मुखवटे सोलताना – चित्र आताच्या युगाचं

>> मलिका अमरशेख

निसर्गाचा, जीवनाचा आणि समाजरचनेचा समतोल सांभाळलाच पाहिजे, तरच आपण ही वसुंधरा पुढच्या पिढीच्या हातात सुखरूप, सुंदर, सहजपणे देऊ शकू. अपघातात दहा माणसे मरतात. पुलाला कठडा नाही म्हणून दहा-पंधरा हरणं मरतात याचं दुःख कुणाला नाही. म्हातारी मरतेच, पण काळ सोकावतो असंही वाटत नाही. हे सारंच भयचकित करणारं, सुन्न करणारं, विचार करायला लावणारं. माणूस हा विचार करणाराच नव्हे, तर विचारात पाडणारा आहे हेच खरं!

गाडीचा आणि जीवनाचा वेग नियंत्रणात असला की, जीवनप्रवास सुखकर होतो. लांब, रुंद, विस्तीर्ण हायवेहून अधिक अपघातांची मालिका सुरू आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ त्याबरहुकूम ‘रात्रीस प्रवास चाले’ ही खेळी अजिबात खेळली नाही तरी जास्त चांगलं असं कुणालाच वाटत नाही. आपला व दुसऱयाचा जीव धोक्यात का घालता, असा प्रश्न कुणी विचारत नाही.

प्रचंड घाई आणि दिवसाचा वेळ वाचावा हा हिशेब यमाकडेच चुकता करावा लागतो. पहाटे 1-2 ते 5 ही वेळ गाढ झोपेची. आपल्या शरीरातलं झोपेचं घडय़ाळ इतक्या कोटय़वधी वर्षांचं, ते कसं काय बदलणार?

ड्रायव्हर असो वा गाडीचा मालक, या वेळी दिशा, काळोख, प्रकाश, वळणं यात नजरचूक होण्याची शक्यताच जास्त. पुन्हा थकवा, शीण, झोपेनं आलेली क्षणभराची झापड ही सर्वांना मृत्यूच्या खाईत लोटणारी.

त्यातून पुन्हा शहरात वाढणारं प्रदूषण. आज इतके विविध शोध लागतात, पण गाडय़ांमुळे वाढणारं प्रदूषण कसं कमी करायचं याचा शोध कुणी लावत नाही. गाडय़ांचा धूर हा जमिनीलगत साचून राहतो, पण काय केल्याने तो कमी किंवा विरून जाईल याबद्दल कुणीच काही करीत नाही.

थोडक्यात काय तर, आपल्याकडे मध्यममार्ग सांगणारे प्रेषित खूप होऊन गेले. ऐकतात सर्वच, पण त्याप्रमाणे वागत कुणीच नाही.

निसर्गाचा, जीवनाचा आणि समाजरचनेचा समतोल सांभाळलाच पाहिजे, तरच आपण ही वसुंधरा पुढच्या पिढीच्या हातात सुखरूप, सुंदर, सहजपणे देऊ शकू. अपघातात दहा माणसे मरतात. पुलाला कठडा नाही म्हणून दहा-पंधरा हरणं मरतात याचं दुःख कुणाला नाही. म्हातारी मरतेच, पण काळ सोकावतो असंही वाटत नाही.

वाघ कमी झाले की, हाकाटी पिटतात, शब्दच्छल होतो. वनखाते कामाला लागते आणि वाघ जास्त झाले की, पुन्हा हाकाटी. कारण वाघ मानवी वस्तीपर्यंत येऊन हल्ले करू लागले म्हणून! पण वाघांच्या अधिवासात आपण वस्ती करू लागलो तर ते तरी काय करणार?

तिथं बर्फ विरघळतायत, इथं समुद्राला हटवतायत. कुणी वाळू चोरतात, कुणी वीज. खंड गुपचूप आपापली जागा बदलत पुढे सरकतायत. एकाच जागी बसून बसून त्यांना पण कंटाळा आला असणार. काही वर्षांनी आपली मुंबई सिंगापूरपर्यंत पोहोचली की, आपोआप मुंबईचं सिंगापूर केलं असंही म्हणता येईल.

थोडक्यात काय तर, सगळीकडेच अंदाधुंदी. काही थोडेच महामानव ही विस्कटलेली घडी सारखी करण्याच्या प्रयत्नात, तर काही जण पूर्ण चादर फाडून तुकडेच करण्याच्या तयारीत. म्हंजे एकानं बीज लावत जायचं, तर दुसऱयानं उपटत राहायचं. कठीणच एकूण.

पृथ्वी अपघातानंच जन्माला आलेली. आपण माणूस पण अपघातानं, योगायोगाने माणूस झालेलो. आता अपघात स्वतःच योजून परत आदिमानव होण्याच्या तयारीत.

एका बाजूला प्रचंड विकास, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड वैचारिक, भावनिक, आत्मिक दिवाळखोरी! युद्धखोरांची खुमखुमी आणि एकमेकांची कोंडी करण्यासाठी तत्पर राष्ट्रं. हातात पुष्पगुच्छ, पण मागे लपवलेल्या हातात अण्वस्त्र!

हे चित्र आताच्या युगाचं. श्रीमंत जास्त श्रीमंत होताहेत, गरीब जास्त गरीब. मध्यमवर्ग नेहमीप्रमाणेच तटस्थ आणि कूपमंडूक. लेखकवर्ग नेहमीप्रमाणेच लिहितो, वाचत कुणीच नाही. बायकांची अवस्था आधी पण कठीणच होती. आता पण कठीणच आहे आणि मुलं तर आधी थोडीफार आज्ञेत असणारे लहानसे गुलाम होते. आता ते सर्वज्ञ असणारे स्वयंभू झालेत. प्राणीजगत तर आपल्या सेवेसाठी आणि पोटासाठीच जन्मलेत असं जगभरातल्या मांसाहारींचं मत. ‘जलकट्ट’t आणि बैलगाडय़ांच्या शर्यती, कोंबडय़ांच्या झुंजी यात प्राणीही मरतात आणि माणसंही. तरीही माणसांची दुसऱयाला झुंजवून मजा बघायची खोड काही जात नाही. हेही अपघातच की! आपण आपल्या क्षुद्र लालसेपोटी घडवून आणलेले…
तर अशा पद्धतीने पाहिलं तर अपघात हे जितके नकारात्मक असतात, तर काहीच अपवादात्मक स्थितीतले सकारात्मक असतात. उदा. पृथ्वीचा जन्म, आपला जन्म, क्रौंच पक्ष्याचा मृत्यू पाहून वाल्मीकीला सुचलेल्या ‘मा निषाद’ या काव्याचा जन्म.

सारंच भयचकित करणारं, सुन्न करणारं, विचार करायला लावणारं. माणूस हा विचार करणाराच नव्हे, तर विचारात पाडणारा आहे हेच खरं!

[email protected]