
दुष्यंत पाटील
‘नटॉकर’ ही एक परिकथा. या कथेवर आधारित लघुकथा फ्रेंच लेखक डय़ूमाने लिहिली आणि रशियन संगीतकार चायकॉस्की याने या कथेच्या बॅलेसाठी संगीत रचना तयार केली. 1819 मध्ये रचलेली ही रचना तयार करताना अनेकविध अनुभवांनी चायकॉस्की समृद्ध होत गेला.
रशियन संगीतकार चायकॉस्की याला 1891 च्या सुरुवातीला एका बॅलेसाठी संगीत रचण्याचे काम मिळाले. बॅलेचे नाव होते ‘नटॉकर’. या बॅलेचे कथानक एका परिकथेवर आधारित होते. हॉफमन नावाच्या जर्मन लेखकाने ‘दि नटॉकर अँड दि माउस किंग’ नावाची एक लघुकथा लिहिली होती. या मूळच्या कथेत थोडे बदल करत फ्रेंच लेखक डय़ूमा याने ‘नटॉकर’ कथा नव्याने लिहिली होती. त्यावरच हा बॅले आधारित होता. ही कथा वाचताना चायकॉस्कीला सुरुवातीला ही कथा इतकी खास वाटली नाही. पण जसजसं तो ही कथा वाचत गेला तसतसं त्याला ही कथा त्याला आवडायला लागली. एप्रिलमध्ये त्याला संगीताच्या दौऱयासाठी अमेरिकेमध्ये जायचे होते. अमेरिकेत जाण्यापूर्वी या बॅलेचे जितके शक्य होईल तितके संगीतरचनेचे काम चायकॉस्कीला संपवायचे होते.
‘नटॉकर’च्या कथानकाचा सारांश असा काही तरी होता: नाताळच्या आदल्या रात्री एक जोडपं पार्टी देत असते. त्यांना 15 वर्षांची क्लारा नावाची एक मुलगी असते आणि तिच्यापेक्षा लहान असा एक मुलगा असतो. क्लारा बॅले नृत्याचे शिक्षण घेत असते. या पार्टीत आलेला जादूगार पार्टीतल्या मुलांना खेळणी भेट देतो. क्लाराला एक सैनिक बाहुला भेट मिळतो. या बाहुल्यात काहीतरी जादू असावी असे क्लाराला वाटत असते. तिच्या भावाच्या हातून तो बाहुला मोडल्यानंतर आपोआपच दुरुस्त होतो आणि त्यामुळे तो बाहुला जादुई असल्याची क्लाराची खात्री पटते.
पार्टी संपल्यावर पार्टीला आलेले सारे लोक आपापल्या घरी जातात. घरातले सारे लोक झोपी जातात, पण क्लाराला झोप लागत नाही. ती खालच्या मजल्यावर आपल्या बाहुल्याला शोधत येते. आता काही विचित्र घटना घडायला लागतात. खोलीचा आकार वाढत जातो. महाकाय उंदरांची एक सेना क्लारावर हल्ला चढवते. या सेनेचे नेतृत्व उंदरांचा राजा करत असतो. या वेळी क्लाराचा ‘नटॉकर’ बाहुला जिवंत होतो, खेळल्यातल्या सैनिकांना घेऊन येतो आणि क्लाराचे रक्षण करायचा प्रयत्न करतो.
या लढाईत उंदरांची सेना वरचढ ठरायला लागते. क्लारा आपली चप्पल उंदरांच्या राजाला मारते. मग उंदरांचा राजा कोसळतो. नटॉकर लढून थकलेला असतो. थकल्यामुळे तो जमिनीवर पडतो. काहीच हालचाल नसल्याने क्लाराला वाटते की त्याने प्राण गमावला आहे. तिला खूप वाईट वाटते. ती त्याला जिवंत करायचा प्रयत्न करते. तो जिवंत होतो आणि त्याचे रूपांतर एका देखण्या राजकुमारात होते.
यानंतर राजकुमार आणि क्लारा नृत्य करतात. राजकुमार तिला ‘हिम’भूमीवर घेऊन जातो. यानंतर ते आकाशामध्ये जातात. इथे वेगवेगळ्या जगतांतून आलेले नर्तक असतात. क्लाराने राजकुमाराचे रक्षण केल्याने तिचा इथे सत्कार होतो. क्लाराचे रूपांतर एका परीमध्ये (शुगर प्लम फेअरी) होते. इथे नटॉकरसोबत तिचे पुन्हा एकदा नृत्य येते. पण हे नृत्य संपण्याआधीच क्लाराचं स्वप्न संपते आणि ती जागी होते. जागी झाल्यावर आपण आपल्या घरात असल्याचे तिला जाणवते.
या बॅलेसाठी नृत्यदिग्दर्शनाचे काम आंतरराष्ट्रीय ख्यातीचा नर्तक, नृत्यदिग्दर्शक मेरिअस पेटीपा करणार होता. रशियातून निघण्यापूर्वी चायकॉस्कीने पेटीपाची भेट घेतली आणि या बॅलेच्या संगीताविषयी चर्चा केली. यानंतर त्याचा रशियातून पश्चिमेकडे प्रवास सुरू झाला.
प्रवास करत करत चायकॉस्की जर्मनीमध्ये पोहोचला. इथे त्याला काही काळ थांबायचे होते. बर्लिनमध्ये असताना त्याने स्वतची ओळख लपवत स्वतच रचलेल्या संगीताच्या कार्पामामध्ये जाऊन श्रोता म्हणून हजेरी लावली. हा त्याच्यासाठी सुखद अनुभव होता. त्याला घरची आठवण येऊन उदास वाटताना अशा कार्पामाला हजेरी लावणे म्हणजे एका प्रकारचा इलाजच होता, असं त्याने एका पत्रात लिहिलेय.




























































