
>> द्वारकानाथ संझगिरी, [email protected]
एखाद्या देशात फिरताना, स्वतः गाडी चालवत फिरलं की पर्यटनाच्या नकाशावर नसलेली, काही ठिकाणं दिसतात. एखाद्या छोटय़ाशा स्थानिक उपाहारगृहात एखादा वेगळाच पदार्थ चाखायला मिळतो. स्थानिक ब्रुअरीतून तयार केलेली बीयर तुमच्या जिभेवरून पोटात घसरताना शरीर उत्तेजित करते. प्रवासाचा शीण तत्काळ निघून जातो. कधीतरी एखादी धक्कादायक गोष्ट दिसते. अशीच एक धक्कादायक गोष्ट आम्हाला दिसली. वानाकाहून क्वीन्स लॅण्डला जाताना एका शेतात एक लाकडाची भिंत उभी केली होती आणि त्यावर विविध रंगांच्या आणि आकाराच्या कंचुकी लटकत होत्या. आणि गाडी थांबवून काही ललना चक्क कंचुकी लटकवायला जात होत्या. माझ्यातलं कुतूहल जागे झालं आणि कुतूहल जागं झालं की मी स्वस्थ बसत नाही.
लाकडाच्या उभ्या आडव्या पट्टय़ांनी ती भिंत उभी केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच एका अतिशय ऐतिहासिक कारड्रोना हॉटेलजवळ आम्ही थांबलो. त्या वेळी तिथल्या एका दुकानदाराला मी त्या बेसियर्सच्या भिंतीबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘‘ज्या शेतात ती भिंत उभारली आहे त्याच्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तिची आठवण म्हणून त्याने तिच्या कंचुकी तिथे लटकवल्या. मग त्यातून तिथे येऊन कंचुकी लटकवायची आणि स्तनांच्या कॅन्सरसाठी तिथल्या पेटीत पैसे टाकण्याची पद्धत सुरू झाली.’’ अर्थात त्याची एक दुसरी बाजू मांडली जाते. 1998-99 सालापासून हे कंचुकी (ब्रा) त्या भिंतीला लटकवणं सुरू झालं. ती भिंत कार्ड्रोना दुरीच्या हमरस्त्यावर आहे. त्यामुळे त्या भिंतीकडे लक्ष वेधले जायला लागले. हळूहळू कंचुकींची संख्या शेकडय़ाने वाढली. न्यूझीलंड हा सामाजिकदृष्टय़ा सुधारलेला देश असला तरी तिथेही संस्कृतीरक्षक आहेत. त्यामुळे एकदा अचानक त्या कंचुक्या भिंतीवरून गायब झाल्या. ही ब्रेकिंग न्यूज झाली. लगेच नवमतवादी सरसावले. त्यांनी भिंत कंचुकींनी सजवली. पुन्हा कुणीतरी त्या गुपचूप काढल्या. त्याबरोबर पहिल्यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज झाली. मीडियाची ताकद पहा.
युरोपियन पर्यटकांचे या भिंतीकडे लक्ष गेले. (त्यामुळे माझं तिथे लक्ष गेले, याचं आश्चर्य वाटू नये!) पुन्हा भिंत बहरली. गंमत पहा. काहींचं मत ही भिंत पर्यटकांना आकर्षित करते म्हणून ठेवावी. दुसरं मत, ‘‘यात काय सौंदर्यशाली आहे? पुढचा रस्ता डोंगरातून नागमोडी जातो. त्या कंचुकींचा ड्रायव्हरवर परिणाम होऊन त्याचा गाडीवरचा ताबा सुटला तर.’’ मला दुसरं मत रंजक वाटलं. ज्या देशात उन्हाळय़ात कंचुकीसदृश ब्लाऊजवर फिरणं ही फॅशन आहे, तिथे भिंतीवर लटकावलेल्या कंचुकीने माणसाचा तोल जाऊ शकतो? तिसरं मत होतं की, ‘जवळच्या वानाका शहरात जपानी विद्यार्थी राहतात. तिथे आशियाई मंडळी (त्यात हिंदुस्थानी आली) राहतात. त्यांच्या भावना दुखावल्या तर?’ या मतभेदानंतर तिथल्या नगरपालिकेने ती भिंत काढायची ठरवले. लोकशाहीत अशा गोष्टीला प्रत्युत्तर मोर्चा, सत्याग्रह, मानवी साखळीने दिले जाते. ती भिंत कंचुकीने सजलेली असावी यासाठी तिथल्या कंचुकीवादी मंडळींनी 7400 कंचुकींची साखळी तयार केली. जागतिक विक्रमापेक्षा ही संख्या एक लाखाने कमी आहे. असेही विक्रम असतात याची मला कल्पना नव्हती. पण ‘वानाका’च्या लोकसंख्येचा विचार केला तर 7400 माणसं ही प्रचंड गर्दी आहे. या साखळीमुळे तिथली नगरपालिका नमली. ती भिंत डौलाने उभी आहे आणि आम्ही ती पाहू शकलो, म्हणून मी लिहू शकलो.
त्या कंचुकी भिंतीच्या पुढे एक ऐतिहासिक कारड्रोना हॉटेल आहे. वानाका-क्वीन्स टाऊनला जोडणारा ‘क्राऊन रेंज रोड’ म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची सढळ हाताने केलेली उधळण आहे. तो रस्ता सापाचा आकार घेत, डोंगरातून जातो. त्या डोंगराच्या पायथ्याशी हे हॉटेल आहे. 1863 साली ते बांधलं. त्या वेळी त्या ओटॅर्गो विभागात सोने सापडले. त्यामुळे गाव आणि छोटे शहर वसले. त्या वेळी चिनी तिथे आलेले आहेत. कुठे चीन, कुठे दक्षिण न्यूझीलंड! भाकरी आणि पैसा माणसाला कुठूनही कुठे घेऊन जाऊ शकतो. हॉटेलची ती लाकडी इमारत तशीच्या तशी आज उभी आहे. ही मंडळी ‘म्हातारीण’ तरुण ठेवण्यात वाक्बगार आहेत. आतला माहोलही, तसाच एकशे छप्पन वर्षांपूर्वीचा आहे. बसायला लाकडी बाकं, टुरिस्ट बसेस इथे थांबतात. (चामडी सोपाही त्या काळातला) लाकडी बार आणि थंडीत उबदार वाटण्यासाठी तयार केलेली एक जुनी काऊबॉईजच्या जुन्या हॉलीवूड सिनेमातली फायर प्लेस. तिथला एक पियानो पण आपलं लक्ष वेधून घेतो. हळूच मी त्यावरून बोटं फिरवली. तो गोड वाजला. ही माझ्या बोटाची किमया नव्हती. मला कुठे पियानो वाजवता येतो? तो पियानोही म्हातारा झालेला नव्हता.
त्या हॉटेलच्या काही जुन्या जाहिराती किंवा फलक त्यांनी तसेच ठेवले आहेत. त्यात घोडे आणि बग्गी भाडय़ाने मिळण्याची जाहिरात होती. ती थेट मला त्या काळात घेऊन गेली. मी घोडय़ावरून एक रपेटही मनातल्या मनात करून आलो. 1926 साली जेम्स पॅटरसनने ते हॉटेल विकत घेतले आणि 1961 साली वयाच्या 91 वर्षी त्याची त्या हॉटेलवर मालकी होती. त्याची जुनी व्हिंटेज गाडीही त्या हॉटेलच्या दारात उभी आहे. त्या काळातही तिथे एक बिलियर्डचं टेबल होते. पार्टी, बॉलडान्स, कॉन्सर्टस्साठी हॉल उपलब्ध होता. आणि मालक जेम्स पॅटरसन प्रत्येक गिऱहाईकाची काळजी घ्यायचा. तो ठरवायचा कुणाला किती पेग द्यायचे. समजा प्रवासी ती डोंगराची नागमोडी वळणं पार करून क्वीन्स टाऊनला जाणार असेल तर तो फक्त एकच पेग सर्व्ह करायचा. मग जास्त पैसे दिले तरी दुसरा पेग दिला जायचा नाही. उद्देश एकच, त्या खडतर रस्त्यावरून जाताना प्रवाशाला मद्यामुळे अपघात होऊ नये. वानाकाच्या दिशेने जाणाऱया प्रवाशाला दोन पेग ‘मंजूर’ केले जात. तो शक्यतो महिलांना मद्य देत नसे.
आता काळ बदलला. उत्तम गाडय़ा आल्या. त्यामुळे नागमोडी वळणाची दंश करण्याची ताकद कमी झाली. हॉटेलने पण कात टाकलीय. हेरिटेज इमारतीच्या जुन्या वैभवाला किंचितही धक्के न लावता. नवी उभारणी केली गेली. बार, जेवणाची जागा, खोल्या वाढवल्या गेल्या. आम्ही तिथे गेलो तेव्हा सकाळी अकरा वाजता क्वीन्सलँडला, नागमोडी वळणावरून जाणारी मंडळीही बीयर, जीन पीत बसली होती. ब्रेकफास्टबरोबर मद्य ही माझी कनसेप्ट नाही. त्यामुळे आम्ही तसेच निघालो. ती ऐतिहासिक वाट पाहून चढलेली नशा पुरेशी हाती. आम्ही फोटो काढले. कुठल्याही पबपेक्षा न्यूझीलंडमध्ये सर्वात जास्त फोटो हॉटेलचे निघतात.
























































