
>> ममता क्षेमकल्याणी
व्यसनामुळे पोखरलेल्या विनय लोढा यांच्या आयुष्याला मुक्तांगणच्या रूपाने माहेरची ऊब मिळाली. म्हणूनच आपुलकी, विश्वास, सहकार्य आणि नवचेतना अशा सगळ्या सकारात्मक ऊर्जा देणारे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे विनय यांना त्यांचे माहेरच वाटते. माहेरचा हा ओलावा आजही जपणारे विनय लोढा यांची ही यशोगाथा!
जळगाव जिह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर गावात राहणारे विनय रमेशचंद्र लोढा. ऐन तारुण्यात काही मित्रांच्या आग्रहाखातर केलेल्या मद्यपानामुळे त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची समीकरणे बदलून गेली. अवघ्या अडीच वर्षांचा व्यसनाचा हा काळ, पण त्यामुळे विनय लोढा यांना अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. वडिलांकडून मिळालेला दुकान व्यवसायाचा वारसा पुढे नेऊन सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सुखी संसाराची स्वप्नं बघण्याचा तो काळ. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच सुरू होते. घरचे मेडिकल दुकान सांभाळायचे म्हणून त्यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडून दिले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने कधी पैशांची चणचण भासली नाही. अशात मद्यपानाने विनय यांना पुरते घेरले होते. घरातील व्यक्तींनी अनेकदा समज देऊनही त्यांच्यावर फारसा परिणाम न झाल्याने कुटुंबीयांनादेखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. लग्नानंतर काही महिन्यांतच घटस्फोट होऊनही विनय यांचे डोळे उघडले नाहीत. मुख्य म्हणजे घटस्फोटाच्या या प्रकरणात विनय यांच्या कुटुंबीयांनीदेखील त्यांच्या पत्नीचीच बाजू घेतली. काहीही केले तरी विनय यांचे व्यसन सुटणार नाही अशी जणू सगळ्यांना खात्रीच पटली होती. कारण देवाधर्माच्या कार्याबरोबरच विनय यांचे व्यसन बंद व्हावे म्हणून बरेच औषधोपचारदेखील सुरू होते.
पण कशाचाच फारसा उपयोग होऊ शकला नाही. शिवाय मेडिकल स्टोअर्सच्या अनुभवामुळे झोपेच्या गोळ्यांचे आणि नार्कोटिक्सचे व्यसन विनय यांच्या मागे लागले. या सगळ्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागला आणि पुढे त्यांना मधुमेहाने गाठले.
दरम्यान, लोढा कुटुंबाचे स्नेही असलेल्या डॉ. लेले यांनी मानसोपचारतज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यातून व्यसनमुक्त करण्यासाठी विनय लोढा यांना पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
खूप आधीपासून ड्रायव्हिंगची आवड असलेले विनय स्वतः गाडी चालवत पहूरहून थेट पुण्यात आले आणि 10 जून 2004 रोजी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाले. 10 जून ते 14 जुलै 2004 या 35 दिवसांच्या कोर्सने विनय यांचे संपूर्ण आयुष्य अक्षरशः बदलून गेले. परेश कामदार हे त्यांचे कौन्सिलर होते आणि त्यांच्याकडून विनय यांना अनेकदा खूप आधार मिळाला. नितीन देऊसकर त्यावेळी मुक्तांगणमध्ये निवासी असल्याने बरेचदा संध्याकाळी विनय त्यांच्याशी गप्पा मारत असत. त्यावेळी देऊसकर यांनी त्यांना मुक्तांगणच्या 11 शनिवारचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि मुक्तांगणच्या प्रथेनुसार 12 व्या शनिवारी तुझा वाढदिवस साजरा होईल, असा विश्वास विनय यांना दिला. जुलै महिन्यात मुक्तांगणचा कोर्स पूर्ण करून घरी गेल्यावरदेखील विनय यांनी मुक्तांगणमध्ये सांगितल्या गेलेल्या सगळ्या नियमांचे काटेकोर पालन केले. मुख्य म्हणजे त्याच जुलै महिन्याच्या शेवटच्या शनिवारपासून विनय यांनी आपले 11 शनिवारचे व्रत सुरू केले. या व्रताचे पालन करताना विनय यांनी मुक्तांगणला भेट दिली नाही, असा एकही शेवटचा शनिवार उजाडला नाही. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ते मुक्तांगणमध्ये येणार म्हणजे येणारच. विनय यांनी या फॉलोअप मिटिंगला अतिशय महत्त्व दिल्यामुळे एकदा 35 दिवसांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर विनय यांना पुन्हा त्याच कोर्ससाठी मुक्तांगणमध्ये प्रवेश घ्यावा लागला नाही. शिवाय कोर्सच्या कालावधीत मुक्तांगणमधील प्रत्येक दिवस विनय यांना खूप काही देऊन गेला. पुढेदेखील प्रत्येक फॉलोअपच्या वेळी मुक्तांगणमध्ये एक संपूर्ण दिवस घालवणे हा विनय यांना समृद्ध करणारा अनुभव असायचा. पुढच्या आयुष्यात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मुक्तांगणमुळे मिळाली, असे विनय आवर्जून नमूद करतात. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे आधारवड डॉ. अनिल अवचट, मार्गदर्शक प्रफुल्ला मोहिते, मुक्तांगणच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर, डॉ. आनंद नाडकर्णी, मानव जोगदेव या सगळ्यांचे मार्गदर्शन, सहवास आणि आपुलकीपूर्ण वर्तन यामुळे विनय यांना चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळाली.
परेश कामदार यांच्या सहकार्याने विनय यांनी जामनेरमधले मुक्तांगणचे फॉलोअप सेंटर सुरू केले. या कामात त्यांचे मित्र संजय कोठारी यांची उत्तम साथ त्यांना मिळते आहे. त्यांनी त्या परिसरात असलेल्या मुक्तांगणच्या प्रथेनुसार जुन्या पेशंटचे पत्ते शोधून प्रत्येकाची वैयक्तिक भेट घेऊन फॉलोअप सुरू केला. गेल्या 17 वर्षांत या फॉलोअपला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असून फॉलोअप मिटिंगला शंभरहून अधिक सहचरी आणि पेशंटची उपस्थिती असते. विनय यांना स्वतःला मुक्तांगणच्या फॉलोअपचा अनुभव अतिशय उभारी देऊन गेला असल्याने इतरांनादेखील ते खूप तळमळीने फॉलोअप मिटिंगला यायला सांगतात. एवढेच नाही तर फॉलोअप मिटिंगला येणाऱयांना स्वतःच्या खर्चाने पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन येण्याची कामगिरीदेखील त्यांनी करून दाखवली आहे. त्यांच्या परिसरातील सुमारे 60-70 व्यक्तींना व्यसनापासून दूर ठेवण्यात त्यांना यश आले आहे. या सर्व व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय व्यसनमुक्तीची नवी वाट निर्माण करीत आहेत.
एकेकाळी मद्यपानाच्या व्यसनामुळे गावात तोंड दाखवायला जागा न राहिलेले विनय आज त्याच गावात ताठ मानेने व्यसनमुक्तीची पालखी पुढे नेत आहेत. स्वतःचे स्वतंत्र मेडिकल स्टोअर्स सुरू करून विनय आता स्वतःच्या घराचे स्वप्नदेखील पूर्ण करीत आहेत.




























































