आगळं वेगळं – पिंपळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगल गोगटे

आमच्या मागच्या बाजूला घराच्या भोवतालच्या भिंतीपलीकडे एक पिंपळाचं मोठं झाड होतं. होतं यासाठी की, ते होतं माझ्या माहेरी. त्यामुळे ते नेहमीच दृष्टीस पडे. परसदाराच्या माझ्या दृश्य दुनियेचा तो एक भाग होता. त्याचे सगळे हंगाम मी पाहिले, त्या हंगामातील त्याची बदलती रूपं पाहिली. सध्या मी जिथे राहते आहे, तिथे तर आमच्या इमारतीची भिंत जिथे संपते तिथे एक पिंपळाचं झाड आहे मोठं. पानांची सळसळ ऐकू येते एवढय़ा जवळ आहे ते माझ्या सहाव्या मजल्याच्या बाल्कनीच्या. आता त्या झाडाची हंगामी रूपं बदलताना मी जास्त जवळून पाहते आणि मनाने माहेरच्या पिंपळाला परत एकदा आठवते.

हा पिंपळ हिंदुस्थानातील एक वृक्ष आहे. आजकाल आपल्याकडे झाडं लावताना आपली मूळ हिंदुस्थानी वंशाची झाडं लावावीत असा आग्रह धरला जातो. जांभूळ, हरडा, बेहडा, कडुनिंब, करंज, रिठा, हळद, पळस ही अशी सगळी झाडे हिंदुस्थानी वृक्ष आहेत. ही सर्व झाडे नैसर्गिक पद्धतीने रुजतात आणि त्या त्या भागातील सजीव सृष्टीसाठी परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते.

पिंपळ हे एकमेव झाड आहे, जे चोवीस तास ऑक्सिजन निर्माण करतं. त्यामुळे या झाडाखाली कधीही थांबलं तरी छानच वाटतं. याचं वनस्पती शास्त्र्ाातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ असं आहे. ज्या घराच्या आसपास हे झाड असतं तिथे कधीही दारिदय़ येत नाही असं मानलं जातं. कारण निसर्गाच्या मनात असेल तरच हे झाड कुठेही जगतं, तग धरू शकतं. कावळ्याच्या अस्तित्वाशिवाय तर या झाडाला जन्म घेणं शक्य नाही. जेव्हा कावळा पिंपळाची फळं खातो तेव्हा बिया त्याच्या पोटात जातात व त्यावर योग्य ती प्रक्रिया होते. त्यानंतर जेव्हा या बिया कावळ्याच्या विष्ठsतून इकडे तिकडे पडतात तेव्हा त्या रुजतात आणि अगदी कुठेही तग धरतात. इमारतीवर, दगडांच्या फटीत, लाकडात… अक्षरशः कुठेही ही झाडं रुजलेली दिसतात. मात्र ती अगदी घराजवळ असतील तर घराच्या बाधकामात शिरून घराची बांधणी खिळखिळीत करू शकतात.

पिंपळाच्या झाडाचे आयुष्य खूप असते. अगदी 2000 वर्षेदेखील हे झाड जगतं. त्याची मुळं जमिनीत अगदी खोलवर जातात आणि त्यामुळे ती पावसाचं पाणी जमिनीत खोलवरपर्यंत घेऊन जातात. जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत असेल, झाली असेल तर पिंपळाची झाडं तिथेही मदत करतात. या झाडाला म्हणूनच तर ‘अक्षय’ वृक्ष म्हणतात. भगवान गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली, तो हा बोधीवृक्ष!

पिंपळ हा उंच, सुमारे 15 ते 20 मीटर वाढणारा वृक्ष आहे. त्याचं खोड पांढरट असतं आणि पानं हृदयाकार. ही कोवळी असताना गुलाबीसर असतात आणि नंतर ती हळूहळू हिरवी व मोठी होत जातात. ही पानं हलताना फारच छान दिसतात. अगदी हलकासा वारासुद्धा या पानांना झुलवतो. सतत होणारी ही सळसळ कानांना व डोळ्यांना सुखावणारी असते. पिंपळाच्या झाडापासून लाख बनवतात. हे झाड औषधी आहे. पोटाच्या विकारावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. जखमेचे डागदेखील पिंपळाने बरे होतात. याच्या सालांचा बनवलेला काढा अत्यंत पौष्टिक असतो. याची सालं लाल रंग तयार करतात. बौद्ध भिक्षू याने आपले वस्त्र्ा रंगवतात. पूर्वी या झाडाला खूप महत्त्व होतं हे हडाप्पा अणि मोहेंजोदडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती पाहून सहज लक्षात येतं.

– [email protected]