
>> द्वारकानाथ संझगिरी
तुम्ही रोमचं सेंट पीटर्स पाहिलंय?
पॅरिसचं नोत्रदाम कॅथेड्रल पाहिलंय?
लंडनचं सेंट पॉल? मस्त! धर्मबिर्म सोडा, पण त्यांचं नुसतं सौंदर्य, कलेचा आविष्कार, बांधकामाची भव्यता तुम्हाला दिग्मूढ करील, पण तिथेच थांबू नका. इंग्लंडमध्ये केंट परगणातल्या कॅन्टरबरीला जा आणि ते कॅथेड्रल पहा.
सौंदर्य, कलेचा आविष्कार वगैरेच्या बाबतीत ते वरच्या कॅथेड्रलच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, पण ते वयोवृद्ध आहे. त्याचा इतिहास रंजक आहे. प्रोटेस्टंट ख्रिश्चनांची ती काशी आहे. किंबहुना त्या कॅथेड्रलचं वर्णन ‘दगडातलं इंग्लंड’ असं करता येतं. इंग्लंड या देशाचा इतिहास त्या कॅथेड्रलशी निगडित आहे.
पुढे जाण्याअगोदर किंचित प्रोटेस्टंट ख्रिश्चनांबद्दल सांगतो. ख्रिश्चनांमध्ये प्रामुख्याने जे दोन पंथ आहेत. त्यात एक रोमन कॅथलिक, दुसरा प्रोटेस्टंट. जगातल्या ख्रिश्चन मंडळींपैकी चाळीस टक्के लोकसंख्या प्रोटेस्टंट आहे. जगात नऊशे दशलक्ष प्रोटेस्टंट आहेत. युरोपचा विचार केला तर उत्तर युरोप, इंग्लंडमध्ये जास्त प्रोटेस्टंट आहेत.
पुढचा तुमचा प्रश्न असेल, दोघांमध्ये फरक काय? जर्मनच्या मार्टिन ल्युथर किंगला रोमन कॅथलिक धर्मातल्या त्रुटी जाणवल्या. रोमन धर्मगुरूंचं आयुष्य हातात असलेल्या प्रचंड धार्मिक आणि आर्थिक ताकदीमुळे विलासी होतंय असं वाटलं. रोमन कॅथलिक धर्माला सुधारणांची गरज आहे असं त्याला जाणवलं आणि त्याने ईश्वराकडे जाण्याचा एक वेगळा रस्ता खोदला. या दोन पंथांत काही मूलभूत वैचारिक अंतर आहे. प्रोटेस्टंट मानतात की, देव (म्हणजे येसू) आणि माणूस यात आणखी तिसऱयाची लुडबूड कशाला? (मीसुद्धा याच मताचा आहे). प्रोटेस्टंटांकडे क्वीन मेरीला फारसं महत्त्व नाही. प्रोटेस्टंट फक्त बायबलला मानतात. रोमन कॅथलिक बायबलबरोबर त्यांच्या कॅथलिक परंपरासुद्धा मानतात. सध्या तरी आणखी खोलात जायची गरज मला वाटत नाही.
इ. स. 547 मध्ये रोमच्या चर्चकडून धर्मप्रसारासाठी संत अगस्टिनला (ऍगोस्टिन) इंग्लंडला पाठवण्यात आलं. तो केंटमध्ये उतरला. त्याने या कॅथेड्रलचा पाया खणला. याचा अर्थ लक्षात घ्या. चौदाशेपेक्षा जास्त वर्षे ते जुनं आहे. ते एका रात्रीत उभं राहिलं नाही. पुढे नऊशे वर्षे त्यात बदल होत गेले. त्याचा विस्तार होत गेला, पण ते युरोपचं प्रमुख धार्मिक स्थळ बनलं थॉमस बेकेट या आर्च बिशपमुळे. इंग्लंडचा राजा दुसरा हेन्रीअणि थॉमस बेकेट याच्यातील ‘रक्तरंजित’ इतिहासाची पार्श्वभूमी या कॅथेड्रलला आहे आणि त्याची बारीक सारीक माहिती डॉ. काणेगावकरांना आहे. त्यांच्या हाईथ गावाच्या वेशीच्या जरा पुढे सॉल्टवूड म्हणून एक जागा आहे. तिथे एक जुना कॅसल (किल्ला) आहे. तो दाखवत ते म्हणाले, ‘‘या किल्ल्यात बेकेटला मारण्यासाठी गेलेले सरदार आदल्या रात्री राहिले होते.’’ मला धक्का बसला. अशी अपेक्षा महाराष्ट्रात फिरताना बाबासाहेब पुरंदरे किंवा गो. नी. दांडेकरांकडून असायची. त्यानंतर पुढे एका वास्तूजवळ गाडी थांबवून ते म्हणाले, ‘‘बेकेटला मारलं त्या दिवशी त्या सरदारांनी सकाळी नाश्ता इथे केला.’’ ब्रेकफास्टचा मेनू त्यांना ठाऊक असावा, पण ते सांगायला विसरले. मी इतका आश्चर्यचकित फार क्वचित झालोय. त्यांनी मला सांगितलं असतं की, त्या सरदारांपैकी मी एक होतो, तर मी त्यावर विश्वास ठेवला असता. मी त्यांना म्हटलं. ‘‘तुम्हाला कळलं कसं?’’ ते म्हणाले, ‘‘त्या दोन वास्तूत माझे पेशंट राहतात, त्यांनी सांगितलं.’’ आता पुढची गंमत पहा. या बेकेटची हत्या 1170 मध्ये झाली. मोजा, किती वर्षे झाली? जवळपास साडेआठशे वर्षे. त्याआधीचा तो किल्ला आहे आणि ते घर, पण अजून ते नुसतं धडधाकट नाही तर त्यात माणसं राहतात. म्हणजे मूलतः या घरांची प्रकृती उत्तम असावीच, पण त्यांची निगासुद्धा अत्यंत काळजीपूर्वक राखली असावी. इंग्लंडमध्ये काही गोष्टींच्या परंपरा, त्यांचं आयुर्मान तोंडात बोटं घालायला लावतात.
बेकेटच्या बाबतीत पुढे धमाल धमाल झाली. ते ‘वेगात दौडलेले’ चार इंग्लिश वीर वर्षभर अज्ञातवासात होते. राजा हेन्रीने त्यांना शिक्षा दिली नाही किंवा त्यांची मालमत्ता जप्त केली नाही, पण त्यांच्याबरोबर संबंध ठेवले नाहीत. पुढे या चार वेडय़ांना पश्चात्ताप झाला. ते रोमच्या चर्चला शरण गेले. पोपने त्यांना पुण्यभूमीच्या सेवेसाठी तिथे नाईट्स किंवा सरदार म्हणून ठेवलं. तिथे म्हणजे व्हॅटिकनला. चौदा वर्षे त्यांच्याकडून पुण्यभूमीची सेवा केली. ज्या मध्ययुगात छोटय़ा चुकीला मृत्युदंड मिळे, तिथे मारेकऱयांना देवभूमीचे सरदार केलं गेलं (प्रायश्चित्त घ्यायची ही एक आगळी, पण उदारमतवादी पद्धत म्हटली पाहिजे).
तिथे चर्चमधून बेकेटचं पार्थिव पळवलं जाईल अशी भीती वाटली म्हणून ते चर्चच्या तळघरात ठेवलं (तिथे आपल्याला जाता येतं). नंतर 1220 साली त्याची हाडं तिथून काढून सोन्याने आणि हिरेमाणकांनी सजवलेल्या पेटीत ठेवण्यात आली आणि कॅन्टरबरी चर्च धर्मस्थळ झालं. ती हिरेमाणकं आता या लंडनच्या क्राऊन ज्युएल या म्युझियममध्ये आहेत. कॅन्टरबरीला युरोपातून भाविक यायला लागले. बेकेट महात्मा झाला. मी गेल्या वेळी उद्धृत केलेली हेन्री ऑस्टिन डॉबसनची कविता पुन्हा आठवा.
Fame is a food that dead men eat.
I have no stomach for such a meat
In little light and narrow room
they eat it in the silent Tomb.”
किती खरं लिहिलंय ना या कवीने?
पुढे तर इंग्लंडचा धार्मिक इतिहास बदलला, त्याबरोबर चर्चचासुद्धा! आठव्या हेन्री राजाच्या अनेक लग्नं करायच्या इच्छेआड पोप आला. तो कॅथलिक. त्याने घटस्फोटाला मान्यता द्यायला नकार दिला. राजाने थेट प्रोटेस्टंट धर्म स्वीकारला आणि धर्मसत्ता हातात घेतली. आजही इंग्लंडची राणी चर्चची प्रमुख आहे. पुढे हेन्रीच्या मुलीने, क्वीन मेरीने पुन्हा कॅथलिक धर्म स्वीकारला आणि प्रोटेस्टंटाचा छळ केला. म्हणून तिला ब्लडी मेरी म्हणतात. ‘ब्लडी मेरी’ या अतिशय चविष्ट आणि माझा लाडक्या कॉकटेलमागे इतका क्रूर इतिहास आहे असं वाटलं नव्हतं. मग पहिली एलिझाबेथ आली. तिने प्रोटेस्टंट धर्म स्वीकारला, पण सर्वांना बरोबर घेऊन जाणारं अँग्लिकन चर्च स्थापलं. त्यानंतर कॅन्टरबरी चर्च अँग्लिकन झालं.
कॅन्टरबरी, तिथलं हे ऐतिहासिक चर्च आणि क्रिकेटच्या मैदानातलं लिंबाचं झाड याबद्दल पुढच्या वेळी.




























































