
>> ज्योत्स्ना गाडगीळ
‘थाप’ मारणारे अनेक भेटतील. मात्र ढोलकी, हलगीवर ‘थाप’ मारणारे हात पाठीवर कौतुकाची ‘थाप’ मिळवल्याशिवाय राहात नाहीत. असाच आहे एक उमदा तरुण कलाकार, जो स्वत:सह भावी पिढीतले शाहीर घडवतोय आणि समाजशिक्षण देतोय. त्याचे नाव आहे, शाहीर अजिंक्य लिंगायत.
योगदिनानिमित्त एक व्हिडीओ व्हायरल होत व्हॉट्स अॅपवर आला. तो व्हिडीओ होता, योगसाधनेचे महत्त्व सांगणाऱ्या पोवाड्याचा! पोवाड्यातल्या चाली, शब्द आणि संगीत ह्याची एवढी सुरेख गुंफण केली होती, की न राहवून त्या व्हिडीओच्या निर्मात्याचा शोध घेणे अनिवार्य झाले. शोधाअंती भेट झाली, संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारा युवा शाहीर अजिंक्य लिंगायत ह्याची!
घरातच शाहिरी परंपरा असल्यामुळे जन्मापासून अजिंक्यच्या कानावर ढोलकी, हलगी आणि झिलकऱ्यांचे आवाज पडत होते. अजिंक्यचे पणजोबा काशीनाथ तावरे पट्टीचे तबलजी होते. ते तुकडोजी महाराजांना साथ करत. त्यांच्याकडून ही परंपरा त्यांच्या मुलाकडे म्हणजेच अजिंक्यच्या आजोबांकडे आली. त्यांना शाहिरीत रस होता. न्हाव्याचा व्यवसाय सांभाळून त्यांनी शाहिरी कला आत्मसात केली आणि ठिकठिकाणी पोवाडागायन करून शाहीर अंबादास तावरे अशी ओळख मिळवली. ते राष्ट्रसंतांचे पोवाडे गात. सामाजिक विषयांवर पोवाड्यांची रचना करत. त्यांनी गायलेला दारूबंदीचा पोवाडा अतिशय गाजला. त्याच गुणवत्तेवर आजोबांना कामगार कल्याणमध्ये नोकरी लागली. तिथेही मेहनतीने मोठ्या अधिकारी पदापर्यंत मजल मारत ते निवृत्त झाले.
अजिंक्यला पालकांपेक्षा आजोबांचा जास्त लळा होता. त्यांच्या सहवासात राहून, त्यांच्याबरोबर कार्यक्रमांना जाऊन त्याच्यावर बालवयातच शाहिरी संस्कार झाले. त्याच्यातही आजोबांसारखा सभाधीटपणा आला. अजिंक्यला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून आजोबांनी पुण्यात त्याची रवानगी केली. तिथल्या मुख्य पुण्यतील मॉडर्न शाळा आणि निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी महाविद्यालयात त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. दरम्यान शाहिरीशी नाळ तुटू नये, म्हणून आजोबांनी लहानग्या अजिंक्यला सुटीच्या दिवसांत पुण्यातील प्रख्यात शाहीर हेमंतराजे मावळे ह्यांच्या शाहिरी शिबिरात पाठवले.
तलावातून मोठ्या सरोवरात गेलेल्या मासोळीप्रमाणे अजिंक्य लोककलेच्या सागरात मुक्त विहार करू लागला. त्याचे कार्यक्षेत्र विस्तारू लागले. त्याला शाहिरीतील प्रसिद्ध घराण्यांची ओळख होऊ लागली. शाहीर लहेरी हैदर-शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर गोकुळसिंह क्षत्रिय-शाहीर बाबुसिंह राजपुत, शाहीर नानिवडेकर-शाहीर हिंगे, शाहीर अमरशेख-शाहीर अण्णाभाऊ साठे-शाहीर आत्माराम पाटील, शाहीर खाडीलकर, शाहीर सिदराम अप्पा मुचाटे, शाहीर दीक्षित-शाहीर विभुते अशी मुख्य घराणी आणि त्यांची शैली कळली. पैकी शाहीर नानिवडेकर, शाहीर आत्माराम पाटील ह्यांची शैली अजिंक्यने आत्मसात केली आणि त्यानुसार नवनवीन रचना करून पोवाडे नव्या रंगात आणि नव्या ढंगात सादर केले. नवीन रचना प्रकाशित करण्याआधी तो आजही आपल्या गुरूंचे मार्गदर्शन घेतो. सामाजिक प्रश्नांवर पोवाड्यातून भाष्य करतो, त्यावर उपाय सुचवतो आणि समाज शिक्षणाला हातभार लावतो.
इयत्ता सहावीमध्ये अजिंक्यचे रंगमंचावर बालशाहीर म्हणून पदार्पण झाले. तरी, खरी शाहिरी उमगली ती 2011-12 मध्ये! प्रशासनातर्फे वीस दिवसांसाठी महाराष्ट्रव्यापी लोककला शिबीर घेण्यात आले. तिथे ठिकठिकाणच्या शाहिरांची ओळख झाली. शाहिरीचे अंतरंग उलगडले आणि शाहिरी हेच आता आपल्याा जीवनाचे ध्येय, असे त्याने ठरवून टाकले. तबल्याबरोबरच ढोलकीचेही प्रशिक्षण सुरू झाल्यामुळे शाहिरीची योग्य तऱ्हेने उमज त्याला येऊ लागली. शाहिरी साहित्याचा अभ्यास सुरू झाला. तसेच शासन प्रमाणित शाहिरी प्रशिक्षण प्रमाणपत्र मिळाल्याने `शाहीर’ अशी अधिकृत ओळख मिळाली.
दहावीनंतर संभाजीनगर येथे परतल्यावर अजिंक्यने शिक्षक पदविका प्रशिक्षण घेतले आणि विज्ञान शाखेत पदवी घेतली. सध्या तो मुक्त विद्यापीठातून लोकसाहित्य विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. भविष्यात ह्याच विषयात पीएच.डी. करण्याचा त्याचा मानस आहे. मानद डॉक्टर ही उपाधी मिळवण्यापेक्षाही त्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यात त्याला जास्त रस आहे. त्यादृष्टीने त्याचे वाचन-संशोधन सुरू आहे. शाहिरी परंपरा आणि त्यात हाताळले जाणारे विषय ह्यावर प्रबंध, पुस्तक विंâवा मालिका करण्याचा त्याचा विचार आहे. शाहीरांची प्रतिभा जगासमोर यावी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहिरी पोहोचावी ह्या दृष्टीने तो जुन्या जाणत्या शाहीरांच्या मुलाखतींचे संग्रहण करत आहे. आजच्या युवकांनी ही कला आत्मसात करावी अशी त्याची इच्छा आहे.
संभाजीनगर येथील ज्ञान वैभव शिक्षण संस्थेत अजिंक्य प्राथमिक विद्यालयात इतिहास-भूगोल विषय शिकवतो. हे त्याच्या आवडीचे विषय असल्याने कधी गोष्ट, तर कधी काव्य किंवा कधी पोवाड्याच्या स्वरूपात तो मुलांना शिकवतो.
शिक्षकी पेशा, शिकवण्याची आणि शिकण्याची जिज्ञासा पाहता संभाजीनगर येथील गरवारे विद्यालयाने त्याला प्रायोगिक तत्त्वावर लोककला वर्ग भरवण्याचे सुचवले. अजिंक्यने ते आव्हान स्वीकारत 2016 मध्ये वर्ग सुरू केले. जवळपास 35 ते 40 विद्याथ्र्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. लोककलेची पाश्र्वभूमी नसतानाही पालकांनी, मुलांनी लोककला शिकण्याबद्दल उत्सुकता दाखवली. मुलांना सर्व प्रकारच्या लोककलांची तोंडओळख करून देण्याच्या निमित्ताने अजिंक्यचाही अभ्यास झाला आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. पुढल्या वर्षी जाहिरात देऊन लोककलेचे अधिकृत वर्ग सुरू करण्यात आले. आजही आठवड्यातून दोन दिवस नाममात्र मूल्य आकारून लोककलेचे वर्ग घेतले जातात. तिथले गुणी विद्यार्थी आता साभिनय सादरीकरण करू लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून बाहेरच्या लोककलावंतांनादेखील पाचारण केले जाते.
याव्यतिरिक्त अजिंक्य दहा वर्षांपासून `शाहीर आत्माराम पाटील’ मंचाचे काम सांभाळत आहे. मंचातर्फे आजवर १० बालशाहीर पुरस्कार दिले गेले. शाहिरी संदर्भातील ४ पुस्तकांचे प्रकाशन झाले. शाहिरी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच महिला शाहीर घडाव्यात ह्यासाठीदेखील विशेष प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
शाहिरी या लोककलेला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळतो का? असे विचारले असता अजिंक्य सांगतो, `ग्रामीण महाराष्ट्रात लोककलाकारांची खाण आहे. फक्त ते प्रसिद्धीच्या झोतात नाहीत. मात्र, अस्सल मातीतले कलाकार आपल्यापरीने लोककलेसाठी शक्य तेवढे योगदान देत आहेत. तसेच हा सांस्कृतिक वारसा पाहता अनेक गावांमध्ये, मुंबईबाहेर शहरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात लोककलांचा समावेश केला जात आहे. संभाजीनगरचे म्हणाल, तर इथल्या लग्न समारंभांपासून राजकीय निवडणुकीच्या फडापर्यंत ऑर्केस्ट्रा म्हणून मनोरंजनासाठी लोककलावंतांना बोलावले जाते. हे मी सुगीचे दिवस मानतो. मात्र, एवढ्यावर न थांबता मला ह्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करायचे आहे. त्यासाठी मी माझ्या ओळखीत येतील त्या सर्व लोककलावंतांच्या अनुभवाचे आणि त्यांनी जपलेल्या लोककलेचे संकलन करत आहे. ह्या सर्वात मला माझ्या पालकांनी, लोककलाकारांनी, संभाजीनगरच्या पत्रकारांनी आणि सहकारी मित्रांनी पदोपदी साथ दिली, म्हणून मी हे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस करत आहे.’ अजिंक्यच्या ह्या प्रयत्नामुळे शाहिरी ह्या कलेला महत्त्वपूर्ण योगदान लाभणार आहे.
अजिंक्यच्या प्रयत्नांची दखल घेत आजवर अनेक सामाजिक, लोककला आणि साहित्य पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले आहे. जसे की, 2016 ला नगरमधून प्रियदर्शनी संस्थेतर्फे `शाहीर महाराष्ट्राचा’ पुरस्कार, विश्वसखा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार, युनिसेफचा जिंगल अवॉर्ड आणि 14 जून रोजी पारनेर येथे लोककलेत केलेल्या समाजकार्याबद्दल `युथ इन्स्पिरेशन ऑफ द इयर’ पुरस्कार मिळत आहे.
शाहिरीने तुला काय दिले, असे विचारले असता अजिंक्य सांगतो, `शाहिरीने मला ओळख दिली. अभिनय, नाट्यलेखन, आयोजन, काव्यलेखन, गायन, वादन आणि दांडगा जनसंपर्क व ओघाने प्रसिद्धी दिली. याही पलीकडे जाऊन सांगेन, ते म्हणजे मला शाहिरीने समाधान दिले. समाजकार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी एक माध्यम दिले. हे दान मला मिळाले, तसे इतरांना देण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. शाहिरी भाषेत सांगायचं तर,
सोळाकळी पूर्ण चंद्र जसा, मुखडा राज अंबीर।
पोशाख रुबाबी, रंगी गुलाबी, राजबिंडा राजकुमार।
रत्नजडित हार पाचूचा गळी, कानात बाळी जीवांचा हिरा।
हात भगवतीचा शिरी, कल्याण करी, राहील अजिंक्य तारा।’



























































