काव्यरसग्रहण – ऐकावे जनांचे, पण करावे मनाचे

>> गुरुनाथ तेंडुलकर

इसापनीती’मधली ही गोष्ट तुम्हाला नक्कीच माहीत असेल.

एक कुंभार आपल्या बायको आणि मुलाला घेऊन गावच्या बाजारात गेला होता. बाजारात त्यांनी बरीच खरेदी केली आणि शेवटी एक गाढवदेखील विकत घेतलं. परत येताना सगळं सामान गाढवावर लादून कुंभार गाढवावर बसला. त्या वेळी आजूबाजूचे लोक म्हणू लागले, “एवढा धडधाकट माणूस गाढवावर बसलाय आणि बायकोला अन् मुलाला पायी चालवतोय.’’ लोकांचं ऐकून कुंभार गाढवावरून उतरला आणि बायकोला गाढवावर बसवलं. त्या वेळी लोक म्हणू लागले की, “काय आगाऊ बाई आहे बघा! नवऱयाला आणि मुलाला पायी चालवून स्वतः ऐटीत गाढवावर बसलीय.’’ मुलाला बसवलं तर लोक म्हणू लागले की, “आई-बापाला पायी चालवून हा तरुण मुलगा गाढवावर बसलाय. काहीच शिस्त नाही हो हल्लीच्या मुलांना!’’ त्यानंतर तिघंही गाढवावर बसले तर लोक म्हणू लागले की, “बघा, त्या मुक्या प्राण्याचे किती हाल करताहेत ही माणसं!’’

ही गोष्ट तुम्हाला नक्कीच ठाऊक आहे. गोष्टीचं तात्पर्यदेखील आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. तरीही आपण आपल्या दैनंदिन वर्तनाचा विचार केला तर बहुसंख्य वेळा आपलं वर्तन हे केवळ ‘लोक काय म्हणतील?’ याचा विचार करूनच केलं जातं.

मोठय़ा गोष्टी सोडाच, अगदी लहानसहान गोष्टींच्या बाबतीतही हाच प्रकार घडतो. एखाद्या मिरवणुकीत ढोलताशाच्या तालावर नाचावंसं वाटतं, पण आपलं पद, प्रतिष्ठा आणि शिष्टाचार आड येतात. होळीच्या सणात मुलांत मूल होऊन रंगपंचमी खेळावीशी वाटते. उन्हाळय़ाच्या दिवसांत शाळेच्या बाहेर मिळणारा बर्फाचा रंगीत गोळा चोखून खावा अशी इच्छा होते, पण मनात प्रश्न उभा राहतो, लोक काय म्हणतील?

केवळ लोकांचा विचार केल्यानं आयुष्यातील अनेक छोटय़ा-मोठय़ा आनंदापासून आपण वंचित राहतो. अनेक छंद जोपासायचे राहून जातात. कराव्याशा वाटणाऱया अनेक गोष्टी करायच्या राहूनच जातात.

हिंदीत एक म्हण आहे, ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?’

म्हणूनच लोकांचा फार विचार न करता आपण आपल्याला हवं तसं जगण्याचा प्रयत्न करून आपलं आयुष्य आनंदानं व्यतीत करावं हे सांगणारी आजची कविता ‘आपण आपलं लिहीत राहावं’. या कवितेचे कवी आहेत, सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळचे डॉ. सुधाकर बाबाजी ठाकूर. ते म्हणतात,

‘आपण आपलं लिहीत राहावं, कुणी वाचोत न वाचोत’

आपल्या कामाची कुणी नोंद घ्यावी, कुणी आपल्याला चांगलं म्हणावं किंवा आपण अमुक एक केलं तर लोक आपल्याला नावं ठेवतील याची तमा न बाळगता ‘ऐकावे जनांचे, पण करावे मनाचे’ हे सूत्र ध्यानात ठेवून वागावं.

जागतिक कीर्तीच्या महापुरुषांच्या जीवनचरित्रात डोकावून पाहिलं तर त्या सर्वांनी मळलेल्या वाटेवरून न चालता स्वतःच्या मनाला वाटेल त्या मार्गाने प्रवास केला. स्वतःचा मार्ग स्वतः शोधला. स्वतःचा रस्ता स्वतः तयार केला. हा मार्ग तयार करताना लोक काय म्हणतील याचा फारसा विचार केला नाही.
म्हणूनच लोकांचा विचार करून स्वतःचं आयुष्य चाकोरीबद्ध जगायचं की, मनाला योग्य वाटेल तसं जगून आयुष्याची आनंदयात्रा बनवायची हे आपलं आपण ठरवायचं.

आपण आपलं लिहीत राहावं
आपण आपलं लिहीत राहावं
कुणी वाचोत न वाचोत
काही जण वाचतीलही थोडे
वाचल्यानंतर विसरून जातील बरेचसे तरीही आपण लिहीत राहावं आणि रितं-रितं होत राहावं
साचलेलं थोडं पाणी वाहू द्यावं आणि नवीनासाठी जागा तयार करावी
आपण लिहितो आपल्यासाठी
आपलं तसं देणंघेणं कुणाशी नाहीच
आपलेच श्वास मोजावेत आपण आणि त्यांचा बिचूक हिशेबही ठेवावा आपण
चुकलेल्या प्रत्येक श्वासागणिक अस्वस्थ व्हावं आपण
आणि आपल्यालाच जाब विचारावा आपण
वाऱयाच्या दिशेने आपण कधी जाऊ नये
शीड फाटली नौका घेऊन वादळात भरकटावं आपण
आणि शक्य झालंच तर जलसमाधीचा आनंदही लुटावा आपण…
दिशांच्या शोधार्थ कोलंबस होऊन फिरावं आपण आणि सप्तषन्ना साक्षी ठेवून ध्रुवाचा शोध घ्यावा आपण
शेवटचा दिवा विझण्याआधी एक दिवा पेटवून
मंदपणे जळत राहावं आपण
कुण्या आंधळ्याला दिसो न दिसो

माफीनामा
कवी : डॉ. सुधाकर ठाकूर
प्रकाशक : संवेदना प्रकाशन,
मूल्य : रुपये 125/-