
>>मानसी ईनामदार
समस्या ः मी शिक्षिका आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करते आहे. यश कसे मिळेल?
प्राची गोगटे, ठाणे
तोडगा ः सरस्वतीची उपासना करा. रोज पूजा झाल्यावर सरस्वती स्तोत्र पाचवेळा म्हणा. तेव्हा कर्पुरारती करा.
मेष – प्रसन्न वातावरण
हा आठवडा अत्यंत प्रसन्नता देणारा असणार आहे. पण पावसात भिजणे टाळा. आकाशी रंग जवळ ठेवा. घरात धार्मिक वातावरण राहील. एखादी छोटीशी पूजा संपन्न होईल. नोकरी-व्यवसाय उत्तम चालेल. हातात तांब्याचे कडे घाला.
शुभ परिधान – चंदेरी साडी, चंदन.
वृषभ – नव्या संधी
नोकरीच्या ठिकाणी चढ-उतार संभवतात. मन शांत राहील. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. त्यात भरपूर फायदा होईल. जुन्या गोष्टींना चिकटून राहू नका. लाल रंग परिधान करून गणेशोपासना करा.
शुभ परिधान – रुद्राक्ष, चांदीची अंगठी.
मिथुन – निसर्ग देवता प्रसन्न
पोपटी रंग तुमच्या राशीचा आल्हाददायक रंग आहे. तो नेहमीच जवळ ठेवा. निसर्ग सान्निध्यात जाण्याचा योग येईल. अवश्य जा. नाती खुलतील. प्रेमात यश मिळेल. निसर्गदेवता प्रसन्न होईल. आपल्या गुरूंची आराधना करा.
शुभ परिधान – रेशमी वस्त्र, मोती.
कर्क – पगारवाढ होईल
अंगातील उष्णता बाहेर पाडण्यासाठी हा मोसम अत्यंत उत्तम आहे. मोतिया रंग तुमचा नेहमीच फलदायी ठरतो. आहारात दुधाचा समावेश करा. परिस्थिती सुधारेल. पगार वाढ होईल किंवा अन्य मार्गाने अर्थप्राप्ती होईल.
शुभ परिधान – केशालंकार, घडय़ाळ.
सिंह – खेळाडूंचा आठवडा
व्यवसायात उत्तम यश मिळेल. गणपतीला चाफ्याची फुले आवर्जून वाहा. हा नेम कायम ठेवा. पुढील कार्यात यश मिळेल. खेळाडूंना आठवडा चांगला जाईल. सरावात कसूर नको. पावसात भिजू नका. पिवळा रंग फलदायी.
शुभ परिधान – जानवे, कुर्ता.
कन्या – मेहनत हवीच
सर्दी, खोकल्यासारखे विकार त्रस्त करतील. गरम पाणी पिण्याची सवय घरात सर्वांना लावा. आहारात गरम पदार्थांचा, गुळाचा समावेश करा. कामाच्या ठिकाणी मेहनतीत कसूर होऊ देऊ नका. लाल रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – गुलाबाचे फूल, अत्तर.
तूळ – सुसंधी मिळेल
परदेशगमनाचा योग आहे. हातची संधी जाऊ देऊ नका. कार्यालयीन कामातून ही संधी तुम्हाला मिळेल. देवघरातील शंखाची पूजा करा. संध्याकाळी घरात शक्य झाल्यास रोज शंख नाद करा. पांढरा रंग परिधान करा.
शुभ परिधान – आवडीचा पोशाख.
वृश्चिक – घरात समाधान
साईबाबांची उपासना करा आणि ती त्यानंतरही सुरू ठेवा. दर गुरुवारी अन्नदान करण्याचा नेम घालून घ्या. घरातील कुरबुरी कमी होतील. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. जुने सहकारी भेटतील. भगवा रंग फलदायी.
शुभ परिधान – फुलांच्या डिझाईनचे कपडे,टाय
धनु – धार्मिक दिवस
वडिलोपार्जित व्यवसायात यश मिळेल. मेहनतीत कसूर नको. घरात जोडीदारासोबत थोडेफार वाद संभवतात. दुर्लक्ष करा. एकंदरीत आठवडा धार्मिक राहील. जमल्यास शिर्डीला जाऊन या. निळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – मेकअप, ब्रेसलेट.
मकर – खरेदी कराल
जुनी येणी वसूल होतील. त्यातून घसघशीत लाभ मिळेल. दुरचा प्रवास संभवतो. महागडय़ा वस्तूंची खरेदी होईल. ती मुख्यत्वे घरासाठी होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. राखाडी रंग जवळ बाळगा. आहारात गरम पदार्थ ठेवा.
शुभ परिधान – रुमाल, पैंजण.
कुंभ – मान सन्मान लाभेल
कामाच्या ठिकाणी हा आठवडा अत्यंत व्यस्त राहील. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदारासोबत वादाचे प्रसंग उद्भवतात. मानसन्मानाचे प्रसंग येतील. केशरी रंग परिधान करा. हातून सर्जनशील घडेल.
शुभ परिधान – गॉगल, सुती कपडे.
मीन – महत्त्वाची कामे
मन प्रसन्न राहील. जवळच्या व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. विवाहयोग आहे. चांगली स्थळे चालून येतील. देवघरात पाण्याचा तांब्या भरून ठेवा. त्याची रोज पूजा करा. पाणी रोज बदला. जांभळा रंग जवळ बाळगा.
शुभ परिधान – नेलपेंट, डेनिम.

























































