उंच माझं माचाळ…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

निसर्गाचं नंदनवन जे कॅमेऱ्यातच नाही तर डोळ्यांत भरून ठेवावं असं दिसणारं माचाळ. माचाळच्या उंच टेकडीवर पोहचल्यावर निसर्गाच्या वर्णनासाठी तुम्हाला डिक्शनरीही अपुरी पडेल. मोठ्या कॅन्व्हॉसवर चित्र काढावं असं निळ्याशार आभाळाखाली हिरव्यागार निसर्गाची अपूर्वाई तुम्ही अनुभवाल.

अथांग समुद्रकिनारा, हिरवीगार गर्द झाडी आणि कड्याकपारीतील निसर्गरम्य गावाच्या सोबतीला कोकणातल्या वैभवात एक नैसर्गिक हिल स्टेशनची भर पडणार आहे. ‘माचाळ’ लांजा तालुक्यातील दुर्गम असं गाव भविष्यात कोकणच्या पर्यटन विकासाचे खणखणीत नाणं ठरणार आहे. सुमारे तीन हजार मीटर उंचीवर असलेले माचाळ हे गाव हिल स्टेशनचे ‘एम’ फॅक्टर ठरणार आहे. ‘एम’ फॉर महाबळेश्वर, माथेराननंतर हिल स्टेशनमध्ये ‘माचाळ’चं नाव घ्यावंच लागेल, पण हे पर्यटनाच्या विकासाचे ध्येय गाठण्यासाठी माचाळ गावात काही पायाभूत सुविधा उभारणं महत्त्वाचे आहे.

इंटरनेट क्रांतीनंतर जग जवळ आले तरी माचाळ आजही जगापासून दूर स्वतःच्या विश्वात आहे. या गावात फोन नाही, मोबाईल तर आऊट ऑफ कव्हरेज, इंटरनेटची तर कधी भेटच नाही झाली असे गाव तुम्हाला काही वर्षे मागे घेऊन जाईल, पण मागे पडलेल्या गावाला निसर्गाने अशी काही देणगी दिलीय की माचाळ हे गाव जगाच्या नकाशावर नाव करू शकेल. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर या गावात पहिले खासदार पोहचले ते विनायक राऊत. त्यामुळे आमदार-खासदारांनी यापूर्वी कधी गाव पाहिले नाही, गावकऱयांनी आमदार-खासदार पाहिला नाही. शे-दीडशे मतांसाठी कोण पायपीट करणार या गणितावर चालणारे पुढारी माचाळपासून दूरच राहिले. माचाळ गावाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक इतिहासाचा वारसा आहे. य़ाचा साक्षीदार विशाळगड माचाळच्या समोरच उभा आहे. त्या काळात घोडय़ांची असलेली वाट आजही माचाळवासीयांचा रस्ता दैनंदिन रस्ता बनलाय. त्या काळात ज्या रस्त्यांवरून घोडय़ांची घोडदौड होत होती त्या रस्त्यावर विकासाच्या घोडदौडीची प्रतीक्षा आहे.

निसर्गाचं नंदनवन जे कॅमेऱ्यातच नाही तर डोळ्यात भरून ठेवावं असं माचाळचे वर्णन करावे लागेल. माचाळच्या उंच टेकडीवर पोहचल्यावर निसर्गाच्या वर्णनासाठी तुम्हाला डिक्शनरीही अपुरी पडेल. मोठय़ा कॅन्व्हॉसवर चित्र काढावं असं निळय़ाशार आभाळाखाली हिरव्यागार निसर्गाची अपूर्वाई तुम्ही अनुभवाल.

माचाळ येथील गावकऱ्यांची व्यथा मांडण्यापूर्वी त्यांच्या कर्तबगारीलाही सलाम करावा लागेल. अंगात वीज संचारावी अशा पद्धतीने मेहनत करत गावकऱयांनी गावात वीज आणली आहे. माजी राज्यमंत्री ल. र. हातणकर यांच्या काळातील ही गोष्ट आहे. गावकऱयांनी विजेची मागणी केली, पण विजेचे खांब गावात नेणार कसे. रस्ताच नाही अशी अवस्था होती. पण गावात वीज हवीच असा निश्चय केलेल्या गावकऱयांनी विजेचे खांब खांद्यावर घेऊन आणले. शाळकरी मुले, महिला सर्वच विजेचे पोल उभारण्यासाठी असलेले साहित्य गावात आणत होते. लहान मुले हातात क्रू आणि अन्य साहित्य घेऊन येत होती. तीन हजार मीटर उंचीवर असलेल्या गावात गावकऱयांच्या कष्टातूनच वीज आली. माचाळ गावात सातवीपर्यंत एक शाळा आहे. पुढील शिक्षण घायचं तर साखरप्यात जावं लागतं. ई-लार्ंनगच्या काळात गावातील मुलं तास-दीड तास पायपीट करून शिक्षण घेतात.
स्किल इंडियाच्या गोष्टी आपण करतो, पण माचाळवासीयांना रोजगार नाही. रोजगारासाठी त्यांना पायपीट करत विशाळगडाला जावे लागते. दोनशे-अडीचशेच्या रोजंदारीवर ही माणसं खपतात. गावातील तरुण मुलं थेट मुंबई गाठतात. लग्नानंतर त्यांच्या बायका गावात राहायला तयार होत नाहीत. त्यामुळे माचाळ गाव वृद्धाश्रमाकडे झुकतोय सुटणार आहेत.

माचाळला पर्यटनाची देणगी लाभलीय हे ओळखून विवेक सावंत यांनी सर्वप्रथम धडपड सुरू केली. ज्या कोकणात सहकार रुजला नाही त्या कोकणात सहकारातून पर्यटन विकास होऊ शकतो, अशी दिशा दाखवताना विवेक सावंत यांनी 1998 मध्ये माचाळ-मुचकुंदी पर्यटन विकास संस्था स्थापन करून सरकारचे लक्ष माचाळकडे वेधण्यास सुरुवात केली. आज 20 वर्षांनंतर माचाळ गावात विकासाचे शब्द घुमू लागले आहेत. माचाळचा विकास पर्यटनातूनच होऊ शकतो हे माचाळच्या काळय़ा खडकावरची पांढरी रेष आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर विनायक राऊत हे पहिले खासदार पोहचल्यानंतर ते दुसऱयांदा पुन्हा संपूर्ण शासकीय यंत्रणा घेऊन गावात पोहचले. तहसीलदार, महावितरण, पर्यटन विकास महामंडळ, बांधकाम विभाग, महसूल विभागातील अनेक अधिकाऱयांना माचाळ-दर्शन घडवले.

माचाळ गावाला विकासाचा किरण दिसू लागला आहे. माचाळ गावच्या रस्त्यासाठी सात कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहेत. निसर्गाची देणगी माचाळचा विकास करणारी आहे. गावात रस्ता झाल्यानंतर महाबळेश्वर, माथेराननंतर माचाळ हिल स्टेशन जगभराच्या पर्यटकांना आकर्षित करेल. काही मंडळींनी भविष्याचा विचार करून माचाळ गावात जमिनी खरेदी केल्या आहेत. गावकऱयांनी जर जमिनी विकल्या तर गावकऱयांची मोठी चूक ठरेल. गावचा विकास होईल, पण त्यात गावकरी कुठेच नसतील याची भीती वाटते. विवेक सावंत यांनी जेव्हा माचाळ गावच्या विकासाठी धडपड सुरू केली, तेव्हा माचाळकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यानंतर 2014 मध्ये सवाआठ किलोमीटर लांबीचा रस्ता कोचरी ते खिंडीपर्यंत झाला. त्यानंतर काही मंडळी माचाळ गावात जाऊ लागली. आता ट्रेकिंगसाठीही माचाळची निवड होऊ लागलीय. आज लोक माचाळ गावात जातात. तेथील गावकऱयांच्या घरातच मटणाच्या झणझणीत जेवणावर ताव मारतात. हौशी पर्यटक माचाळला येऊ लागल्यामुळे त्यांच्या जेवणाच्या आणि राहण्याच्या सोयी उपलब्ध करून देणाऱया गावकऱयांच्या कनवटीला चार पैसे जमा होऊ लागले आहेत. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढली तर माचाळचा विकास दूर नाही, माचाळ गावात आजही मातीच्या भिंती, सारवलेल्या जमिनी, केंबळय़ांची घरे असं वेगळंपण टिकवून ठेवल्यास पर्यटक त्याकडे जास्त आकर्षित होतील.

माचाळच्या त्या कड्याकपारीत असंख्य पक्षी विरहत असतात, रानफुले आणि रानफळांनी तो माळरान बहरून येतो. गावात ऐतिहासिक वारसा सांगणारी माचाळची गुहा आहे. मुचकुंदी ऋषीचे वास्तव्य त्या गृहेत होते अशी एक आख्यायिकाही आहे. या गुहेत शंकराची पिंडी आहे. महाशिवरात्री दिवशी उत्सव होतो. असा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव ‘माचाळ’ लवकर पर्यटनाच्या माध्यामातून जगाच्या नकाशावर येतंय.
[email protected]