सिनेमास्कोप – रोमान्सचा बादशाह : यश चोप्रा

>> महेंद्र पाटील

यश चोप्रा हे परिपूर्ण दिग्दर्शक होते. कोणत्याही पठडीतला चित्रपट ते बनवत आणि तो यशस्वी करून दाखवत. ‘धूल का फूल’, ‘वक्त’, ‘दीवार’, ‘काला पत्थर’, ‘दाग’, ‘मशाल’… असे वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट त्यांनी केले, पण त्यांची खरी ओळख रोमटिक चित्रपटांचे बादशहा हीच बनली. त्यांचे चित्रपट म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतात ते युरोपमधील निसर्गरम्य लोकेशन्सवर केलेले चित्रीकरण, सुमधुर गाणी आणि प्रेमकथा! त्यांच्या चित्रपटांमध्ये या सगळय़ा वैशिष्टय़ांबरोबर अजून एक वेगळी गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे त्यांच्या कथेत असणारा प्रेम त्रिकोण.

यश चोप्रा यांनी त्यांची कारकीर्द त्यांचे मोठे बंधू बी.आर. चोप्रा यांच्या मार्गदर्शनाखाली केली. बी.आर. यांच्या काही चित्रपटांना सहाय्यक म्हणून काम केल्यावर त्यांनी ‘धूल का फूल’ या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. काळाच्या चार पावले पुढे जाऊन गोष्ट मांडण्याची त्यांना आवड होती. ते ‘धूल का फूल’पासून ते सिद्ध झालं. पुढे त्यांनी ‘वक्त’, ‘जोशीला’, ‘धरमपुत्र’, ‘आदमी और इन्सान’, ‘इत्तेफाक’, ‘दाग’, ‘दीवार’… हे चित्रपट दिग्दर्शित केले आणि ते यशस्वीसुद्धा झाले.

मग त्यांनी निर्माता होण्याचे ठरवले आणि त्यांनी यशराज फिल्म्सची स्थापना केली. त्या बॅनरअंतर्गत त्यांनी ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चाँदनी’, ‘फासले’, ‘लम्हे’, ‘डर’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर झारा’, ‘परंपरा’, ‘जब तक है जान’… असे प्रेमकथेवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केले. या सर्वच चित्रपटांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की, त्यांच्या चित्रपटांतील नायक हा नेहमी लग्न ठरलेली नायिका किंवा ती कुणाची तरी पत्नी असलेल्या नायिकेच्या प्रेमात असतो. ‘सिलसिला’मधील अमिताभ, ‘चाँदनी’मधील विनोद खन्ना, ‘डर’मधील शाहरुख खान. शाहरूख खलनायक असला तरी हाच या चित्रपटाचा खरा नायक होता. ‘लम्हे’मध्ये अनिल कपूरची भूमिका अशाच पठडीतील होती, पण जरा वेगळी होती. हा एक समान धागा त्यांच्या सर्व चित्रपटांत दिसून येतो. अशा पद्धतीचा प्रेम त्रिकोण त्यांनी वेगवेगळ्यां विषयांना घेऊन त्यात कथा गुंफून लोकप्रिय करून दाखवल्या. प्रत्येक चित्रपटात हा धागा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडला. त्यामुळे त्यांची ही पद्धत कधी एकसुरी वाटली नाही.

त्यांना संगीताचे चांगले ज्ञान होते म्हणून त्यांच्या चित्रपटातील संगीत नेहमीच लोकप्रिय ठरले आणि आजही सगळी गाणी सगळीकडे वाजताना दिसतात. त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यातसुद्धा हाच साचा दिसून येतो. यश चोप्रा दिग्दर्शक आणि वेगळे निर्माते असे कॉम्बिनेशन असलेल्या चित्रपटांत हा साचा कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे त्यांच्या मनातली गोष्ट ते जेव्हा निर्माते बनले तेव्हा त्यांना मांडता आली. हेच त्यांच्या यशाचे लोकप्रियतेचे कारणसुद्धा असू शकते. आजही त्यांचे चित्रपट सिनेमागृहात नव्याने प्रदर्शित होतात आणि गर्दी खेचतात. कारण प्रेक्षकांच्या मनातही अशीच एखादी लपलेली गोष्ट असते आणि मनातल्या मनात असाच एक त्रिकोणही असतो.