लेख – शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. गजानन एकबोटे

शिक्षणामुळे परिवर्तन होते, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचे सूत्र आहे. समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन या जगात नाही. कारण शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाढ श्रद्धा होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता असल्याची जाणीवही डॉ. आंबेडकर यांना होती. ‘व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देते, स्वाभिमानाने जगायला शिकविते ते शिक्षण’ अशी शिक्षणाची व्याख्या ते करीत असत.

ज्ञान म्हणजे व्यक्तीच्या जीवनाचा पाया होय. म्हणून प्रत्येकाने बुद्धीचा विकास करण्यासाठी हालअपेष्टा सहन करून शिक्षण मिळवले पाहिजे आणि ज्ञानाच्या बळावर स्वतंत्रपणे विचार करावयास शिकले पाहिजे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. बुद्धीचा विकास करणे आणि शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. शिक्षणामुळे तो विकास साधता येतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर देशातील दलित समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि शिक्षणासाठी लढा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1913 मध्ये कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी गेले होते. हिंदुस्थानातील सामाजिक परिस्थिती आणि अमेरिकेतील सामाजिक परिस्थितीमधील फरक पाहता त्यांना हिंदुस्थानातील वंचित आणि पीडितांच्या आयुष्यात शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे कळले. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात असा उल्लेख केला की, ‘‘पालक मुलांच्या जन्माचे साथी आहेत, कर्माचे नव्हे, या संकल्पनेचा आता त्याग केला पाहिजे.’’ अशी जाणीव करून देताना पुढे ‘‘पालक मनात आणतील तर ते आपल्या मुलांचे भवितव्य साकारू शकतात. मुलांच्या शिक्षणाबरोबर आपल्या मुलींच्या शिक्षणाचाही तेवढय़ाच गंभीरतेने विचार करावा आणि त्यानुसार कृती करावी.’’ पुढे याच पत्रात शेक्सपियरच्या एका इंग्रजी नाटकातील वाक्य उद्धृत करून बाबासाहेब म्हणतात की, ‘प्रत्येक माणसाच्या जीवनात जेव्हा संधी येते, तेव्हा तो माणूस त्यावर आरूढ झाला तर तो समृद्धीच्या मार्गावर जातो, परंतु त्याने जीवनाच्या प्रगतीचा मार्ग त्यागला तर माणसाच्या वाटय़ाला दुःखच येणार. वंचितांच्या आणि पीडितांच्या जीवनात आलेली शिक्षणाची संधी त्यांनी न गमावता शिक्षण घेऊन ज्ञानी झाले पाहिजे. त्यासाठी येईल ते दुःख सहन करावयास पाहिजे ’, असाही सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर देतात.

शिक्षणाविना माणूस विकासाच्या प्रत्येक आघाडीवर मागेच राहिला आहे, परंतु शिक्षणामुळे त्यांच्याही आयुष्यात क्रांती होईल आणि प्रस्थापित समाजात मान उंचावून तो स्वाभिमानाने जगू शकेल, अशी आशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. त्यामुळे त्यांच्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘‘शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भौतिक लाभ आहे. त्याकरिता आम्ही तीव्र संघर्षासाठी तयार आहोत. त्यासाठी आम्ही कोणत्याही भौतिक लाभाचा त्याग करू शकतो, पण कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षणाचा अधिकार आणि संधी यांच्या महत्तम उपयोगाच्या हक्कांचा आम्ही त्याग करण्यास तयार नाही. आता दलितांना जाणवले आहे की, शिक्षणाशिवाय त्यांचे अस्तित्वच सुरक्षित नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता येणार नाही.’’

शिक्षणामुळे परिवर्तन होते, हे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचे सूत्र आहे. समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन या जगात नाही. कारण शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाढ श्रद्धा होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या मूल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता असल्याची जाणीवही डॉ. आंबेडकर यांना होती. ‘व्यक्तीला स्वतःची जाणीव करून देते, स्वाभिमानाने जगायला शिकविते ते शिक्षण’ अशी शिक्षणाची व्याख्या ते करीत असत.

उच्च शिक्षणाचे महत्त्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वानुभवाने उच्च शिक्षणाचे किती महत्त्व आहे ते मिलिंद महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून सांगतात,‘‘हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे जीवनात शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. दलित समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे सांगण्यात येते, पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र्ा, निवाऱयाची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. ज्यामुळे दलित समाजाची प्रगती खुंटून त्यांना दुसऱयांचे गुलाम व्हावे लागते, तो न्यूनगंड त्यांच्या जीवनातून नाहीसा करणे, चालू समाज पद्धतीमुळे जे त्यांचे जीवन लुबाडण्यात आले आहे, त्यांच्या जीवनात उच्च शिक्षणाचे काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसारानेच हे साध्य होणार आहे. प्रस्थापित समाज व्यवस्थेमुळे विकृतपणे लुबाडण्यात आलेल्यांच्या जीवनात उच्च शिक्षणाचे काय महत्त्व आहे, तसेच राष्ट्राच्या उभारणीसाठी त्याची आवश्यकता काय, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानातून स्पष्ट होते. डॉ. आंबेडकरांच्या मते, शिक्षण म्हणजे व्यक्तीचा मानसिक व बौद्धिक विकास करून आणणारे, सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे, आर्थिक विकास साधण्याचे व राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याचे शस्त्र्ा आहे. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विद्येची चोवीस तास साधना करावी लागेल. कारण विद्या ही एखाद्या महासागरासारखी आहे. विद्येची ही साधना यशस्वी झाली, तर माणूस जगाच्या पाठीवर आपली कीर्ती पसरवू शकतो. डॉ. आंबेडकर ज्ञानाची चोवीस तास पूजा करीत असत. त्यामुळेच ज्या ठिकाणी कार्ल मार्क्स, मॅझिनी, लेनिन, सावरकर इ. थोर व्यक्तींनी संशोधनाचे कार्य केले, त्या लंडन म्युझियममध्ये त्यांना खुल्या वातावरणात शिक्षण घेता आले. असेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडावे, शिक्षण सर्वांना अवगत व्हावे, अशी अपेक्षा डॉ. आंबेडकर बाळगत होते. शिक्षणानेच सामाजिक परिवर्तन घडून येते, यावर त्यांचा विश्वास होता. व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो, व्यक्ती आत्मनिर्भर होते.

शिक्षणक्षेत्र खऱया अर्थाने स्वतंत्र व स्वायत्त हवे असेल तर या क्षेत्रावर व्यक्तिसत्ता असणे धोक्याचे आहे, हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा आजही तंतोतंत लागू पडतो. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱया बऱयाच व्यक्तींना शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचे ध्येय कोणते किंवा शिक्षणाच्या पद्धती कोणत्या याचे पूर्णतः ज्ञान असतेच असे नाही. याची चर्चा करताना अपात्र लोकांचा भरणा शिक्षणक्षेत्रात कसा झाला आहे आणि त्यामुळे बारभाईचा कारभार कसा सोकावला आहे याचे अत्यंत मार्मिक व स्पह्टक असे चित्र डॉ. बाबासाहेबांनी रेखाटले आहे. त्याअनुषंगाने आपली जळजळीत प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. ही बाब, रस्ते बांधणे, गटार साफ करणे वगैरे बाबींपेक्षा निराळ्या प्रकारची आहे. शिक्षणक्षेत्रातल्या शूचितेवर व नीतिमत्तेवर भर देताना प्रांतिक स्वायत्तता मागा आणि राष्ट्रीय दृष्टीने शिक्षणाचे धोरण ठरवा, आमची त्याला हरकत नाही, परंतु शिक्षणामध्ये एकसूत्रीपणा असला पाहिजे. शाळांचा कारभार शिस्तीने चालला पाहिजे आणि शिक्षण चोख दिले पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला. शिक्षणक्षेत्रात सूत्रमयता तर असावीच, पण शिक्षणक्षेत्राला स्वतंत्र प्रतिष्ठा असावी. त्यासाठी शिक्षणक्षेत्राबाहेरील म्हणजे शिक्षणक्षेत्राशी संबंध नसणाऱया व्यक्तींचा या क्षेत्रात शिरकाव नसावा, असे त्यांनी निःसंदिग्धपणे प्रतिपादन केले आहे.
शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची श्रद्धा होती. शिक्षण हा एकूणच मानवी जीवनाचा पायाभूत संस्कार आहे आणि शाळा हे संस्कार पेंद्र आहे. थोर समाजचिंतकांनी विद्येला, ज्ञानाला महत्त्व का दिले याचे इंगित हेच आहे. विद्या जीवनाला वळण देते, सुधारते. विद्येची वाढ होणे सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचे लोकहितवादींनी प्रतिपादिले होते. नव्या ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी प्राचीन व्यवस्थेची चिकित्सा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. आगरकर नव्या ज्ञानक्षेत्रासाठी व्यक्तिजाणिवांना प्राधान्य देत होते, तर महात्मा जोतीराव फुले यांनी ‘‘विद्येविना मती गेली’’ असे विद्येचे महत्त्व प्रतिपादून अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे, असे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील शिक्षणाकडे, ज्ञानाकडे व्यक्तिविकासाचे सोपान म्हणून पाहतात. शिक्षण हे परिवर्तनाचे, स्वतःची जाणीव करून देणारे, न्यूनगंड नाहीसे करणारे महत्त्वाचे साधन आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रहाने प्रतिपादन करीत असत.

(लेखक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत)