कवडसे – काळोखाच्या क्षितिजावर

>> महेंद्र पाटील

एकदा मी निवांत बसलो होतो काळोखाच्या क्षितिजावर. तू माझा शोध घेत आलीस हातात एक मिणमिणता दिवा घेऊन. इतक्या अंधाऱया रात्री तू इथे येशील असं वाटलंच नव्हतं मला. कारण मी नेहमी अंधारात असायचो तेव्हा तू उजेडात असायचीस. तुला उजेड आवडायचा आणि मला अंधार… तू मला सतत म्हणायचीस की, मी असा अंधारात का राहतो? काय शोधत असतो?…आणि मग मला उजेडाची स्वप्नं दाखवायचीस. उजेड तसा माझा शत्रू नव्हताच, पण अंधार माझा सखा होता. अंधारात सगळेच चाचपडतात, काही जण दिशा हरवतात, पण मला मात्र अंधारात नेहमीच लख्ख दिसायचं. कोणत्याही दिशेच्या अंधारवाटा मला नेहमीच अचूक वळणावर घेऊन जायच्या. त्यामुळे मला अंधाराची कधी भीती वाटली नाही, तसंच उजेडाची कधी ओढ वाटली नाही.

आता आपण एकत्र प्रवास करायचं ठरवलं आहेच तर त्या वाटेवर कधी अंधार तर कधी उजेड असणार हे मनाला चांगलं माहीत आहे. कदाचित म्हणूनच तुझं मन उजेडाशी आणि माझं मन अंधाराशी सलगी करू पाहत आहे. त्यामुळे लख्ख उजेड असताना जेव्हा कधी माझं मन अनोळखी वाटा शोधत असेल तेव्हा तू सोबत आहेस म्हणून रस्ता चुकणार नाही ही खात्री मला नक्की आहे. जेव्हा कधी अंधारवाटेवर आपण चालत असू तेव्हा तू फक्त सोबत रहा. एकही वळण चुकणार नाही बघ. तुला माहितेय का? त्या अंधारात सगळ्या दिशा माझ्याच असतात आणि तो प्रहरही माझा असतो.

तू कदाचित चाचपडशील, घाबरशील… पण माझ्यावर विश्वास ठेवून चालत रहा प्रवास संपेपर्यंत. प्रवास असा सुरूच राहू दे निरंतर. काही वेळ दूर चालत गेल्यावर पहाटेची चाहूल लागेल तुला आणि तुझं मन आनंदी होईल! मग अंधार निसटून जाईल पापण्यांच्या काठावरून. म्हणून मी मात्र थोडा बेचैन होईन आणि माझी पावलं कदाचित तिथेच थांबतील. माझा प्रवास कदाचित तिथेच संपेल काही क्षणांसाठी. तू मात्र आतुरलेली असशील पहाटेचं स्वागत करायला. नेहमीप्रमाणे अंधाऱया पारावर एक पणती लावून तू निघून जाशील. अंधाराचे क्षितिज ओलांडून प्रकाशाच्या गावी.

…आणि ती पणती, तिचा मिणमिणता प्रकाश तुझी आठवण करून देत राहील. माझ्या मनात उजेडाची ओढ निर्माण व्हावी हा तुझा उद्देश असेल कदाचित, पण मीसुद्धा रोज अंधाराच्या सीमा शोधत तुझी वाट पाहत राहीन. दिवस सरत राहतील, रात्रीसुद्धा सरतील. उजेडाचा हट्ट तू सोडणार नाहीस आणि मी अंधाराची साथ सोडणार नाही. खरं तर तो अंधारच माझी साथ सोडत नाही आता. कारण उजेड सर्वांनाच आवडतो. अंधारात प्रकाशाचे कवडसे शोधणारा मी जगावेगळा. तू येशील पुन्हा याच वळणावर जिथे सोडून गेली होतीस एकटं मला? पण तोवर तुझ्या अस्तित्वाची आठवण करून देणारी पणती विझलेली असेल.

धूसर धुक्यात पुन्हा आपण समोरासमोर बसून एकमेकांना पाहत राहू. तू माझ्या डोळ्यांत शोधत राहशील उजेडाची स्वप्नं आणि मी तुझ्या डोळ्यांत शोधत राहीन काळोखात बुडालेलं ते आभाळ. मग पुन्हा पहाटेची चाहूल लागेल. पुन्हा तू एक पणती लावून निघून जाशील दूर दूर… पण तसं नको करूस आता. राहू दे मला याच माझ्या आवडत्या अंधारात आणि तू मला शोधत ये याच अंधारात, याच काळोखात. घेऊन ये तुझ्या सोबत तुझा आवडता उजेड आणि रहा शोधत… बघ, तुला सापडतात का त्या वाटा, त्या दिशा, ते वळण… जिथून आपण चालत जायचो. मी तिथेच कुठेतरी असेन तुझी वाट पाहत त्या काळोखाचा क्षितिजावर…
[email protected]