
>> द्वारकानाथ संझगिरी, [email protected]
‘लेस्टर’ हे इंग्लंडमधलं शहर मला अचानक जादू होऊन स्मार्ट झालेलं बलसाड, भरूच किंवा गुजरातेतलं शहर वाटलंय. अनेकदा तिथल्या गुजराती मित्रांबरोबर मी धमाल केलीय, त्यांच्याबरोबर राहिलोय. त्यांच्या मेल्टन रोडवरून फिरलोय. मेल्टन रोडचं नाव बदलून अजून महात्मा गांधी रोड कसं झालं नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. असो. उद्या त्याचं नामकरण अमित शहा रोड होऊ शकतं (देवाला आणि अमित शहाला काहीही अशक्य नाही असं आज मानलं जातं). एखादा गोरा माणूस त्या रस्त्यावरून दिसला की, मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी दिसल्यावर आमच्या नजरा वळायच्या तशा आपल्या नजरा वळतात आणि चेहऱयावर उद्गार लिहिलेले असतात, ‘‘अरे, हा कुठे रस्ता चुकला!’’ १९७२ साली जेव्हा युगांडाच्या इदी अमीनने हिंदुस्थानीयांना देश सोडून जायला भाग पाडले तेव्हा निर्वासित होऊन गुजराती समाज इंग्लंडमध्ये आला. त्यातल्या अनेकांना लेस्टरमध्ये वसवलं गेलं. या मंडळींच्या रक्तातच धंद्याच्या पेशी असल्यामुळे इंग्रजीशी फारसा जवळचा संबंध नसताना त्यांनी घरे उभारली, दुकाने थाटली आणि तिथले गोरे निर्वासित वाटायला लागले. रेल्वे स्टेशनच्या पाटीवर लख्खपणे गुजरातीत ‘लेस्टर’ असं लिहिलंय. लेस्टरमध्ये गुजराती समाजाने गांधीजींची ‘चले जाव’ची चळवळ खूप पुढे नेली. ते पाहताना मनाला मस्त गुदगुल्या होत असत.
पण तरीही लेस्टर हे पाहायला जायचं शहर नव्हतं. यावेळी मी तिथे गप्पांच्या मैफलीच्या निमित्ताने गेलो आणि एक वेगळं लेस्टर पाहिलं. त्याबद्दल नव्यानेच झालेल्या, पण मनात रुतलेल्या संतोष देशपांडेचे आणि त्याच्या बायकोचे – सुप्रियाचे – आभार मानायला हवेत. हा उदगीरचा स्कॉलर (बोर्डात वगैरे आलाय) मुंबईतल्या यूडीसीटीमधून केमिकल इंजिनीअर वगैरे झाला, इंग्लंडला गेला, पण मराठी मुळं विसरला नाही. तिथे ‘गमभन’ अशी संस्था त्याने काढली, अगदी अलीकडे एप्रिल २०१७ मध्ये वगैरे! सुरुवात त्याने लेस्टरमधल्या, इंग्लंडमध्ये मराठी आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या चार मुलांना मराठी शिकवून केली. एक बीज फेकलं तिथल्या घरात मराठी रुजवण्याचं! सवा वर्षात झाड मस्त वाढतंय. आता पाचची पन्नास मुलं झाली. आठवडय़ातून एकदा तो लेस्टरला त्याच्या घरी आणि नॉटिंगहॅमला मराठी भाषा, संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करतो. बीज टाकलं की, माळय़ाचं काम संपत नाही. ते सुरू होतं. मग खतपाणी टाकणं आलं. तरच रोपटं वाढतं. त्याला पैसे लागतात. तो हे पैसे स्वतः टाकतो. सोपी नाही हो ही गोष्ट इंग्लंडमध्ये! स्वतःसाठी प्रचंड मेहनत करून कमवावं लागतं आणि मग त्याच भाकरीतला एक चतकोर समाजासाठी ठेवावा लागतो. त्याचबरोबर ‘वेळ देणे’ ही गोष्टही महत्त्वाचीच. कधी एकदा शनिवार-रविवार येतो आणि आराम करतो, आऊटिंगला जातो असं वाटणारी जोडपी तिथे खूप असतात. बरं, पारंपरिक फळा-खडू पद्धतीने ही शिकवणी नसते. मुलांना गोष्टी सांगितल्या जातात, त्यांच्याकडून बालगीते गाऊन घेतली जातात. याबाबतीत त्यांना वैभवी देशपांडे-फडणीस या गायिकेची मदत होते.
संतोषची आणखी एक गोष्ट मला आवडली. त्याचा विज्ञानाकडे पाहण्याचा आणि एकंदरीतच उदारमतवादी दृष्टिकोन! तो या मुलांना गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध प्रदर्शनांना घेऊन जातो, निसर्गाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी सहली काढतो. मुख्य म्हणजे ईस्टर, ख्रिसमससारखे सण साजरे करतो. दुसऱया संस्कृतीचा द्वेष न करता आपली संस्कृती टिकवणं यात वाईट काहीच नाही. इंग्लंडमध्ये जन्म घेणारी, वाढणारी गुजराती मुलं मस्त गुजराती बोलतात. त्यांच्या घरात हे बाळकडू मिळतं. मराठी मुलांबद्दल तसं मी अगदी छातीठोकपणे सांगू शकत नाही, पण ही अशा संस्कारांची बाग लेस्टर शहराच्या सीमारेषेच्या आसपास अत्यंत निसर्गरम्य अशा फ्लेकनी गावात तो फुलवण्याचा प्रयत्न करतोय. उच्चविद्याविभूषित अनेक मराठी पाल्य त्याला मदत करतायत. संतोषची बायको सुप्रिया हिची त्याला या कामात मोलाची मदत होत आहे. मी जगात नसेन, पण असे प्रयत्न झाले तर लेस्टर स्टेशनच्या पाटीवर अजून २० वर्षांनी मराठीत ‘लेस्टर’ लिहिलं गेल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. तेव्हा माझ्या मनाला आजच्यापेक्षा जास्त गुदगुल्या होतील.
तिथे रविवारी मी वरस्टॉल या आणखी देखण्या गावात ५०-६० मराठी माणसांच्या मैफलीत गप्पा मारल्या. लेस्टर नावाच्या पॉश ‘बलसाड’च्या बाहेर आल्यावर मला कळलं की, कंट्रीसाईड काय आहे! देवाने एक निसर्गचित्र तयार केलं. त्यात हिरव्यासकट अनेक रंग भरले आणि ते घर, रस्त्यांनी सजवायला ब्रिटिशांना दिलं. त्यांनी आर्ट गॅलरीत मानाने बसावं असं पेंटिंग केलं. ही पेटिंग्ज पाहणं हा वेगळाच आनंद आहे.
सोमवारी सकाळी संतोष मला फॉक्स्टन लॉक्सला घेऊन गेला. ‘फॉक्स्टन लॉक्स?’ ही प्रश्नार्थक आठी माझ्या कपाळावर होती. मात्र तिथून निघताना एक वेगळा अनुभव मिळाल्याचा आनंद माझ्या चेहऱयावरून ओसंडत होता. थोडक्यात सांगायचं तर तिथे बोटी पाण्याच्या पायऱया चढतात. दोन जिने चार पायऱयांचे. नाही कळलं? गोंधळलात? ठीक आहे. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो.
बेंजामिन बेव्हन नावाच्या बुद्धिमान माणसाने हा उद्योग केला आणि फॉक्स्टन या लेस्टरशायरमधल्या गावात त्याची उभारणी 1810 मध्ये झाली. पूर्वी रेल्वे, रस्ते नसताना तिथे वाहतूक कालव्यातून व्हायची, पण मग चढ-उताराचं काय करणार? सर्व खोदून सपाट करणं शक्य नसतं. मग बोट चढणीवर कशी चढवणार? त्यासाठी हा मार्ग शोधला. पदार्थ विज्ञान आणि मेकॅनिक्सचा सुंदर वापर केलाय. लॉक म्हणजे गेट तयार करून वेगवेगळय़ा स्तरांवर कम्पार्टमेंट तयार केली आहेत. वर चढताना बोट एका कम्पार्टमेंटमध्ये उभी राहते. त्यात पाणी भरले जाते. वरच्या कम्पार्टमेंटच्या पाण्याच्या पातळीपर्यंत पाणी आलं की, गेट उघडतं. बोट एक जिना चढून वर येते. पुन्हा मग पुढचा जिना! उतरताना उलट प्रक्रिया. कम्पार्टमेंटमधून पाणी बाहेर काढायचं, पाण्याची पातळी खाली आणायची की, बोट एक जिना उतरली. अशा काही बोटी मी पाच जिने चढताना आणि उतरताना पाहिल्या. पाण्याचा एक कृत्रिम तलाव बनवलाय. त्यात पाणी साठवलं जातं आणि त्यातून घेतलं जातं. दरवाजे अजस्र वाटतात, पण यांत्रिकीकरण असं आहे की, एक स्त्राr आरामात सर्व हे ऑपरेशन करून बोट चढवत घेऊन चालली होती. 82 मैल लांबीचा पनामा कालवा पॅसिफिक आणि ऍटलांटिक महासागराला जोडतो. तिथे खोदकाम कमी करण्यासाठी चढण चढताना किंवा उतरताना हेच तंत्रज्ञान वापरलंय हुशार ब्रिटिशांनी. फॉक्स्टनला टुरिस्ट स्पॉट करून मस्तपैकी पर्यटकांना विकलंय. एक म्युझियम, एक पब, एक कॉफी स्टॉल, बोटिंगची सोय. त्यामुळे तिथे एक दिवस सहज काढता येतो. संतोष मला रग्बी स्टेशनवर सोडायला आला तेव्हा एक वेगळं लेस्टर, एक वेगळा माणूस, एक वेगळा यांत्रिकी अनुभव पाहिल्याचं समाधान घेऊन मी परतलो.



























































