निमित्त : ललित कला केंद्राची ‘नववर्ष भेट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. गजानन शेपाळ

आपल्या देशाला पुरातन काळापासून कलेची समृद्ध परंपरा आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक राज्याचीदेखील स्वतंत्र समृद्ध कलाविषयक ओळख आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य शिरोभागी आहे. महाराष्ट्राला जगप्रसिद्ध वेरुळ – अजिंठय़ासह गड-किल्ल्यांची आणि ऐतिहासिक वास्तुनिर्मितीसह नैसर्गिक निर्मितीच्या अद्भुत घटनांचाही प्रचंड व प्रगल्भ वारसा आहे. गेली अनेक वर्षे म्हणजे तब्बल 40 वर्षांपासून एक खंतदायक संघर्षदेखील याच महाराष्ट्राच्या आधुनिक कलापरंपरा चालविणाऱ्या पिढीने पाहिलेला होता. ज्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

ललित कला अकादमी नवी दिल्लीचे चेअरमन पदाची धुरा अत्यंत खंबीरपणे, जबाबदारीने सांभाळणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचारणे यांनी माहिती दिली की, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुणे येथील पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील सुमारे 15 एकर जागा ही महाराष्ट्रासाठीच्या विभागीय ललित कला केंद्रास उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. या सरकारचे फार मोठे बळ या ऐतिहासिक निर्णयाला लाभले. या साऱ्यांचे आभार मानताना शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांचा कंठ दाटलेला होता.

भूतकाळातील काही कटू आठवणी सांगतानाच ते म्हणाले की, बॉम्बे आर्ट सोसायटी म्हणजे नव्याने ‘मुंबई’ हे नाव धारण करून विविध कला उपक्रमांसाठी उत्साह दाखविणाऱ्या या सोसायटीचे तीन टर्मपर्यंत चेअरमन आणि सदस्य म्हणून काम करीत असताना महाराष्ट्रासाठी विभागीय ललित कला केंद्र नवी दिल्लीहून आणता यावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. महाराष्ट्राच्या सर्व पिढीतील कलाकारांनी या संघर्षाला पाठबळ दिलेले असायचे. त्या त्या वेळच्या मायबाप सरकारांनी जमिनी दाखवल्या, परंतु प्रत्यक्ष देण्यास कधी तयारी दाखवली नव्हती.

75 वर्षांच्या अमृत महोत्सवी वर्षात केंद्र सरकारकडे डॉ. पाचरणे यांनी या विभागीय केंद्रास, महाराष्ट्रासाठी मागणी केली होती. जी ते सातत्याने गेली तीन वर्षे करीत होते. त्यांच्या विनंतीवर सकारात्मक विचार करून केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी हिरवा केंदील दाखवला. आता या मंजुरीनंतर प्रशासकीय औपचारिकता लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती डॉ. पाचरणे यांनी दिली.

या सुमारे 15 एकर जागेत अगोदरचीच सुमारे 50 हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेली इमारत आहे. या विस्तीर्ण परिसरात विविध कला प्रकारांचे स्टुडिओ, वर्कशॉप्स, सेमिनार्स, कलाविषयक प्रात्यक्षिके आणि महाराष्ट्रातील जुन्या-नव्या पिढीतील दृश्य कलाकार मंडळींच्या कलाप्रज्ञेची देवाणघेवाण होईल. ललित कला अकादमी नवी दिल्लीच्या विभागीय केंद्रास महाराष्ट्राला जागा नव्हती, म्हणून मंजुरी मिळत नव्हती. हे जरी सत्य होते तरी सकारात्मक अधिकारी नवी दिल्लीलादेखील असायला हवा होता. ती वेळ, डॉ. उत्तम पाचरणे यांच्या रूपाने साधली होती. इकडे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या बरोबर बैठकीचे सूत्र सुरूच होते. जेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तेव्हाच स्पृहनीय कार्य प्रत्यक्षात उतरत असते. डॉ. पाचरणे म्हणाले की, ‘या ललित कला केंद्रामुळे सांस्कृतिकता टिकविण्याचे आणि तिची वृद्धी करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील कलाकारांच्या सर्व पिढ्यांची आहे. या साऱ्या कलाकारांच्या कल्पनाशक्तींचा, कलाविषयक विचारांना जमीन देणाऱ्या या सरकारकडून आता पाठिंबाही मिळेल, त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्र सरकारचे नाव कला इतिहासात कोरले जाईल.

अमृत महोत्सवी हिंदुस्थानाने याच 75 वर्षांचे औचित्य साधून केंद्र सरकारने जणू अमृत ओतण्याचेच कार्य, महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक पिढीसाठी केले आहे. महाराष्ट्राच्या या ललित कला विभागीय केंद्रामुळे या शतकातील कला इतिहासात मौलिक नोंद झाली, अशी प्रत्येक दृश्य कलाकाराची भावना राहील, अशीच ही घटना आहे.

(लेखक सर जे. जे. उपयोजित कला महावि.चे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत.)

– [email protected]