
>> दुर्गेश आखाडे
कीर्तनाकडे दीर्घकाळ समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून पाहिले गेले. पूर्वीच्या काळात प्रबोधनाचे सोशल माध्यम ठरलेल्या कीर्तनाची परंपरा आजच्या काळातही आपले स्थान टिकवून आहे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी कीर्तनाला ठरावीक साच्यातून बाहेर काढत वेगळ्या संस्कारात सादर करायला सुरुवात केली. सादरीकरणातील या बदलांनी किर्तन परंपरा अधिक बहरली आणि लोकप्रिय ठरली आहे. चारुदत्त आफळे यांच्या या नव्या संकल्पनेविषयी जाणून घेऊया.
महाराष्ट्राला कीर्तनाची खूप जुनी परंपरा आहे. कीर्तनातून अनेकांना भक्तीचा मार्ग दिसला तर अनेकांना समाजप्रबोधनाचा. कीर्तनात एकपात्री निवेदन असले तरी त्या काळात ते प्रबोधनाचे सोशल माध्यम होतं अशा शब्दांत आजच्या टीव्ही, फेसबुक,व्हॉटस् ऍप आणि इन्स्टाग्राममध्ये अडकून पडलेल्या तरुण पिढीला सांगावे लागेल असं वाटत असले तरी रेकॉर्ड डान्सच्या जमान्यात रत्नागिरीतील तरुणांनी आठ वर्षांपूर्वी कीर्तनाचा कार्यक्रम घ्यायची धाडसी संकल्पना रत्नागिरीतील तरुणांनी प्रत्यक्षात उतरवली. गेली आठ वर्षे रत्नागिरीकरांच्या नववर्षाची सुरुवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांच्या सुमधूर कीर्तनातून होते. गेली आठ वर्षे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे रत्नागिरीकरांवर कीर्तनातून संस्कार घडवत आहेत.
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवांशी गप्पा मारताना एक गोष्ट कमालीची वाटली ती म्हणजे आफळेबुवा हे बदल स्वीकारणारे कीर्तनकार आहेत म्हणून ते तुम्हा-आम्हा सर्व पिढय़ाचे कीर्तनकार वाटतात. कारण गेल्या आठ वर्षांत कीर्तन म्हणजे म्हाताऱया-कोताऱयांनी ऐकायचा कार्यक्रम न राहता इडियट बॉक्सवरील महाएपिसोडच्या वेळेतही कीर्तन संध्याच्या मैदानावर गर्दी होऊ लागली. कीर्तन संध्यासारख्या कार्यक्रमाला काही मध्यम वयाचे आणि तरणीबांड पोरंही जातात हे चित्र रत्नागिरीत पाहायला मिळालं म्हणून कीर्तनसंध्या नव्या वर्षात जोमाने नवा विषय घेऊन कीर्तनाचा हा महोत्सव आयोजित करत आहे. सोशल मीडियाच्या काळात सोसलं तेवढा देवधर्म, पूजाअर्चा करणारा आणि धार्मिक कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्हॉटस् ऍपवरून देणारा मनुष्यप्राणी कीर्तनाकडे वळविण्यासाठी आफळेबुवांनी खूप मेहनत घेतलीय. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्याप्रमाणे बदल स्वीकारला की, ती कला ही जिवंत राहते हे कीर्तनसंध्यासारख्या महोत्सवात आत्मविश्वासाने म्हणावंसं वाटलं. कीर्तनसंध्यामध्ये शिवचरित्र, संभाजी महाराजांचे चरित्र, 1857चे स्वातंत्र्ययुद्ध, क्रांतिकारक सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास, स्वराज्याकडून स्वातंत्र्याकडे, मराठेशाहीची देशव्यापी झुंज, स्वराज्याकडून साम्राज्याकडे अशा विविध विषयांवर आयोजित कीर्तनातून ज्वलंत इतिहासाची पाने उलगडली गेली.
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी आपल्या कीर्तनात तंत्रज्ञानाचा उपयोग करत नवनवे बदल केले आणि त्या बदलाची ते प्रांजळपणे कबुलीही देतात. दूरचित्रवाणीच्या मालिकांमध्ये प्रश्नमंजुषा असते तशीच प्रश्नमंजुषा त्यांनी आपल्या कीर्तनात आणली. पूर्वीच्या पिढय़ांचा भर श्रवणीय मनोरंजनावर होता. त्यात मोठा वाटा रेडिओचाही आहेच. त्या काळात कीर्तनेही लोक ऐकायला जात, पण हल्ली लोकांना ऐकताना ते चित्र डोळ्यासमोर पाहायला आवडतं. दृक – श्राव्य माध्यमातून गोष्टी अधिक रंजक वाटतात. इतिहास वाचा सांगितले तर अनेक जण तोंड मुरडतील, पण तोच इतिहास दूरचित्रवाणीवर अधिक रंजकपणे सांगितला तर लोक आवडीने पाहतात हे ओळखून आफळेबुवांनी आपल्या कीर्तनात दृक-श्राव्य पद्धत आणली.
आफळेबुवांच्या ऐतिहासिक किंवा देशप्रेमावरील कीर्तनासाठी ते वेगळं चित्रीकरण करतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आफळेबुवांनीच दिलं. ते म्हणाले की, अनेक ऐतिहासिक घटना, थोर पुरुष आणि क्रांतिकारकांवर चित्रपट व मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. मी कीर्तन करताना आवश्यक इतका चित्रपटातील प्रसंगांचा तुकडा पडद्यावर दाखवत तो इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. पडद्यावरची दृश्ये पाहताना लोकांना इतिहासाची, त्याबरोबरच कीर्तनाची आवड निर्माण होते.
हे सर्व बदल आपल्या काही कीर्तनकार सहकाऱयांच्या पचनी पडत नाहीत, पण मी मात्र आजच्या सोशल मीडियाच्या जगात हे बदल अपेक्षित समजतो. थोडा बदल करत पौराणिक कीर्तनाबरोबर मुलगी वाचवा, स्वच्छता अशा सामाजिक विषयांवरही मी कीर्तन करतो. मी नाटकात आणि मालिकेत काम केले हासुद्धा अनेक माझ्या सहकाऱयांना न आवडलेला बदल मी स्वीकारला. कारण मालिकेतले ते बुवा आज गावात कीर्तन सांगणार आहेत असं कळल्यावर अनेक कीर्तन न ऐकणारी मंडळी ही त्या मालिकेमुळे माझ्या कीर्तनाला येतात तेव्हा मालिकेत काम केल्याचा असाही फायदा झाल्याचे आफळेबुवा मिश्कीलपणे सांगतात. गायक व्हायला अनेक जण धडपडतात तसाच कीर्तनाकडेही तरुण पिढीचा ओढा आहे. भारती विद्यापीठाने अलीकडे कीर्तनाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात कीर्तनाकडे पेशा समजून तरुण पिढी वळू शकते असा विश्वास आफळेबुवांना वाटतो. आफळेबुवा गेली अनेक वर्ष रत्नागिरीत कीर्तनसंध्या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना कीर्तनातून मंत्रमुग्ध करत आहेत.
जानेवारी महिन्याची सुरुवात म्हणजे कीर्तनसंध्या असं जणू समीकरण रत्नागिरीत तयार झाल्याने अनेक कीर्तनरसिक आफळेबुवांचे कीर्तन कधी आहे याची चौकशी करतात. कीर्तनसंध्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करून त्याच्या ध्वनिफितीही तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे कीर्तनाच्या कार्यक्रमाचा ठेवाही जपण्याचे काम आफळेबुवा करत आहेत.





























































