
>> महेंद्र पाटील
ऋतू येतात आणि जातात. प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी नवं देऊन जातो. कधी सुख देतो तर कधी दुःख. काही आठवणी देऊन जातो तर काही साठवणी… काही ऋतूंची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तर काही ऋतू केव्हा सरतील? असा प्रश्न मनाला पडतो. प्रत्येक वर्ष सरताना मनात असेच विचार येतात. नवीन येणारं वर्ष काय घेऊन येईल आणि यंदाचे ऋतू कसे असतील? सृष्टीच्या ऋतुचक्रात तीन ऋतू असले तरी माझ्या मनाच्या ऋतुचक्रात फक्त दोन ऋतू येतात…एक सुखाचा आणि दुसरा दुःखाचा. सुखद क्षण घेऊन येणारा ऋतू आपलासा वाटतो आणि त्याहीपेक्षा जास्त जिव्हाळ्याचा वाटतो तो दुसरा ऋतू. हा जरी विरहाच्या आठवणी घेऊन येणारा असला तरी हवाहवासा वाटतो. हे असंच अविरत सुरू असतं माझ्या मनात. माझ्या मनात गेले कित्येक दिवस या दोघांशिवाय कुणी फिरकलं नाही. या दोन्ही ऋतूंचे स्वागत मी मनापासून करतो. कारण त्यांची मला जगायला शिकवलं. आठवणीच्या आधारावर दिवस रेटत राहण्यातही काय गंमत असते हे माझ्या मनाला चांगलंच उमगलं होतं. म्हणून माझं मन सलत्या आठवणी उराशी घेऊन जगत होतं. त्या मनाला आठवणींची इतकी सवय झाली होती की, त्यापुढे त्याला सुखाचे क्षणसुद्धा नकोसे वाटायचे. पुनः पुन्हा त्याच आठवणीत रमायचं मन आणि बरसू लागायचा ऋतू मनातल्या असंख्य गुदमरलेल्या आठवांचा. जाताना पुन्हा काही नव्या आठवणी मागे ठेवून जायचे आणि मी त्यांना जपत राहायचो. त्या आठवणींनासुद्धा माझा लळा लागायचा. असं करता करता प्रत्येक दुःखाच्या आठवणी माझ्या भोवती जमा व्हायच्या तेव्हा मनाला चाहूल लागायची सुखाच्या ऋतूची. पुन्हा तीच सुखाची ओढ, पुन्हा तोच सुखाचा ध्यास, पुन्हा त्याच सावल्यांची मनाला वेडी आशा….साद घालत राहायचे मनाला. सलणाऱया आठवणींच्या गर्दीत हरवलेले सुखाचे क्षण पुन्हा समोर यायचे आणि मनाला चाहूल लागायची नव्या ऋतूच्या आगमनाची, पण माझ्या हट्टी मनाने जुन्या आठवणी इतक्या घट्ट कवटाळून ठेवलेल्या असायच्या की, नव्या ऋतूलाही प्रश्न पडायचा, खरंच ही माझी योग्य वेळ होती का येण्याची? पण त्या आठवणींनाच वाटायचं… आपण उगीच का त्याच जुन्या सावल्या शोधत बसलोय… मग अलगदपणे माझ्या मनाचा कोपरा रिता करून जायच्या आणि रिकाम्या जागेत हळूहळू नवा ऋतू आकार घेऊ लागायचा. तो आला की, मनाला उगाच परक्यासारखं वाटत राहायचं. कारण सुखांशी मैत्री करायला माझं मन नाराज असायचं. वाऱयाची एक झुळूक जशी येते आणि सुखद गारवा देऊन लगेच निघून जाते, तसं सुखसुद्धा अलगद येतं आणि लगेच निघून जातं. सुख हे क्षणभंगूर असतं असं मनाला नेहमी वाटायचं. मग बिचारा ऋतू मनाला हसवत खेळवत राहायचा. जुन्या आठवणींना विसरून मन रमू लागायचं नव्या पालवीत. यंदाही तसंच काही वाटू लागलं आहे माझ्या मनाला. नव्या उमेदीची हवीहवीशी वाटणारी सुखद पालवी फुटू लागेल आता, ज्याचा मनाला हेवा वाटेल असे सुखाचे ऋतू परतू लागतील आता. नव्या आठवणी येतील, नवी स्वप्नं साद घालतील, नव्या क्षितिजावर एक नव्या आशेचा सूर्योदय होईल आणि माझं मन मला एक-एक नवीन कविता लिहिण्यासाठी शब्द सुचवू लागेल. नव्या ऋतूच्या नव्या पालवीला ओल्या दवाचा स्पर्श…माझ्या मन अंगणी कुणी सांडला हा हर्ष….असंच सुखद जावो येणारं हे नवं वर्ष… सरत्या वर्षाच्या आठवणीत काढत लिही एखादं नवं गाणं जुन्या आठवांचं…






























































