
>> मलिका अमरशेख
अवयव प्रत्यारोपण हा या शतकातला क्रांतिकारक शोध, परंतु आपण केवळ अवयवांचं प्रत्यारोपण करू शकतो, विचार आणि मनाचं नाही. अगदी जन्मदात्यालाही आपलं मूल स्वत:चा अंश असल्याचं भासत असलं तरी त्याच्या भावना, विचार स्वतंत्र असतात आणि तसंच ते घडतं. आजच्या काळात प्रेम, माणुसकी, स्नेह, संवेदना यांचं प्रत्यारोपण होण्याची खरी गरज आहे. मुखवटय़ासारखं धारण केलेलं मोह, लालसा, वासना, अहंकार यांचं प्रत्यारोपण जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत या जगात दुःख निर्माण होत राहील.
क्लोन बेबी, अवयव प्रत्यारोपण हा या शतकातला क्रांतिकारक शोध!
पण समजा मेंदूचं प्रत्यारोपण केलं तर त्या माणसाचे विचार रोपण केलेल्या मृत माणसाचे असतील का? हृदयरोपण केलं तरी त्या बंद पडून चालू केलेल्या हृदयातल्या संवेदना जुन्याच असतील का? एखाद्या आईचे डोळे दुसऱया कुणाला दिले तरी ‘ती’ नजर असेल का?
याची उत्तरं नकारार्थीच आहेत, पण एका मृत झालेल्या अवयवानं एक माणूस पुन्हा जिवंत होतो हे निश्चितच महत्त्वाचं आहे.
माणूस मृत झाला की, त्याच्या सर्व संवेदना मृत होतात, पण जर ‘बिग बँग’नंतर अनेक अचेतन आवाज या अवकाशात तसेच पसरत राहतात, जे नंतर पकडता येतात असं विज्ञान सांगतं, तद्वत मृत माणसाच्या भावना, शब्द, मृत होणाऱया शरीराभोवतालचा ऑरा (एक प्रकारचं चुंबकीय क्षेत्र) हेसुद्धा वातावरणात तरंगत असेल का?
माणूस खरं बोलतो की खोटं यासाठीची एक टेस्ट आहे. माणसाचा श्वास, हृदयाची धडधड, त्याची नजर, देहबोली यावरून ते ठरवतात. माणसाचा मेंदू उघडता येतो, पण मन? मन वाचता येणारं यंत्र अजून माणसानं शोधून काढलंच नाही.
कितीतरी हजारो अंतर लांब असणाऱया ग्रहाचा अभ्यास करणारे अवकाशयान गेलंय म्हणे, पण जवळ असणाऱया जिवंत माणसाचं मन… त्याचा अभ्यास कुणीच करीत नाही?
येशू, बुद्ध हे गेल्यावर पण त्यांचे विचार त्यांच्या अनुयायांकडून जगभर पसरले व त्या विचारांच्या रूपात ते जिवंतच राहिले, पण तसंच आपल्यानंतर काय राहावं असं वाटतं? सर्वसामान्य लोक मूल झाल्यावर आनंदतात. कारण स्वतःचा अंश, स्वतःचं रक्तमांस, पेशी हे सगळं पुनश्च राहणार असतं. तो त्याचा मुलाच्या रूपातला पुनर्जन्मच असतो. आपल्या आयुष्यातल्या चुका तो मुलाच्या आयुष्याला घडवून दुरुस्त करणार असतो. आपल्या अपुऱया इच्छा तो मुलाकडून पुऱया करणार असतो.
निसर्गतः त्याच्या ‘क्लोन मिनिएचर’चा तो जन्मदाता असतो, पण तेच मूल नंतर स्वतंत्र होतं, स्वतंत्र विचार करतं! कुंभार मडकं घडवतो, पण मानवी मूल आपला आकार विचारांचा, भावनांचा आपणच धारण करतो. कारण आई-बापाच्या वेळची परिस्थिती, अनुभव आणि मुलाच्या मोठं होण्यातल्या प्रोसेसमधली परिस्थिती व अनुभव यात जमीन अस्मानाचा फरक असतो, ज्याला आपण ‘जनरेशन गॅप’ असं गोंडस नाव देत असतो.
म्हणचेच काय, आपण अवयवांचं प्रत्यारोपण करू शकतो; विचार व मनाचं नाही. ईव्हन जे विचार प्रेषितानं दिले, त्यात पण विचार विभागले जातात. बौद्ध धर्मात हिनयान व महायान, जैनांत श्वेतांबर व दिगंबर! याबद्दल जीएंची ‘यात्रिक’ नावाची फार सुंदर गोष्ट आहे. जुडास आणि डॉन क्विक्झोटचा नोकर भेटून संवाद करतात. जुडास येशूबद्दल केलेल्या पापाबद्दल दुःख व्यक्त करीत असतो, तर डॉन क्विक्झोटचा नोकर म्हणतो, ‘‘अरे, याहून घोर पाप तू करू शकत होतास की…!’’ जुडास आश्चर्याने बघतो. ‘‘याहून घोर पाप? ते काय?’’ नोकर उपहासानं हसतो. सांगतो, ‘‘अरे, तू येशूची शिकवण उलटीपालटी करून तीच खरी आहे म्हणून बाकीच्यांची फसवणूक करू शकत होतास की.’’ जुडास थरारतो, ‘‘अरे बापरे… फारच भयानक माणूस आहेस तू’’ आणि धावत जाऊन फाशी घेतो. तात्पर्य काय, तर आपण खूप काही करू शकतो; चांगल्या आणि वाईट विचारांची गल्लतही करू शकतो. पण प्रत्यारोपण वेगळं. ते कायमस्वरूपी असतं. अशा मुखवटय़ासारखं की, जो सोलता येत नाही. कर्णानं कवचकुंडलं दान केली, जी त्याच्या संरक्षणासाठी होती, सूर्यानं दिलेली. त्यानं ती कापून काढली. आपल्या मनाभोवती, विचाराभोवती मोह, लालसा, वासना, अहंकार यांचं प्रत्यारोपण आपण केलेलं असतं, ते मात्र आपण काढत नाही, कापत नाही. त्यामुळेच दुःख निर्माण होतं. हे बुद्धासारख्या प्रेषितानं सांगून पण…
आपण गुलाबाचं कलम लावतो, पण प्रेम, माणुसकी, आपुलकी, माया, स्नेह, जिव्हाळा यांचं कलम नाही लावत. ते प्रत्यारोपित करणं इतकं कठीण असतं?
‘‘वासांसि जीर्णानि यथा विहाय
नवानि गृहय़ति नरो s पराणि।
तथा शरिराणि विहाय जीर्णा
न्यन्यानि संयाति नवानि देही।।’’
नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापोन शोषयति मारुतः।।
तर हे फक्त आत्म्यालाच लागू पडतं असं नाही. मृत्यूनंतर आपल्या इच्छा, आपलं दुःख, शब्द, विचार हेही असेच अंतराळात मृत ताऱयाच्या अवशेषासारखे तरंगत भटकत राहणारे. अशा कोटय़वधी लोकांच्या अतृप्त इच्छा, वासना, दुःख, शब्द, विचार यांनीच तर अवकाश भरलं नाही ना? म्हणूनच तर ते काळंभोर न् निःशब्द नाही ना?
आपली पृथ्वी बिचारी कोटय़वधी वर्षांपासून गरगर गरगर फिरतेय. त्यानं चक्कर बिक्कर येण्याऐवजी माणसांचे व्यवहार बघूनच तिला चक्कर नाही आली म्हणजे मिळवलं. निसर्गाची वाट तर आपण भरपूर बंदोबस्तात लावलीय, पण पृथ्वी आपण दिवाळीत आपटीबार लावतात तशी फोडण्याऐवजी तिचं पण क्लोनिंग किंवा प्रत्यारोपण केलं तर बरं होईल असं आपलं एक…!
उगाच दुसरे ग्रह शोधत फिरायचं तर त्याऐवजी पृथ्वीसारखाच अजून एक ग्रह निर्माण करून त्यावर मानवाचं प्रत्यारोपण करून टाकावं!




























































