प्लेलिस्ट – लेस इज मोअर

>> हर्षवर्धन दातार

एखाद्या गाण्याला वाद्यमेळाची साथ असेल तर ते गाणं सुरेल होतं, मनाला भावतं. मात्र भावपूर्ण शब्द आणि हृद्य भावना असलेली अनेक गाणी ही वाद्यमेळाशिवाय आपल्या मनात एक अस्थान मिळवतात. प्रसंगानुसार शब्द, भाव व अभिव्यक्तीला महत्त्व देत कमी वाद्यंच्या साथीने अजरामर झालेली काही गाणी.

सुरुवातीच्या काळात एक पेटी, तबला, ढोलकी आणि फार तर बासरी यांच्या साथीने गाणी तयार व्हायची. कधी कधी भांड किंवा माठावर ठेका धरला जायचा. डफ, तुणतुणे, रावण हत्ता असायचे. नौशाद यांच्या संगीतात आपल्याला मटका ठेका ऐकायला येतो. पुसतार, सरोद, संतूर, गिटारसारखी तारवाद्यं आणि मग पाश्चात्त्य संगीताच्या प्रभावामुळे सॅक्सोफोन, ट्रंपेट क्लॅरिनेटसारखी फुंकवाद्यं जोडली गेली. 70च्या दशकात तर भव्य वाद्यमेळ हा भारदस्त संगीताचा निकष झाला. तरीही प्रसंगानुसार जिथे शब्द, भाव व अभिव्यक्ती याला महत्त्व होते तिथे वाद्यमेळ गरजेपुरताच वापरला गेला. एखाद्या गाण्याला वाद्यमेळाची साथ असेल तर ते गाणं सुरेल होतं, मनाला भावतं. मात्र भावपूर्ण शब्द आणि हृद्य भावना असलेली अनेक गाणी ही वाद्यमेळाशिवाय आपल्या मनात एक स्थान मिळवतात. कमीत कमी वाद्यमेळ असली आणखी काही गाणी बघूया.

‘लाल किला’ (1960) हा दिल्ली तख्तावरचा शेवटचा मुघल बादशाह बहादूरशहा जफर याच्या कारकीर्दीवरचा चित्रपट. रफीने एका राजाची कैफियत मांडली आहे… ‘ना किसी की आंख का नूर हूं’ या गाण्यातून. संगीतकार एस. एन. त्रिपाठींनी सुंदर चाल लावली आहे. शांततेचा आवाज गूढ करताना वाद्ये नाहीत, ठेका पण नाही आणि त्यामुळे ते दुःख आपल्यापर्यंत पोहोचतं. ही नज्म कुणी लिहिली यावर थोडी चर्चा झाली. आधी बहादूरशहा जफरचं नाव होतं, पण अलीकडेच शायर, गीतकार आणि चित्रकर्मी जावेद अख्तरनी भाष्य केलं की, ही नज्म त्यांचे आजोबा आणि जान निसार अख्तरचे वालीद मुजतर खैराबादी यांनी लिहिली आहे. कुणी का लिहिली असेना, आहे अप्रतिम आणि हृदय हेलावणारी. याच चित्रपटात स्वत बहादूरशहा जफर यांची ‘लगता नही है दिल मेरा उजाड दयार में’ ही रफींनी गायलेली अतिशय दर्दभरी गजल आहे. त्याला चाल आहे, मात्र साथीला फक्त पेटी. देशापासून दूर बर्मामध्ये नजरकैदेत आणि शेवटी तिथेच मृत्यू आणि दफन नशिबी आलेल्या या शेवटच्या मुघल बादशाहची कैफियत, वेदना या गीतातून व्यक्त झाली आहे.

बिमा राय यांचा ‘बंदिनी’ हा एक लँडमार्क चित्रपट. खुनाच्या आरोपाबद्दल कैदेत शिक्षा भोगत असलेली कल्याणी (नूतन), अशोक कुमार आणि धर्मेंद्र यांच्या संस्मरणीय भूमिका आणि सचिन देव बर्मन यांच्या संगीताकरिता 60च्या दशकाता लक्षात राहिलेला चित्रपट. यात आशा भोसले यांचं ‘अब के बरस भेज भैया को बाबुल’ हे एका बहिणीचे कैदेत असून आपल्या माहेरचं मनोगत व्यक्त करणारं भावपूर्ण गीत. साथीला फक्त तबला आणि व्हायब्रोफोन. केवळ तीन मिनिटांत बालपण, माहेरचं प्रेम आणि नंतर आलेला विरह… इतकं मोठं विश्व नजरेसमोर तरळतं. हे गाण ध्वनिमुद्रित करताना आशाताईंच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. यातांच धान्य पाखडण्याचं सूप आणि बासरी यांच्या साथीने ‘ओ पंछी प्यारे’ हे पारंपरिक चाल असलेलं गीत. बाहेर स्वतंत्र पक्षी आणि गाणं म्हणणारी बंदिवान स्त्राr. या दोन्ही गीतांतून आपल्या बालपणात बघितलेलं, अनुभवलेलं गावाकडचं विश्व गीतकार कविराज शैलेंद्र आपल्या शब्दांत रंगवतात.

‘बाजार’ (1982) गरजू आणि हलाखीच्या परिस्थितीतील पालकांनी आपल्या मुलीचा लग्नाच्या बाजारात केलेला व्यवहार या विषयावर बेतलेला आणि चोखंदळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला मुस्लिम सामाजिक आणि संगीतप्रधान चित्रपट. त्याचं श्रेय हे ताकदीचे कलाकार, दिग्दर्शक सागर सरहदी आणि संगीतकार खय्याम यांना. सलीमच्या (नासिरुद्दीन शहा) नजमाबद्दलच्या (स्मिता पाटील) आठवणीत भिजलेली ‘करोगे याद तो बहोत याद आयेगी’ ही संतूर, बासरी आणि गिटार या केवळ तीन वाद्यांवर पेललेली आणि भूपिंदर सिंगनी गायलेली बशर नवाज यांची गजल. त्यातली सुरावट आणि संतूरच्या सुरांनी केलेला शेवट आपल्या मनात कायमचं घर करून जातो. याच चित्रपटात शबनम (सुप्रिया पाठक) हिचा लग्नाच्या बाजारात ठरलेला व्यवहार आणि त्यामुळे तिची आणि सर्जू (फारूख शेख) या प्रेमी युगुलाची होणारी ताटातूट याला साक्षीदार ‘देख लो आज हमको जी भर के’ हे गीत. खय्याम यांच्या सहचारिणी आणि गायक जगजीत कौर यांचा उदास, पण आर्त आवाज आणि साथीला फक्त सनई, यामुळे चित्रपटाच्या सुन्न करणाऱया शेवटाला संपूर्ण न्याय मिळतो. ‘रजिया सुलतान’ (1982) यातलं ‘ऐ दिले नादान’ हे अत्यंत श्रवणीय गाणं. संतूर, एक तालवाद्य आणि व्हायोलिन साथीला घेऊन खय्याम यांनी लताजींच्या गायकीतून मरुभूमीच्या पार्श्वभूमीवर हिरवळीचा आभास निर्माण केला.

मतिमंद नायक मेहमूद आपल्या वडिलांच्या शेवटच्या घटकेला त्यांना आराम पडावा म्हणून ‘इलाही तू सुनले हमारी दुवा’ अशी देवापुढे विनवणी करतो ‘छोटे नवाब’ (1971) या चित्रपटात. राहुल देव बर्मननी या गाण्याला चाल दिली आहे, पण संगीत जवळ जवळ नाहीच. एका ठिकाणी ‘हमारी’ऐवजी ‘हमाली’ हा उच्चार ऐकू येतो. याच आरडींनी ‘किनारा’ (1977) चित्रपटात एक अप्रतिम संवादरूपी अतिशय संथ सुरातलं गाणं ‘एकही ख्वाब कई बार देखा है मैने’ दिलं आहे. भूपिंदरसिंग गाताना बॅकग्राऊंडला फक्त त्याचीच वाजवलेली गिटार आहे. ‘बालो से टपकता पानी’ या वाक्यात ‘टपकता’ शब्द एका पानापासून गळणाऱया थेंबासारखा लांबवला आहे. ‘खुशबू’मध्ये (1975) लग्न झालेली नायिका हेमामालिनी मानापमानाच्या गैरसमजुतीमुळे माहेरी राहिली आहे. तिचे दुःख ‘दो नैनो मे आंसू भरे है’ या गुलजार यांच्या गाण्यातून आणि आरडींच्या चालीतून व्यक्त होते. तबल्याच्या ठेक्यावर

रेकॉर्ड झालेले हे गाणे प्रसंगानुरूप नंतर फक्त बासरी आणि सरोदच्या साथीवर परत रेकॉर्ड केलं गेलं. वहिदा रेहमान अणि किशोर कुमारच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गर्लफ्रेंड’ (1960) चित्रपटात साहिर-हेमंत कुमार जोडीचं आणि किशोर-सुधा मल्होत्रांनी गायलेलं ‘कश्ती का खामोश सफर है’ हे अतिशय अवीट गोडीचं संवादात्मक आणि शांत, संथ आणि तरीही मिश्कील गाणं. झुळझुळ वाहतं पाणी आणि तसाच प्रवाहीपणा चालीत दिसतो. साथीला फक्त पियानो फ्लूट आणि व्हायोलिन. हेमंत कुमार यांचं संगीत आणि गूढ वातावरण यांचं अतूट नातं आहे, जे ‘बीस साल बाद’, ‘कोहरा’, ‘खामोशी’ या चित्रपटांतून दिसलं. ‘कोहरा’मधां हेमंत कुमार यांचं मोजकी वाद्यं असलेलं संगीत आणि आवाज या दोन्हीची जादू आपल्याला ‘ये नयन डरे डरे’मध्ये दिसते. ‘खामोशी’मधां गुलजार यांचं ‘मुख्तसर सी बात है’ या एका छोट्याशा विचाराने व्यापलेले ‘तुम्हारा इंतजार है’ हे गाणं केवळ माऊथ ऑर्गन आणि शिळेच्या साथीवर बेतलेलं.

नवीन गाण्यातसुद्धा या शैलीची उदाहरणे आहेत. ‘ओंकारा’मधील ‘ओ साथी रे, दिन डुबे ना’ हे शांत प्रकृतीचे फक्त गिटार आणि तबला साथीला घेऊन. ‘रंग दे बसंती’ यातलं ए. आर. रेहमाननी केलेलं ‘लुका छुपी बहुत हुयी’ आणि त्यांचंच ‘स्वदेस’मधलं सिंथेसाइझरवरचं ‘आहिस्ता आहिस्ता निंदिया तू आ’ हे अंगाई गीत आणि ‘तारे जमी पर’ यात इशानचे दुःख आणि हॉस्टेलमधला एकटेपणा दर्शवणारे ‘मैं कभी बतलाता नही’ ही काही ठळक गाणी.

हिंदी चित्रपट संगीतातले जुनेजाणते संगीतकार वाद्यमेळाच्या प्रत्येक भागात (उदा. रिदम, स्ट्रिंग, ब्रास, पर्कशन ) किती वाद्यं असावीत याबाबतीत नेहमीच काटेकोर होते. एक कमी नाही किंवा एक जास्त नाही हा नियम. कथेतील प्रसंगानुसार दिग्दर्शकाला शब्दातून आणि कलाकारांना पडद्यावरील अभिनयातून जे काही व्यक्त करायचे आहे त्याकरिता कमीत कमी वाद्यमेळ असावा, अर्थात ‘लेस इज मोअर’ याचे भान संगीतकारांनी राखले आणि अशी महान गाण्यांची निर्मिती झाली.
 [email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)