कुंपणच शेत खाते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजय ढवळे

अमली पदार्थ म्हणजे अफू, गांजा, चरस, मॅरिओना. ज्या पेशंटस्ना अतितीक्र, अगदी सहन न करता येण्याजोग्या वेदना असतात त्यांना डॉक्टर्स ‘ओपॉईडस्’चे प्रिस्क्रिप्शन देतात. मग तो पेशंट औषधांच्या दुकानात जाऊन ती औषधे विकत घेऊ शकतो. फार्मसीमध्ये अशा औषधांचा साठा नसतो. त्यांना ती सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांकडून मागवावी लागतात.त्याचे मुख्य कारण अशा औषधांचा दुरुपयोग होऊ नये हाच असतो. ही औषधे बाहेरही काळय़ा बाजारात अवाच्या सवा किमतीला मिळू शकतात, पण त्यामध्ये भेसळसुद्धा असू शकते, परंतु अमली पदार्थांची चटक लागलेले, त्यांच्या आहारी गेलेले ना चढय़ा किमतीची पर्वा करतात, ना ती मिळवण्याकरिता भल्याबुऱया मार्गाचा अवलंब करण्याचा सोवळेपणा बाळगतात! ज्या फार्मसीत थोडीबहुत औषधे साठा म्हणून ठेवली असतात, त्यावर मालकाचे घारीप्रमाणे लक्ष असते. पण त्यांचा डोळा चुकवून किंवा त्यांच्या डोळय़ांत धूळफेक करून किंवा खोटय़ानाटय़ा मार्गांचा अवलंब करून व्यसनी लोक आपला कार्यभाग साधतातच. केव्हातरी त्यांची चोरी उघडकीला येतेच.

जॉशवा रामसामी हा पेशाने फार्मासिस्ट. म्हणजे सुशिक्षित, बुद्धिमत्तेचे वरदान मिळालेला. एका बेसावध, मोहाच्या क्षणी त्याने अमली पदार्थाचे, ओपॉईडचे सेवन केले. ती चव, ती नशा, ती धुंदी त्याला इतकी चढली की, त्यांचे व्यसनामध्ये रूपांतर झाले, ही गोष्ट 2010 मधली. पुढली 8 वर्षे त्याने ही बाब त्याच्या दुकानाच्या मालकापासून लपवून ठेवण्यात यश मिळवले, परंतु शेवटी खुनालाही वाचा फुटतेच. ते सत्य उघडकीला आले व त्याच्या आयुष्याचा सत्यानाश झाला. ताबडतोब त्याची नोकरीवरून गच्छंती झाली. बायको सोडून गेली. त्याला त्याच्या मुलांच्या संगोपनासाठी तिला पोटगीदाखल एक डॉलरही देण्याची आर्थिक कुवत उरली नाही. पर्कोसेट्स (Percocets) या अमली पदार्थांच्या गोळय़ा दररोज तो 20 गोळय़ा रिचवायचा. पेशंट्सची प्रिस्क्रिप्शन्स आली की त्यांना काऊंटरवरून गोळय़ा देताना तो सफाईने हात मारायचा. थोडक्यात, चोरी करायचा, मग इन्व्हेंटरीत सोयीस्कर अदलाबदल करायचा. जेव्हा त्याला त्या गोळय़ा उपलब्ध होत नसत तेव्हा तो रस्त्यावर चोरटेपणे विकणाऱयांकडे जायचा व प्रत्येक गोळीला 5 डॉलर्स मोजायचा. एकदा त्याला नशेची तलफ आली की बस्स! त्यामुळे इतर सर्व जग तोकडे पडायचे. हे सर्व उघडकीस आले ते ऑगस्ट 2016 मध्ये. ताबडतोब त्याला फार्मसी मालकाने डच्चू दिला. फार्मसिस्टचा त्याचा परवाना रद्द झाला. ऑन्टेरिओ राज्यांत फार्मसिस्ट असोसिएशन आहे. तिने रामसामीचा तीक्र शब्दांत निषेध केला व त्याची वागणूकही त्यांच्या पेशाला काळिमा फासणारी आहे असे वृत्तपत्रांत जाहीर निवेदन दिले.

रामसामी हा मूळजा जमैका देशातला. कॅनडात दोन दशकांपूर्वी आला तो उज्ज्वल भविष्याची स्वप्ने डोळय़ांत बाळगून. हुषार होता. फार्मसी कॉलेजात प्रवेश मिळवला. पदवी घेतली. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली, परंतु व्यसनाने त्याचा ताबा घेतला व त्याच्या आयुष्याचे होत्याचे नव्हते झाले. या ओपॉईडच्या व्यसनामुळे कॅनडात दरवर्षी 4000 लोक मृत्युमुखी पडतात. त्यातले बहुसंख्य तरुण असतात आणि त्यांमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट्स यांचाही समावेश असतो. कारण त्यांना सामान्य नागरिकांपेक्षा विनासायास ही ओपॉईडस् मिळू शकतात. .

हा माणूस गयाना देशाच्या जॉर्जटाऊन या शहरात वाढला. आपण डॉक्टर व्हायचे असे त्याने शालेय जीवनापासून ध्येय ठेवले होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील अट्टल दारुडे, त्यामुळे रामसामीला शाळा सुटल्यावर अर्धवेळ, अत्यंत तोकडय़ा पगाराची नोकरी करणे भाग पडले होते. अंगभूत हुषारीने त्याने बँकेत नोकरी मिळवली. पायऱया चढत गेला व कर्जे देणारा अधिकारी बनला, पण त्यावर खूष नव्हता. त्याची आकांक्षा होती वैद्यकीय क्षेत्रात पदवीधर होण्याची, लोकांना बरे करावे अशा त्याच्या कल्पना होत्या. पंचविशीत प्रवेश केला. फार्मसीत पदवी मिळवली. 2001 मध्ये तो कॅनडाचा कायम नागरिक झाला.

शेरीला रामसामी आवडला. कारण तो हुशार होता, विनोदी होता व महत्त्वाकांक्षी होता. म्हणूनच रामसामीने जमैकातल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. दोन वर्षांचा तो Upgrading Course होता. त्यावेळी पत्नीने त्याला आर्थिक व नैतिक आधार दिला. तीन कठीण परीक्षा पास झाल्यावर रामसामीला फार्मासिस्टचा कॅनडामधील परवाना मिळाला. त्याने ब्रॅम्टनमध्ये तीन बेडरूमचे घर घेतले. प्रशस्त अंगण होते. त्यात त्याची दोन मुले खेळत असत. ते पाहूनच रामसामीचे डोळे तृप्त व्हायचे. याच सुमारास त्याचे जुने पाठीचे दुखणे उद्भवले. त्याच्या मणक्यातली एक डिस्क झिजत चालली होती. वेदना असहय़ व्हायच्या. त्यावर उतारा म्हणून डॉक्टरने पर्कोसेट या गोळय़ा घेण्यास सांगितले. पथ्यपाणी काही नाही.

डॉक्टरला संशय आला की रामसामी हा अमली द्रव्यांच्या आहारी जात आहे. त्याने प्रिस्क्रिप्शन बंद केले. रामसामी त्याच्या मुलीच्या फिजिशियनकडे गेला. त्याने नकार दिला. मग त्याला सोपा मार्ग सापडला. फार्मसीत येणाऱया पेशंटस्च्या गोळय़ांतच आपलाही (चोरलेला) साठा मिसळायचा व तो हळूच काढून घ्यायचा. त्याची सद्सद्विवेक बुद्धी नष्ट झाली होती. मला गोळय़ा हव्यात म्हणजे हव्यात. रामसामी स्वतःचाच डॉक्टर बनला. त्याने मेथॅडोन चालू केले. मॉर्फिन, ऑक्सीकोडोन, हिरॉईन यांच्या आहारी गेलेल्यांवर उपाय म्हणून हे वापरतात. मेथॅडोन हा चोरतच होता! परकोसेट चालूच राहिले. एके रात्री त्याचे ओठ निळे पडले, श्वास थांबला. तो मेल्यातच जमा होता. बायकोची त्रेधा उडाली. तिने इमर्जन्सी 911 नंबर फिरवला. हॉस्पिटलमध्ये तीन दिवस राहावे लागले तेव्हा त्याने आपल्या ऑडिक्शनची बायकोकडे कबुली दिली. ती संतापली, चिडली व भयभीतही झाली, परंतु रामसामीची व्यसनांतून सुटका होत नव्हती. त्याची चोरी 2014 मध्ये उघडकीस आली. पोलिसांनी घराचे दार ठोठावले व त्याच्या हातात बेडय़ा लटकावल्या. व्हिडिओ टेपमध्ये तो मेथॅडोन चोरताना कॅमेऱयात कैद झाला होता. पाच कलमे लावली गेली. आश्चर्य म्हणजे न्यायाधिशाचे मन द्रवले. तसेच फार्मसी शिस्तीची कारवाई मागे घेण्यात आली. सहा महिने परवाना रद्द झाला. एवढीच शिक्षा दिली गेली.

व्यसनी लोकांना सुभारण्याच्या प्रयत्न करणाऱया संस्था असतात त्यात त्याने नावनोंदणी केली. आता त्याच्यासमोर दोनच पर्याय होते. एवीतेवी सर्व गमावलेलेच आहे. तेव्हा जन्मभर व्यसनीच राहायचे किंवा मनाचा ठाम निश्चय करून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायचा. त्याने दुसरा मार्ग स्वीकारण्याचे ठरवले. तोपावेतो सर्व मित्रांनी त्याला सोडचिठ्ठी दिली होती. त्याने व्यावसायिक सहकारी त्याच्या वाऱयाला उभे राहत नव्हते. त्याने चर्चचा आधार घेतला. पाद्रय़ापुढे पापांचा पाढा वाचला. करुणेची याचना केली. रामसामीने येशू ख्रिस्ताची प्रार्थना आरंभली. त्याने मेथॅडोनचा त्याग केला. पण औषध त्याला साडण्यास तयार नव्हते. म्हणून शिक्षेखातर त्याला कित्येक आठवडे बिछान्यात निजून रहावे लागले. ताप आला. ओकाऱया होत राहिल्या, पण रामसामीची येशूवरील श्रद्धा आणि अविचल भक्ती त्याला तारून नेती झाली!

8 जून, 2016, किचनेर शहरात नर्स ली वार्डलो ‘होम केअर शिफ्ट’ करत होती. तिच्याकडे 13 वर्षांचा मुलगा मेंदूच्या कर्करोगाने जर्जर होऊन आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर होता व त्याला दर दोन तासांनी मॉर्फिन देण्याची जबाबदारी तिची होती. सात तास उलटले आणि मुलाचे आईवडील चिंतीत झाले. वॉर्डलो ही अर्धवट झोपेत होती व चालताना तिच्या झोकांडय़ा जात होत्या. त्यांनी होम केअर एजन्सीला फोन केला. सुपरवायझर आली तेव्हा वॉर्डलो ही नर्स पेशंट मुलाच्या खोलीत डुलत होती व तिचे डोळे गच्च मिटलेले होते. शेवटचा मॉर्फिन डोस पेशंटला केव्हा दिलाय या सुपरवायझरच्या प्रश्नाला तिने साडेदहा वाजता असे उत्तर दिले. प्रत्यक्षात त्यावेळी दहासुद्धा वाजले नव्हते. तपासणीत आढळून आले की, मॉर्फिनच्या तीन वाईल्स (Vials) गायब आहेत तसेच ऑटिव्हॅनचे 30 डोसेसदेखील बेपत्ता आहेत. वॉर्डलोला ताबडतोब घरी जायचे होते. मी एकटीच जाण्यासाठी सक्षम आहे असा तिचा दावा होता. तिला पोलिसांनी अडवले. बिचारा मुलगा दोन दिवसांनी मरण पावला. त्याच्या वाटय़ाचा डोस वॉर्डलोने स्वतःच्याच शरीरात घुसवला होता. पोलिसांना तिने सांगितले की मला डिप्रेशनमुळे अमली पदार्थांची सवय लागली. तिचा नर्स म्हणून परवाना रद्द झाला. कारण दिले गेले – Drug diversion 1 जानेवारी, 2012 ते 30 सप्टेंबर, 2017 यादरम्यान कॅनडामध्ये सात लाख ओपॉईडस डोसेस अदृश्य झाले! हॉस्पिटल, फार्मसीमधून. आणि हा आकडा प्रतिवर्षी वाढतच आहे. जगात अमेरिकेनंतर ओपॉईडस् फस्त करण्यात कॅनडाचाच नंबर लागतो. 2017 मध्ये ओपॉईडस् प्रिस्क्रिप्शन्स कॅनडात अडीच कोटी होती. म्हणजे प्रत्येक हजार नागरिकाच्या मागे 575! ही आकडेवारी भयानक आहे. ‘एकच प्याला’ नाटकात गडकरी तळीरामाकरवी सांगतात- दारू सोडण्याची वेळ ही पहिला दारूचा प्याला घेण्याआधीचीच असते. तेच अमली पदार्थांच्या सेवनाच्या बाबतीत खरे नाही काय?

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)