
>>महेंद्र पाटील
कधी कधी असं वाटतं, कदाचित आपल्या मनालाही एक मन असेल. कारण सृष्टीतले सारे ऋतू, सारे प्रहर, रानातल्या प्रत्येक पानाची सळसळ, वाऱयाची चाहूल, सागराची भरती-ओहोटी, लाटांची गाज, मावळणारी सांज, पक्ष्यांची कुजबूज, धुक्यातली धूसर वाट, रानातून संथ वाहणारा पाट, घनव्याकूळ आठवणी, मेघांची गर्जना, विजेचा कडकडाट, निसटणारी संध्याकाळ, नदीच्या अथांग पात्रात चंद्रासोबत उतरणारं आभाळ, खूप दिवस जपलेली एखादी खंत, एखादा आवडलेला चेहरा, एखादं सप्तसुरांचं सुरेल गाणं, आनंदाच्या सरी, दुःखाचं काsंदण, निसर्गाचं आंदण, एखाद्या वाटेकडे टक लावून पाहत राहणं, एखाद्या निर्विकार संध्याकाळी उगाच उदास होणं, तर कधी उंच आभाळात भरारी घेण्यासाठी मनाला उंच उंच झोकून देणं. कधी हसणं, कधी रुसणं, कधी रागावणं, तर कधी उगाचच कल्पनेत जगणं अशा कित्येक गोष्टी अन् कित्येक क्षण आपलं मन जगत असतं. या सगळय़ा क्षणांना जपून ठेवणारा आपल्या मनातला एक कप्पा म्हणजेच आपल्या मनाचं मन असावं.
इतके सारे रंग मनात जपलेले असतात म्हणून कधी कधी असं वाटतं, आपलं मन म्हणजे एक आभाळ. जेव्हा आठवणींचा पाऊस सुरू होतो आणि अलगद जाणिवांचं ऊन हळूहळू मनात पसरू लागतं, तेव्हा मनातल्या मनात आजवर जपलेल्या सुंदर क्षणांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य मनातल्या मनात आकार घेतं. त्या वेळी जाणीव होते, सृष्टीतल्या प्रत्येक रंगाप्रमाणेच आपल्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक आठवणीला एक नवा रंग असतो. काही गडद तर काही फिकट असे रंग डोळय़ांना दिसतात. या रंगांबद्दलची ओढ मनाला वाटत असते म्हणूनच डोळय़ांना ते रंग पाहायला आवडतात. डोळे प्रत्येक रंग पाहून मनात साठवून ठेवण्याचं काम करतात. आपण अनुभवलेले बरे-वाईट दिवस आपल्या मनात जमा होतात आणि जसजसा काळ उलटत जातो तसे मनात ते रंग गडद किंवा फिकट होऊ लागतात. काही आठवणी विरून जातात, पण उरतात फक्त रंग. काही जखमा मनात तशाच भळभळत असतात…एखाद्या रंगासारख्या.
मनातले हेच वेगवेगळे रंग जपत आपण जगत असतो त्या प्रत्येक रंगासमवेत. जसं फाल्गुन कृष्ण पंचमीला प्रत्येक जण रंगांची उधळण करत हा दिवस साजरा करतो, त्याप्रमाणे कधीतरी आयुष्यात जमेल तसं, जमेल तेव्हा आपल्या मनातल्या रंगांचा एखादा उत्सव साजरा करून पहावा. मग जाणीव होईल की, आयुष्य इतपं सोपं नसलं तरी तितपं कठीणही नाही. जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळय़ा रंगात रंगून जावं लागतं.
अगदी तसंच आपणही मनात जमा केलेल्या सप्तरंगी रंगांची उधळण स्वतःभोवती करून घ्यावी. मग पुन्हा शोधावं आपल्या मनाला, ते कोणत्या रंगात रंगून गेलं हे तुम्हाला नक्कीच कळेल.
– [email protected]




























































