समानतेची समान संधी

815

>> कौस्तुभ सोनाळकर

‘समानता’ हा कसला खणखणीत शब्द आहे. आपल्या रोजच्या जीवनात तो आपल्याला अनेकदा अनुभव देत असतो. एक सारखा, हुबेहूब, तद्सदृश अशा अनेक छटांमधून रोज सामोरा येत असतो. समानता या शब्दातच एक वजन आहे. हा शब्द उच्चारला तरी त्याची वेगळी जाणीव होते. वेगळय़ा भावनेचा स्पर्श होतो. मनाला एक उभारी येते. एक हक्काची जाणीव होते. इंग्रजीतल्या ‘जस्ट’ आणि ‘ऑनेस्ट’च्या जातकुळीतला हा शब्द आहे. तो सगळ्यांना एकसारखा आधार देणारा, हक्काची जागा देणारा आहे. अर्थात, हे सगळं इंग्रजी-मराठी शब्दकोशात शोभेल असे वर्णन झालं! प्रत्यक्ष व्यवहारात काय चित्र आहे? ते बदलू शकेल का? असे अनेक प्रश्न आजही तसेच आहेत. रोजच्या आयुष्यात समानता हा शब्द आपण सहजपणे स्वत:पुरता किंवा आपल्या जवळच्या सुहृदांसाठी वापरतो. भवभूतीच्या शब्दांत सांगायचं तर आपल्याला जे ‘समानधर्मी’ वाटतात त्यांच्यासाठी आणि ‘एक’सारखी गरज असलेल्यांसाठी आपण समानता हा शब्द वापरतो. समान आणि समानता हा एक ‘कूल’ शब्द म्हणून, जीवनशैलीदर्शक शब्द म्हणून आपणच वापरत असतो. वास्तविक समानता या शब्दाची एक वेगळी जागा आहे, त्याचे वेगळे महत्त्व आहे, प्रत्यक्षात ती एक विचारधारा आहे. त्यामुळे व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर समानता आणणे हे आपले सगळय़ांचे उद्दिष्ट असायला हवे. शेवटी कंपनी काय, उद्योग काय किंवा व्यवसाय काय हे समाजाचे एक सामूहिक अंग आहे. त्या ठिकाणीही समानतेचा अवलंब व्हायला हवा. सध्या ज्याला आपण कॉर्पोरेट क्षेत्र म्हणतो तेथेही समानतेचा अवलंब होणे गरजेचे आहे. या क्षेत्रातदेखील समानता या शब्दाचा अर्थ वेगवेगळय़ा पद्धतीने प्रतिबिंबीत होताना दिसतो. असं होणंही साहजिक आहे. कारण सरतेशेवटी माणसेच कंपन्या चालवतात. एका सामूहिक विचाराधारेतून संघटीत असलेल्या लोकांचा गोतावळा म्हणजे कंपनी! मग जसे लोक तशी त्यांची संस्था! मध्यंतरी एक लेख वाचण्यात आला होता ‘जसे लोक तसे त्यांचे देव’, ज्यामध्ये मध्यवर्ती कल्पना अशी होती की लोक त्यांच्यासारखाच दिसणारा देव बनवतात. म्हणजे लोकांचे प्रतिबिंबच आपल्याला देवांमध्ये दिसते. समानता ही जशी तुम्ही मानाल तशी दिसते. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत समानता यायला हवी. असे आपण सगळेच म्हणतो. त्यासाठी घटनेनेही सर्व अधिकार दिले आहेत. कायदे केले आहेत. तरीही समानता खरोखर शंभर टक्के साध्य झाली आहे का? समानता या शब्दात सर्वांना समान वागणूक असा अर्थ गृहीत असला तरी या शब्दाचा वापर अनेकदा असमान पद्धतीने होतो. जन्माला येणाऱया प्रत्येक माणसात स्वत:चे वेगळे वैशिष्टय़ असतेच. एखादा महारथी कर्ण म्हणू शकतो की, ‘दैवायतं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषम्.’

कंपन्या म्हणजे काय तर एका मोठय़ा समाजव्यवस्थेचा छोटा हिस्सा किंवा प्रचलित समाजव्यवस्थेची हुबेहूब प्रतिमा! त्यात सगळ्याच पैलूंना एकसारखी संधी देण्यासाठी एकसारखे वातावरण, एकसारख्या सुविधा, एकसारखे धोरण एकाच वेळी असायला हवे. एक छोटेसे उदाहरण घेऊ या. जेंडर इक्वॅलिटी किंवा लैगिक समानता हा सध्याचा बझवर्ड आहे. या संकल्पनेचा विचार करताना फक्त स्त्री आणि पुरुष यांचाच विचार होतो. या दोन्हीखेरीज तिसरा गट म्हणजे तृतीयपंथी जीव. हेदेखील आपल्यात आहेत, याचा विसर पडतो. त्यांचे अस्तित्व आपण नाकारले आहे हा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. जागतिक दिव्यांग दिन जेव्हा युनोने निश्चित केला त्यानंतर आपल्याला जाग आली की दिव्यागांच्या गरजादेखील आपल्या गरजांसारख्याच आहेत. असे अनेक सामाजिक पैलू विचारात घेऊन एक नवीन कॉर्पोरेट कल्चर बनवणे हे येत्या काही वर्षांचे सामूहिक उद्दिष्ट असायला हवे. ही प्रक्रिया एका दिवसात घडणार नाही हे सांगायला नको, पण समाजाच्या प्रत्येक घटकाला समान संधी देण्याच्या ध्येयाकडे एकेक पाऊल उचलणे ही आजच्या कार्पोरेट जगाची गरज आहे.

असे झाले नाही तर सामाजिक न्यायाची तागडी एकाच बाजूला झुकलेली असेल आणि कोणीतरी जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीतले ते वाक्य आठवून खिन्न होत असेल-
All Animals Are Equal But Some Animals Are more Equal Than Others
(लेखक एस्सार समुहाचे प्रेसिडेंट (मनुष्य बळ) आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या