवय दुकानामध्ये काम करून दीड पैशाचा हातभार लावणे हे खूप शिकवून जातं. लहानपणापासूनच शिक्षणाची आणि अभ्यासाची आवड त्यांना होती. ग्रामीण भागातील जीवन, रीतिरिवाज, प्रथा-परंपरा या सर्व बाबींचा उल्लेख ओघाने येतोच. कुटुंबासाठी उपसलेले कष्ट आणि कुटुंबांनी अभ्यंकरांच्या शिक्षणासाठी केलेले कष्ट यामधून हे कुटुंब आपल्याला खूप काही शिकवून जातं. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करावी लागली, तीही आनंदाने स्वीकारली आणि नोकरीतसुद्धा त्यांना खूप काही शिकायला मिळालं आणि पुढचे ध्येय, स्वप्न ते पाहू शकले. त्यांचं स्वप्न वास्तवाला धरूनच होतं, त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि उंच भरारी घेतली.
या आत्मचरित्रातून एक गोष्ट मात्र नक्की सिद्ध होते, गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही. इच्छा तिथे मार्ग हे अभ्यंकरांनी एक उंच भरारी घेऊन दाखवूनच दिले. नोकरीच्या निमित्ताने, प्रमोशनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले, खडतर प्रवास, कधी बैलगाडी, कधी मोटरसायकल, तर कधी एसटी, परंतु कधी कुरकुर नाही, किरकिर नाही असे अभ्यंकरांनी आपल्या आत्मचरित्रात आपले अनुभव मांडले. प्रामाणिकपणाने लिहिल्यामुळेच ‘भरारी’ला जिवंतपणा आला आणि साहित्यिक कलाकृती सुंदर तयार झाली. स्वकर्तृत्वाची ही ‘भरारी’ खरोखरच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
भरारी
लेखक : ज. मो. अभ्यंकर
प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
मूल्य: रुपये 350/-




























































