>> माधव डोळे
राजकारणात असूनही राजकारणविरहित समाजसेवा कशी करावी याचा जणू परिपाठच ठाणे जिल्हय़ातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ ऊर्फ आप्पा शिंदे यांनी आखून दिला आहे. 11 नोव्हेंबर 1949 रोजी जन्मलेल्या जगन्नाथ शिंदे यांनी तरुण वयातच कल्याणमधून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. ‘आप्पा’ या टोपणनावाने ते ओळखले जातात. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि राजकारण या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या आप्पांनी अत्यंत निःस्वार्थीपणे आपला मदतीचा हात समाजासमोर पुढे केला. आतापर्यंत लाखो जणांनी त्याचा लाभही घेतला. भुकेल्याला अन्न मिळाले, गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत लाभली, तर खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या कार्याची दखल म्हणूनच कल्याणमधील ‘याज्ञवल्क्य’ या संस्थेने त्यांना सन्मानाचा ‘याज्ञवल्क्य’ पुरस्कार दिला आहे. खरे तर डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते, पण ते अपुरे राहिले. मात्र स्वतःचे मेडिकल दुकान सुरू करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी केवळ स्वतःपुरता व्यवसाय बघितला नाही, तर महाराष्ट्र आणि देशातील औषध विव्रेत्यांना एकत्र केले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गेली अनेक वर्षे ते महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. या कार्यामुळेच ते आता देशपातळीवरील औषध विव्रेत्या संघाचेही अध्यक्ष असून गोरगरीबांपर्यंत वैद्यकीय सुविधा व औषधे पोहोचवण्यासाठी झटत आहेत. आरोग्य शिबिरे, पूरग्रस्तांना औषधांचा पुरवठा, तिरुपती-शेगाव-पंढरपूर येथे भक्तनिवासाची उभारणी, आदिवासी भागात कोटय़वधी रुपयांच्या औषधांचा पुरवठा अशा विविध कामांची त्यांची जंत्री आहे. सैनिकी विद्यालय, कल्याणमधील मॉडर्न स्कूल, प्रियदर्शनी यूथ क्लब, कल्याण एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन, कबड्डी असोसिएशन, जयशंकर क्रीडा मंडळ अशा अनेक संस्थांचा कार्यभार ते समर्थपणे पाहत आहेत. दर गुरुवारी त्यांच्या कल्याणमधील निवासस्थानी गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक येतात. त्यांना मुक्त हस्ताने आप्पा शिंदे हे औषधांबरोबरच आर्थिक मदतही देतात. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱया गोरगरीब विद्यार्थ्यांनाही त्यांनी आधार दिला आहे. कोविडसारख्या संकटात त्यांनी केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. पीपीई किट्स, रेमडेसिवीर, रुग्णवाहिका, अन्नधान्य अशा अनेक बाबींची मदत त्यांनी कोविडच्या काळात केली. ही मदत संपूर्ण राज्यभर होती. हा मदतीचा यज्ञ 50 हून अधिक वर्षे अखंडपणे सुरू आहे. म्हणूनच शरद पवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आप्पांना विधान परिषदेचे सदस्य केले. आपल्या आमदारकीच्या काळातदेखील त्यांनी आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांना वाचा पह्डली. त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या कोणत्याही माणसाला त्यांनी जात, धर्म किंवा पक्ष विचारला नाही. म्हणूनच त्यांचे नाव सर्वदूर पसरले आहे. मनमिळावू स्वभाव व मदतीसाठी तत्पर असलेल्या आप्पांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘याज्ञवल्क्य’ पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे.































































