एका लिंबाच्या झाडासाठी

121

>> द्वारकानाथ संझगिरी

इंग्लंडला जेव्हा जाल, तेव्हा इतर महत्त्वाची टुरिस्ट शहरे पाहिल्यानंतर इतिहासाची आवड असेल तर केंटमध्ये कॅन्टरबरीला जाच.

कॅन्टरबरी परमेश्वराने काढलेल्या पेंटिंगसारखं दिसतं म्हणणं म्हणजे, हेमामालिनी काय सुंदर दिसायची ना? वगैरे म्हणण्यासारखं आहे. त्यात काही बातमीच नाही. तिथे कुठलंही छेटे शहर सुंदरच दिसते. ‘कॅन्टरबरी’ ही जास्त मेकअप केलेली हेमामालिनी आहे. दगडी रस्त्याने नटवलेलं सिटी सेंटर आणि लाकडी फ्रेमची घरं! मध्ययुगातलं हे सिटी सेंटर आहे. ते पाहताना काळ तिथेच थांबलाय असं वाटतं. त्याचे अनावश्यक आधुनिकीकरण केलं गेलेलं नाही. त्यांना तरी संधी होती. इंग्लंड हा परंपरा जपणारा देश आहे. पडलेल्या बुरुजांना किंवा वास्तूंना तिथे रुईन्स (RUINS) म्हणण्याची पद्धत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जिथे दुरुस्ती शक्य नाही तिथे त्याचे जुनं कोसळलेलं रूप जतन करून ठेवलंय. लक्षात ठेवा की, दुसऱया महायुद्धात या शहरावर दहा हजार चारशे पंचेचाळीस बॉम्ब पडले. 1 जून 1942 साली एका बॉम्बहल्ल्यात 800 इमारती जमीनदोस्त झाल्या. आणखी एक हजार इमारतींत थोडी पडझड झाली. सुदैवाने तिथल्या कॅथेड्रलवर बॉम्ब पडले नाहीत किंवा टाकले गेले नाहीत म्हणूया. बऱयाच ठिकाणी दुसऱया महायुद्धात वैमानिकांनी हे पथ्य पाळलेलं दिसतं. तुम्ही कधी जर्मनीत कोलॉनला गेलात, तर तिथे तुम्हाला नितांत सुंदर चर्च दिसेल. दुसऱया महायुद्धात जवळपास दोन तृतियांश कोलन उद्ध्वस्त झाले, पण त्या चर्चला खरचटलंसुद्धा नाही. कॅन्टरबरीत त्या कॅथेड्रलमधली लायब्ररी दुर्दैवाने जळून खाक झाली, पण तिथल्या अग्निशमन दलाने आग विझवून कॅथेड्रलला गंभीर नुकसान पोहोचणार नाही हे पाहिलं.

जेव्हा हे शहर, त्याचं सिटी सेंटर या राखेतून पुन्हा उभारणं आलं, तेव्हा जुनी गॉथिक शैली, रोमन शैलीला तिलांजली दिली गेली नाही. त्या शैलीत ते उभारलं म्हणून ते मध्ययुगीन वाटतं. त्यांच्या या प्रयत्नामुळे तिथे जुन्या वास्तू म्हाताऱया होत नाहीत, तरुण राहतात. इमारतीची प्लॅस्टिक सर्जरी अगदी उत्तम केली जाते. एक उदाहरण देतो. इंग्लंडमधली सर्वात जुनी शाळा कॅन्टरबरीत आहे. ‘द किंग्ज स्कूल’ असं तिचं नाव आहे. संत ऍगॉस्टीनने तिची स्थापना केली आणि आजतागायत ती अखंड सुरू आहे. ही फुटपट्टी लावली तर ती जगातली सर्वात जुनी शाळा आहे. हे जे करणं आहे ना हे आपल्याला कधी जमलं नाही. महाराजांचे गड नाही जपता येत, शाळा कुठे जपणार?

आता कॅन्टरबरी चर्चचं पहा. ते चौदाशे वर्षं जुनं आहे. मागच्या लेखात मी त्याचा इतिहास कथन केलाय. ते एका रात्रीत उभं राहिलं नाही. नऊशे वर्षे त्यात वाढ होत होती. किती राज्यकर्ते बदलले पहा. आधी रोमन्स, मग ऍग्लोसॅक्सनं, मग विल्यम द कॉकटरने हल्ला केल्यावर नॉर्मडीच्या ‘कॉटमन्स’ने ताबा घेतला. पुढे ऍग्लीकन! पंथ वेगळे असले तरी धर्म एक असल्याने ते कुणी उद्ध्वस्त केले नाही. त्यात भर घातली गेली. विविध शैलीची त्यात भर पडली. आधी रोमन, मग गॉथिक, मग ब्रिटिश. शैलीप्रमाणे स्थापत्य शास्त्र्ा बदललं, उंची वाढली, कमानी वाढल्या. खांब आणि कमानींची वजन झेलण्याची ताकद वाढली. इंग्लिश सिव्हिल वॉरच्या वेळी चर्चची मोडतोड झाली. त्या काळात ‘प्युरिटन क्रांती’ झाली. प्युरिटन्स म्हणजे प्रोटेस्टंट ज्यांना इंग्लिश चर्च कॅथॉलिक संस्कारांपासून दूर करायचं होते. मध्य युग हे धार्मिकदृष्टय़ा भयानक होते. त्याला कुठलाही धर्म अपवाद नाही. या प्युरीटन मूर्ती भंजकांनी ख्राईस्ट चर्च गेटवरचा येसूचा पुतळाही तोडला. तो पुतळा 1990 साली पुन्हा बसवला गेला आणि गेलो तेव्हा चर्चच्या मेंटेनन्सचे काम सुरू होते.

इंग्लंड पाहायला जाताना त्यांचा राजकीय आणि धार्मिक इतिहास नजरेखालून घालूनच जा. मग ती स्थळे पाहताना जास्त मजा येईल.

माझ्यासारखे क्रिकेट फॅन असाल तर कँटच्या कॅन्टरबरी क्रिकेट ग्राऊंडवर जा. इंग्लंडमध्ये क्रिकेट पाहायला सर्वात जास्त मजा येते हा माझा अनुभव. अर्थात ‘मजा’ यात अनेक गोष्टी अंतर्भूत होत्या. मला वातावरण आवडतं. 1996 साली प्रथम मी तिथे हिंदुस्थान – केंट मॅच पाहिली होती. आणि त्यावेळी पहिली गोष्ट जर कुठली नजरेला पडली असेल तर ती चक्क मैदानात सीमारेषेच्या आत लिंबाचं मोठं झाड होतं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पीटर मॅरीट्स बर्गला मी अख्खं झाड मैदानाच्या आत पाहिलं होतं. 1847 साली हे मैदान तयार केलं तेव्हा ते लिंबाचं झाड तसेच सीमारेषेच्या आत ठेवलं गेलं. आपल्याकडे ते झाड छाटलं गेलं असतं, पण आसपासचीही छाटली असती. या झाडामुळे त्या मैदानापुरता क्रिकेटचा नियम बदला गेला. त्यावेळी त्यांचाच खेळ, त्यांचंच राज्य म्हणून त्यांनी नियम बदलला. त्या झाडाला चेंडू लागला की चार धावा दिल्या जात. मग चेंडू मुळाला लागो, बुंध्याला की वर फांद्यांना! त्यामुळे तिथून षटकार ठोकणं कठीण होतं. तरीही चार बहाद्दर फलंदाज आहेत, ज्यांनी या झाडावरून चक्क षटकार ठोकले, पहिला होता आर्थर जॅको वॉटसन. ही 1925ची गोष्ट! तो ससेक्सचा. नंतर वेस्ट इंडीजच्या लिपरी कॉन्टनटाईनने 1928 साली ते झाड पार केले. कॉन्टनटाईनचं वर्णन ‘वेस्ट इंडीज क्रिकेटचा पितामह’ असं करता येईल. त्याची थिअरी होती की चेंडू वरून मारला पाहिजे. कारण हवेत क्षेत्ररक्षक ठेवता येत नाहीत. त्याने टी-20त चेंडू हरवले असते. तिसरा मिडलसेक्सचा जिम स्मिथ. त्याने 1939 साली हे कार्य सिद्धीस नेलं. विचार करा, त्या काळात आजच्या बॅट्स नव्हत्या. किती कठीण असेल पहा आणि शेवटचा विंडीजचा कार्ल हुपर. ते साल होतं 1992. नव्वदीत झाड किडायला सुरुवात झाल्याची जाणीव केंट काऊंटीला झाली. त्यांनी ते जगवायचा प्रयत्न सुरू केला. झाडाची उंची 120 फुटांवरून 90 फुटांवर आणली. झाडाचा मृत्यू जवळ आलाय हे जाणवून जिम स्वॅन्टन या बुजुर्ग पत्रकाराच्या हस्ते सीमारेषेबाहेर दुसरं लिंबाचं झाड लावलं गेलं. हे नवे झाड वाढत असतानाच एका वादळात 7 जानेवारी 2005 साली जुने झाड तुटले. फक्त सात फुटांचा बुंधा उभा राहिला. तोपर्यंत नवं झाड फक्त सहा फुटांचं झालं होतं. परंपरा जपायची किती हौस पहा या ब्रिटिशांना! त्यांनी ते सहा फुटाचं झाड सीमारेषा बदलून सीमारेषेत आणलं, पण पुढे ज्या बाजूला झाड होते, तिथे निवृत्त मंडळींचे फ्लॅट उभे राहिले. त्यामुळे नाइलाजाने सीमारेषा बदलावी लागली आणि झाड सीमारेषेबाहेर गेले.

परवा मी त्या मैदानावर गेलो, तेव्हा ते सीमारेषेबाहेरचं झाड पाहिले. ब्रिटिशांच्या इतिहास जपण्याच्या वृत्तीला सलाम ठोकला आणि जड पायांनी मैदान सोडलं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या